सुदामा  

खऱ्या प्रेमात किंमत मागताही येत नाही 
सुदामा द्वारकेहुन एक वस्तू नेत नाही 

तपस्या एक झाल्यावर नको वर पाच मागू 
कुण्या एका जिवाला पूर्णता मी देत नाही 

परीक्षा घ्यायची आहे सभेतिल कौरवांची
खरोखर पाच गावे मागण्याचा बेत नाही 

खरे होईल खोटे गोपिकांना भेटल्याने 
बघा सांगून, कान्हा गोकुळाला येत नाही 

मनामध्ये सतत राधा स्मरण करते प्रियाचे
तरी लोकांपुढे ती नाव त्याचे घेत नाही 

कुणावर प्रेम व्हावे अन कुणाशी युद्ध व्हावे 
नियतकर्मात ठरलेले तुझ्या क्षमतेत नाही 

-भूषण कुलकर्णी 

सल्ला

जन्मभराचा रस्ता काही बदलत नाही 
बरा वाटला आधी, आता करमत नाही 

शिखराभवती गोलगोल फिरणारा रस्ता 
चढ आहे की उतार आहे समजत नाही 

एखाद्या वेळेला लहरी वागू शकते 
सगळ्या गोष्टी नियती आधी ठरवत नाही 

सल्ला देण्यासाठी दुनिया तयार असते 
पण सल्ल्याची जबाबदारी उचलत नाही 

खरे बोलणाऱ्यांचा प्रभाव पडला असता 
मात्र कुणीही शब्द स्वतःचे सजवत नाही 

काही कार्याद्वारे भक्ती घडून यावी 
देवासमोर एका जागी बसवत नाही

-भूषण कुलकर्णी 

कविता

तिच्यासाठी लिहाव्या वाटल्या कविता
तिच्यामध्येच सगळ्या संपल्या कविता 

म्हणाली, का लिहित नाहीस तू हल्ली?
पुन्हा काही लिहाव्या लागल्या कविता 

कुणाची सावली पडली मनावरती?
सुरू झाले ग्रहण, अंधारल्या कविता 

खयालांना तसे रूपक मिळत नाही
निराकारात पुरत्या हरवल्या कविता 

-भूषण कुलकर्णी

शांत

तर्क ना संगत कशाची लागते
भावना कोठे कुणाची दाटते

एक दुखरी आठवण म्हणते मला
शांत बसण्याची भिती का वाटते?

एक माणुस मूळचा असतो खरा
दोन झाले की परीक्षा चालते

इंद्रियांना पाहिजे असते नशा
ती बरी, वाईट – दुनिया सांगते

आज थोडा वेळ काढुन पाहतो
कोण माझी वाट पाहत थांबते

वेळ थोडासा स्वतःला पाहिजे
याचसाठी रात्रभर मी जागते

-भूषण कुलकर्णी

खेळाडू

रोजच काहीतरी नव्याने घडत राहते
नंतर मन एखादी घटना स्मरत राहते

चंद्रासम तो माझ्याभवती फिरत राहतो 
केवळ एकच बाजू त्याची दिसत राहते

भजनामध्ये जेवणखाण विसरतो नवरा 
रोज दुपारी तीही डोंगर चढत राहते 

आकाशाची स्वप्ने पाहत असतानाही 
मनात का थोडीशी माती उरत राहते?

समुद्र, डोंगर, झाडे, प्राणी, झरे पाहिले 
सगळी जनता तेच तेच का बघत राहते!

ठिपक्यांनी भरलेला कागद पुढ्यात असतो 
त्यात उगा मी पूर्ण वर्तुळे करत राहते 

ऑफिसला चालला पहा माजी खेळाडू 
मैदानावर एक नजर भिरभिरत राहते 

-भूषण कुलकर्णी 

रोपटे

वागलो माझ्यापरीने चांगले
पण जगाचे नियम होते वेगळे

चार जागी विखुरली माझी मुळे 
कोणत्या मातीतले मी रोपटे?

वेळ हातातून माझ्या निसटला 
एक नाते त्याबरोबर संपले

कळस म्हणतो, स्थैर्य अन शांती हवी 
पायरी म्हणते, कळस गाठायचे

भेट झाली काल ती होती खरी 
की मला स्वप्नात दिसली माणसे?

आतला आवाज मीही ऐकला 
शब्द त्यानेही कितीदा फिरवले!

-भूषण कुलकर्णी 

भिक्षा

रात्रंदिवस कामामधे गुंतायचे असते
पण सांजवेळेला जरा थांबायचे असते

मेसेज पाठवला तिला मी गोड प्रेमाचा
म्हणते, अरे भेटून हे सांगायचे असते!

व्याख्या कुणी केली अशी ही लोकसेवेची
आहे स्वत:चे ते, म्हणे वाटायचे असते

मंथन करत राहूनही अमृत मिळत नाही
पाणी जरासे शांत राहू द्यायचे असते

एका क्षणापुरती नजर क्षितिजाकडे टाकू
नंतर पुन्हा रस्त्याकडे पाहायचे असते 

वेळीच दे भिक्षा मला जी द्यायची आहे
नाही मिळाली तर पुढेही जायचे असते

-भूषण कुलकर्णी

नियतीच्या अटी

हक्क कोणी चित्रकारांना दिला?
फक्त काळा रंग दैत्यांना दिला

खेळकर आतून आहे तो जरा
सागराने जन्म लाटांना दिला

रानवाऱ्याने झुलवले रात्रभर
केवढा आनंद झाडांना दिला!

कल्पना अन् आठवांची सरमिसळ
छंद हा भलताच ह्रदयांना दिला

फक्त नियतीच्या अटी पाळेन मी
शब्द हा माझ्याच वचनांना दिला

-भूषण कुलकर्णी

स्मृती

समुद्र त्याच्या लाटा थोड्या आवरतो
तोवर मीही शंख शिंपले साठवतो

तेव्हाही कुठलाच प्रश्न सोपा नव्हता
बालपणीचे दिवस कशाला आठवतो!

शिक्षण घेताना घर सुटले ते सुटले
अता घरी पाहुण्याप्रमाणे वावरतो

गाता नाही येत मला तर अंगाई
गोष्टी सांगुन बाळाला मी जोजवतो

कठोर झालो आहे थोडा मी सध्या
तुझ्या स्मृतीने एकच अश्रू ओघळतो

-भूषण कुलकर्णी

समांतर

उंबऱ्याबाहेर पाउल टाकते कोणी
अंगणातच घुटमळत मग राहते कोणी

वेगळेपण सिद्ध करणे वाटते अवघड
आपला साधेपणा मग सांगते कोणी

शेवटी कोठेच नाही मुक्तता, कळते
ओळखीच्या पिंजऱ्यातच गुंतते कोणी

योग्य ती किंमत जगाला जाणवत नाही
आपल्या पेटीत रत्ने ठेवते कोणी

भूतकाळाचे समांतर विश्व एखादे
आठवण माझी तिथेही काढते कोणी

-भूषण कुलकर्णी