दर्शन

येता तुझ्या किनारी लाटांकडे बघू 
नंतर स्थिरावलेल्या क्षितिजांकडे बघू 

दिसते पुढे तसे ते नसते कधी कधी 
शोधायला खरे मग भासांकडे बघू 

एकेक वर्ष जगलो काही क्षणांमध्ये 
आता कशास फिरत्या काट्यांकडे बघू?

उशिरा परंतु उत्तम मिळतात माणसे 
मग वाटते नव्याने नात्यांकडे बघू 

उरलाय प्रश्न एकच दर्शन करूनही 
डोळ्यांकडे बघू की चरणांकडे बघू?

-भूषण कुलकर्णी 

क्षमा

कोणती स्वप्ने कुणी पाहायची
हे कळेस्तोवर जवानी जायची

एक मूर्ती कोरली स्वप्नामध्ये
ती मनापासुन मला बोलायची

वृद्धपण दुसरे असावे बालपण
वेळ असते एकटे खेळायची

दाखवू नाही शकत साधेपणा
सवय नाही वेगळे वागायची

एकही मोफत मिळत नसते क्षमा
आपली किंमत जगी घसरायची

भ्याडपण सोयीप्रमाणे पांघरू
सवय जडली भांडणे टाळायची

-भूषण कुलकर्णी

व्यसन 

भूतकाळाला बदलण्याची गरज नाही
एवढा पडणारही त्याने फरक नाही 

टीन एजर सारखी का वागते आहे?
भावनेवर राहिला माझा वचक नाही 

सर्व खटल्यांना उद्याच्या तारखा देतो
घ्यायची बाजू कुणाची ते कळत नाही 

डोंगरावर एक घर मी घेतले आहे
यावरी मारायची कुठली मजल नाही 

शब्द काही कोरले गेलेत हृदयावर
कोण कोणाला म्हणाले ते स्मरत नाही 

इतर गोष्टींची सतावत राहते चिंता
लागले अद्यापही पुरते व्यसन नाही 

-भूषण कुलकर्णी 

शंका  

गर्द रानातून मी निघणार नाही ना?
सावली माझी मला दिसणार नाही ना?

शक्यता दिसल्या नव्या प्रत्येक घटनेच्या
मी समांतर जीवने जगणार नाही ना?

झोपल्यावर जग कुणाची आठवण येते?
या जगाला हे गुपित कळणार नाही ना?

क्षणभराच्या निर्णयाची जन्मभर शंका
मी लढाईच्या क्षणी पळणार नाही ना?

त्याग कर आहार निद्रा मैथुनाचाही
भय तरीही शेवटी उरणार नाही ना?

देव मानू की नको, चर्चा करत बसलो
तर कुठेही शाश्वती मिळणार नाही ना!

-भूषण कुलकर्णी 

वाडा  

वेदनांची आठवण आली पुन्हा
आठवांची वेदना झाली पुन्हा 

मोह वाड्यावर कुणाचा राहिला?
वाढल्या भिंतीवरी पाली पुन्हा 

घेतली नव्हती दखल समजू नको
एकदा रेंगाळ भवताली पुन्हा 

कळत नाही मित्र कोणाला म्हणू?
भासतो सुग्रीव हा वाली पुन्हा!

पाय नवऱ्यावर उगा ठेवू नको
व्हायचे झालेच जर काली पुन्हा 

वैर संपेना कधी मरणामुळे
प्रेत खेळू लागले चाली पुन्हा 

-भूषण कुलकर्णी 

व्यवस्था  

ज्या स्वप्नाच्या मागे पळतो, नंतर कळते नको मला ते 
माझ्या कोत्या कल्पनेत जे येऊ शकते, नको मला ते 

भल्याबुऱ्या लाखो लोकांनी बनलेल्या आहेत व्यवस्था 
हळूहळू कोणीही त्यांचा हिस्सा बनते, नको मला ते

काया, वाचेवर होती ती सर्व बंधने सुटू लागली 
म्हणे तरीही काळिज त्यांचे निर्मळ असते! नको मला ते  

पुढे आणखी कसे जायचे विचारतो अनुभवी जनांना
ती व्यक्ती पहिलीच पायरी सांगत बसते, नको मला ते 

बऱ्याच दुःखांवरती कुठली कृती करावी समजत नाही 
सवयीने एखादी हळवी कविता सुचते.. नको मला ते 

-भूषण कुलकर्णी

निरीक्षण

एक विनंती केली आहे ताऱ्याने 
मला नका बोलावू कुठल्या नावाने 

उगाच रेषा जोडत बसलो त्याच्याशी 
तारा बसला होता स्वतंत्र मानाने 

स्वतःभोवती, जगाभोवती फिरत रहा 
काळ व्यापला आहे एका कामाने 

देश सोडला स्वतंत्र जगण्यासाठी मी
अता बंधने घातलीत परदेशाने 

फक्त निरीक्षण करतो हल्ली दुनियेचे 
समाज काही बदलत नाही माझ्याने 

युद्धासाठी आसुसलेली ही दुनिया 
कुठे कुठे अन कसे पहावे देवाने! 

-भूषण कुलकर्णी 

संघर्ष

चार भावना, चार खयालांपुरते
जीवन उरले चार माणसांपुरते 

मला कळेना अर्थ कृतीचा माझ्या 
स्पष्टीकरण दिले मी इतरांपुरते 

शत्रू होते तेव्हा हिंमत होती 
कसे करू संघर्ष आपल्यांपुरते?

आपुलकी पूर्वीची उरली नाही 
निभावतो नाते मी वचनांपुरते 

डोह पाहिला आहे कोणी त्याचा? 
चित्र बनवले आहे लाटांपुरते

भरकटलेला आहे आत्मा माझा 
सांभाळुन घे काही जन्मांपुरते

-भूषण कुलकर्णी 

नोंद

तिची जन्मभर वाट पाहिल्यानंतर 
शून्य मिळाले दिवस मोजल्यानंतर 

सुंदर झाल्या होत्या काही वाटा 
एक चुकीचे वळण घेतल्यानंतर 

आसपासची दृश्ये मागे पडली 
समजत नाही वेग वाढल्यानंतर 

सभ्य जनांनी नोंद घेतली आहे 
मी छोटासा नियम मोडल्यानंतर 

वेष घेतला आहे मी पुरुषाचा 
जगापुढे भावनिक राहिल्यानंतर 

नियतीचे संकेत मिळाले होते 
अर्थ कळाले वेळ निसटल्यानंतर 

पुतळ्यांमधले दोष दिसेना झाले 
रोज सकाळी हार घातल्यानंतर 

कार्य तुझे अद्याप राहिले आहे 
भेट मला अवतार संपल्यानंतर 

-भूषण कुलकर्णी 

स्थिर

माझ्या वेगाला थोडीशी थोपवते आहे 
माझ्या पुढची गाडी नियती चालवते आहे 

मान ताठ ठेवावी जनसेवा करतानाही 
जणू पथावर झाडांची छाया पडते आहे 

सोडुन देऊ वर्षवर्ष जपलेल्या आठवणी 
पान किती सोनेरी गळताना दिसते आहे!

क्रमांक पहिला येणे अवघड असते केव्हाही 
उत्तेजनार्थ बक्षिस बऱ्याचदा मिळते आहे 

समाधान मानावे की मी अपेक्षा कराव्या?
दोन्ही बाजूंनी मन माझे नाचवते आहे 

ध्रुवताऱ्याचे वाटत आहे आकर्षण हल्ली 
तिथे असावी स्थिर दुनिया जी बोलवते आहे 

-भूषण कुलकर्णी