आवड

पेपर गेला बराच अवघड
म्हणे व्यवस्था ही नाही धड

म्हणे कुणाला करू नये जज
ज्याची त्याची असते आवड

एक आणली फांदी तोडुन
त्यास मानले पूजेचा वड

विचार नव्हता खोल एवढा
मात्र बोलणे होते परखड

कविता कंटाळून परतली
सतत मनाची सुरूच बडबड

दुःख कसे मी सांगू त्यांना?
तिथे सुरू आधीच रडारड

वेळच नसतो डागडुजीला
फार मनाची होते पडझड

© भूषण कुलकर्णी

दाह

वेगळे आहोत आपण हे बरे झाले
माणसे आहोत आपण हे बरे झाले

दाह दुसऱ्यांना नको अन् आपल्यालाही
कवडसे आहोत आपण हे बरे झाले

प्राप्त असते जाणिवांना वेदना होणे
कोडगे आहोत आपण हे बरे झाले

आपल्यातच सापडू शकतो अता हीरा
कोळसे आहोत आपण हे बरे झाले

जी हवी ती आपली प्रतिमा बघत राहू
आरसे आहोत आपण हे बरे झाले

गोडवा टिकला खरा नात्यामधे अपुल्या
दूरचे आहोत आपण हे बरे झाले

© भूषण कुलकर्णी

पाने

वाहत्या वाऱ्यात फडफडतात पाने
त्याच आठवणीत मग झुलतात पाने

सांगतो वारा भराऱ्या पाखरांच्या
जागच्या जागीच सळसळतात पाने

थेंब हलकेसे मनावर शिंपडावे
खूप दिवसांनी अशी भिजतात पाने

फूल एखादे कुठेतर जन्म घेते
शेकडो साधीसुधी हसतात पाने

सावलीमधल्या फुलाला प्रश्न पडला
एवढी गंभीर का दिसतात पाने?

जन्म घेणे, सोसणे, मातीत पडणे
यापुढे स्वप्ने बघत नसतात पाने

सोबती एकेक जेव्हा दूर जातो
सर्व आशा सोडुनी गळतात पाने

© भूषण कुलकर्णी

लक्ष नव्हते

तू मला बोलावताना लक्ष नव्हते
दुःखही मग ऐकताना लक्ष नव्हते

लक्ष मुक्कामाकडे ठेवून होतो
वाट साधी चालताना लक्ष नव्हते

खटकल्या होत्या तुझ्या दोनेक गोष्टी
चांगले तू वागताना लक्ष नव्हते

जिंकल्यावर वेदना इतकीच आहे
घाव इतके लागताना लक्ष नव्हते

आज वारा बोलला कानात माझ्या
आजवर मी बोलताना लक्ष नव्हते?

© भूषण कुलकर्णी

कसे कळावे?

मनात कुठले वादळ लपले कसे कळावे?
वरवरचे की खुशीत हसले कसे कळावे?

सुरुवातीला आपण सगळे सोबत होतो
नंतर कोठे अंतर पडले कसे कळावे?

आठवते की एक झरा प्रेमाचा होता
कुठून होते पाझर फुटले कसे कळावे?

किमान थोडे तरी बोलणे व्हावे आता
विसरलात की मनात स्मरले कसे कळावे?

प्रश्नपत्रिका कोण काढतो आयुष्याची?
किती कोणते उत्तर चुकले कसे कळावे?

वाटाघाटी चालू झाल्या नात्यामध्ये
काय मिळवले काय हरवले कसे कळावे?

धूळ विचारत आहे थोडे विसावताना
वादळ सरले अथवा उरले कसे कळावे?

© भूषण कुलकर्णी

मजकूर

क्षितिजापर्यंत त्यांच्या पाणी भरून ठेवा
मग बोलतील सारे, वंदन समुद्रदेवा!

कंटाळलो जरासा ह्या रोजच्या सुखांना
म्हटले करून पाहू थोडी समाजसेवा 

आदर्श मानले पण आदर कमीच होता
त्यांचा मला कुठेतर वाटत असेल हेवा

थोडाच वेळ घेतो आस्वाद मी कलेचा
थोडाच अर्थ कळतो अन बोलतो, अरे वा!

मजकूर खूप सारे मिनिटांत स्क्रोल केले
एखाद-दोन केवळ वाचून वाटले, वा!

© भूषण कुलकर्णी

ठिपके

कोपर्‍यातिल चार ठिपके फक्त पाहत राहिलो
ते कशाचे चित्र होते, हेच विसरत राहिलो

वाटले होते, पुढे होईल काही चांगले
मी स्वतःचा वेळ हारुन द्यूत खेळत राहिलो

कोंडलेला एक नायक, चार भिंती नायिका
त्याच घुमणार्‍या ध्वनीची गोष्ट सांगत राहिलो

वेळ गेल्यावर पुन्हा माझे मला आले हसू
काय होतो मी, स्वतःला काय समजत राहिलो

कल्पवृृृक्षाला सहज मी सोडले नाही कधी
कल्पनाशक्तीच त्याला जास्त मागत राहिलो

© भूषण कुलकर्णी

खारीचा वाटा

आपण केवळ देऊ शकतो खारीचा वाटा
आहे, नाही, कोण पाहतो खारीचा वाटा

माहित नाही कुठे चालला आहे हा सेतू
आम्ही केवळ त्यात टाकतो खारीचा वाटा

हात तसे तर लाखो होते त्या कार्यामागे
एखादा लक्षात राहतो खारीचा वाटा

हत्तीला जर त्याची क्षमता जाणवली नाही
कसाबसा तो उचलत असतो खारीचा वाटा

जीवनभर जो मेहनतीने साठवला जातो
वादळ येता क्षणात उडतो खारीचा वाटा

कामामध्ये जेव्हा काही राम दिसत नाही
कशास द्यावा आम्ही म्हणतो खारीचा वाटा?

© भूषण कुलकर्णी

वाटचाल

थकलेल्या पावलांस आता हीच सांत्वना आहे
चालत असताना रस्ता अर्ध्यात संपला आहे

पुढे पडत असणार्‍या पायाला कोणी सांगावे
दुसरा मागे दुनियेला रोखून थांबला आहे

वाट चालतेवेळी केवळ हीच माहिती आहे
दोन्ही पायांपैकी सध्या पुढे कोणता आहे

आधी उजवा की डावा, एवढाच निर्णय माझा
पुढे पावलांचा क्रम तर त्यानेच ठरवला आहे

त्याच्या जिम मधले एखादे यंत्र असावी दुनिया
इथे धावणारा एका जागीच राहिला आहे

© भूषण कुलकर्णी

मोर

जखमा सवयीच्या झाल्याने काही वाटत नाही
भरलेल्या मडक्यात आणखी पाणी मावत नाही

मेघ बरसले अवकाळी, नाचुन झाले मोरांचे
आजकाल श्रावणात कोणी तितका नाचत नाही

जरा मोकळी जागा दिसली, की ती काळी करतो
इतर कोणता रंग द्यायचा बाकी राहत नाही

पुढे जायचे आहे किंवा खोल जायचे आहे
एकदाच दोन्ही करणे अपुल्याला झेपत नाही

केवळ दुःखाच्या वेळेला अहं नकोसा होतो
बाकी तो वाईट कधी माझ्याशी वागत नाही

लोक भोवती होते तेव्हा स्वतःत गुंतत गेलो
आता बघतो तर कोणीही माझ्यासोबत नाही

© भूषण कुलकर्णी