रोजनिशी

वापर भाषा लोकांना समजेल अशी
सुटले गोकुळ, सोड बासरी कायमची

अजुन वेगळे असे काय घडणार उद्या?
कार्बन पेपर लावुन लिहितो रोजनिशी

ह्रदय एवढे मोठे नसते राजाचे
एकच असते राणी त्याची आवडती

येत राहिलो घेउन येथे हळवे मन
या जागेवर अनेक रुजल्या आठवणी

-भूषण कुलकर्णी

सत्य

सांज होताच ती दिसेल मला
एक कविता नवी सुचेल मला

कारभारी, धनी असेही म्हण
लाज लटकेच, आवडेल मला

पीत नाही कधी अशासाठी
आत दडलंय ते कळेल मला

आठवण मागची नको काढू
चूक माझीच आठवेल मला

सत्य असले जरी तुझे म्हणणे
गोड बोलून बघ, पटेल मला

सत्य बोलेल भेट झाल्यावर
‘हाय..‘ इतके तरी म्हणेल मला

-भूषण कुलकर्णी

अक्षर

पाहून झाले जग, अता थांबायचे आहे मला
अपुल्या घरातच शेवटी गुंतायचे आहे मला

आधी झऱ्याचे स्वप्न होते एक सागर व्हायचे
आता म्हणे, मातीमधे मिसळायचे आहे मला

शाळेतले सुविचार बहुधा विसरल्यागत वाटते
एकेक अक्षर त्यातले गिरवायचे आहे मला

ओघात काळाच्या उद्या घडणार ते घडवू अता
आयुष्य वाया आपले घालायचे आहे मला

-भूषण कुलकर्णी

स्वाक्षरी

शोधतो मी हरेक पानावर
ओळ लिहिली असेल पानावर

आज काही नवे सुचत नाही
ठेवले फक्त पेन पानावर

पान रंगेल छान हे नक्की
एकदा ओठ ठेव पानावर

भावनांची मनामधे दंगल
घडवतो मी समेट पानावर

अर्थ शोधेलही पिढी पुढची
ओढ साधीच रेघ पानावर

शेवटी स्वाक्षरी न केली मी
सांडले दोन थेंब पानावर

-भूषण कुलकर्णी

बहिर्जी

अंगावरुनी पाणी सुंदर वाहत होते
खडकालाही वाहुन जावे वाटत होते

हरेक वळणावर वेळेची सीमा होती
निरुपायाने पुढेच जावे लागत होते

आईबाबांच्या राज्यातच निवांत होतो
कोठे काही चुकल्यावरही चालत होते

सडा फुलांचा पडला होता मार्गावरती
ह्रदय तरीही नवीन काही शोधत होते

त्या गल्लीतुन पुन्हा पुन्हा जावेसे वाटे
तिथे छान कुठलेसे गाणे वाजत होते

राज्याभिषेक शिवराजांचा वैभवशाली
फकिराच्या वेषात बहिर्जी पाहत होते

-भूषण कुलकर्णी

वेडी सवय

रोजची वेडी सवय लागू नये
सांज ढळताना अशी पाहू नये

जी नको ती आठवण येईल बघ..
डायरी अपुली जुनी चाळू नये

माणसे येतात अन् जातातही
पत्र पत्त्यावर जुन्या धाडू नये

भोवती दिसतील केवळ आरसे
पुस्तके इतकी खरी वाचू नये

हीच असते शेवटी माणूसकी
मत कुणावर आपले लादू नये

दोन मिनिटे फक्त पाळू शांतता
मग पुन्हा वाईटही वाटू नये

-भूषण कुलकर्णी

हितचिंतक

मन कुणाचे एवढे व्यापक इथे नाही
शोधले पण एक हितचिंतक इथे नाही

दु:ख होते या पुरातन मंदिरांनाही
पूजकांमध्ये कुणी शोधक इथे नाही

आजचे चाणक्य उरले कुटिलतेपुरते
आणि जनतेचा खरा सेवक इथे नाही

निर्मिली असली जरी त्याने प्रतिसृष्टी
कल्पनेसाठी तसे रूपक इथे नाही

-भूषण कुलकर्णी

घड्याळ

कधी वाटते, प्रसन्न इतकी सकाळ आहे
कधी वाटते, सगळे नीरस, रटाळ आहे

उगाच कोणी खलनायक झालेला नसतो
हरेक पात्राला त्याचा भूतकाळ आहे

किती वाजले होते नक्की तू जाताना?
त्या वेळेवर अजुन थांबले घड्याळ आहे

कुणी चोरले, कुठे हरवले माहित नाही
कधीपासुनी ह्रदय आपले गहाळ आहे

संत व्हायचे, हा काही व्यवसाय नसावा
संत कधी कुंभार, कधी मेंढपाळ आहे

-भूषण कुलकर्णी

मैफिली

मनापासुनी दु:ख आपले सांगत होत्या
पूर्वी जखमा माझ्यासोबत बोलत होत्या

खूप वेळ मी शॅावरखाली उभा राहिलो
डोक्यामधुनी विचारधारा वाहत होत्या

ज्यांना साधी ओळख नव्हती तुझी कधीही
आठवणी त्या तुझी आठवण काढत होत्या

सुट्या-सुट्या होऊन भावना उसवत गेल्या
आपसांत ज्या सहजपणाने गुंतत होत्या

फासे टाकुन सापशिडी तो खेळत होता
आणि सोंगट्या अर्थ स्वत:चा शोधत होत्या

सुखात की दु:खात राहिलो माहित नाही
अनेक ओळी तर सुचल्यागत वाटत होत्या

कोणी वेडा त्या रात्रीला फिरत राहिला
म्हणून इतक्या छान मैफिली रंगत होत्या

उंबरा

पायऱ्या मळल्या तुझ्या अन् उंबरे झिजले तुझे
पण खरे दर्शन अजुन नाही मला घडले तुझे

प्रेरणा मिळते तिची ओळीत एकेका मला
आणि ती म्हणते, अजुन अंतर कुठे कळले तुझे!

ही नशा सुंदर तरी नुकसान करणारी पुढे
आठवांसोबत तिच्या मन एकटे पडले तुझे

विसरण्याचे एकदा मी ठरवले की ठरवले
वाटते ओळख तरी काही न आठवले तुझे

उंबऱ्याबाहेर पडणे परवडत नाही तुला
त्यामुळे मन या घरातच शेवटी रमले तुझे