
पु. ल. देशपांडेंनी ‘आपुलकी’ या पुस्तकात विविध कलाक्षेत्रांतील काही मान्यवर व्यक्तींचे वर्णन केले आहे. त्यातील काही अंश:
१. हसून सोडून देण्यापलीकडे जगाचे काही महत्त्व नाही. गांभीर्य आणि विद्वत्ता यांचे नाते फार चुकीने जुळवले गेले आहे. कित्येकदा गांभीर्य ही स्वतःच्या विद्वत्तेविषयी साशंक असणार्या भयग्रस्त माणसाची ढाल असते. आपण विनोदी का नसावे?
२. पडता प्रपंच सावरणारा वडील भाऊ असावा आणि धाकटा कर्तबगार निघाल्यावर त्याच्या हाती सूत्रे सोपवून त्याचे कौतुक करत आणि त्याच्या हाती होणारी भरभराट पाहून त्याने धन्यता मानत रहावे, असा शुक्लांचा स्वभाव खरोखर हेवा करण्यासारखा आहे.
३. कलेच्या बाबतीत आत्मसंतुष्टता हा मोठा शाप आहे.
४. तू लोकसेवा का केलीस हे तुझं तुलाच कळलं नाही. तुझ्या आनंदासाठी तू केलंस, त्यांनी चांगलं व्हावं म्हणून नव्हे!
५. बाप आपली मुलगी सासरी जाणार हे ठाऊक असूनही तिला वाढवतो, शिकवतो, निरनिराळ्या कला शिकवतो, दागदागिने घालतो, आणि शेवटी दुसर्याच्या स्वाधीन करतोच ना!
६. सत्कार समरंभांचे हार गळ्यात पडले तरी नकळत पायात येऊन गुरफटतात आणि वाटचाल थांबवतात, हे त्यांनी पाहिलेले असल्यामुळेच सत्तेवरच्या उन्मत्तांना न भिणारे गोविंदराव त्या तसल्या हारांना भीत असावेत!
७. एक पाऊल टाकलं की दुसरं टाकायचं. एकूण किती पावलं होणार याचा हिशेब आधीच का मांडायचा? कीर्तनाला उभं राहिलं की उद्याच्या दिवसाची चिंता मिटते.
८. गांधीजींनी जीवनशिक्षणाच्या कल्पनेचा आग्रह धरला. जेपी नाईकांनी आपलं आयुष्य या कार्याला वाहिलं.
९. विद्वत्ता हे स्मरणशक्तीचे प्रयोग नव्हे. विद्वत्ता हे जीवनातले साध्य नसून साधन आहे.
१०. त्याने गरिबी भोगली, पण दैन्याला मनात प्रवेश करू दिला नाही. म्हणून पुण्यातल्या त्या अद्भुत चाळीतल्या एका खोलीतल्या संसारात वसंता खाटेवर असा ऐटीत बसायचा की त्या खाटेचे तख्त होऊन जायचे.
११. एका विलक्षण तळमळीने एखाद्या विषयात शिरणे हा त्याच्या पिंडाचाच धर्म होता. निष्काळजीपणाने काही करणे त्याला जमतच नव्हते.
१२. बालगंधर्वांचे गाणे ऐकत असताना मला एक गोष्ट सतत जाणवत आलेली आहे, ती म्हणजे ते फक्त गायला बसत. यापलीकडे काही सिद्ध करायला बसत नसत.
१३. वर्तमानाकडे संपूर्णपणाने दुर्लक्ष करून भूतकाळातल्या घटनांची नोंद करत राहणे म्हणजेच काही इतिहाससंशोधन नव्हे.
१४. ‘किमया’ हे माधवच्या पुस्तकाचेच नव्हे, तर जीवनाच्या तत्त्वज्ञानाचेच नाव वाटते. त्याचे डोळे भोवतालचा निसर्ग आणि मनुष्यनिर्मित कलासृष्टीकडे सदैव उत्सुकतेने पाहायचे. माधवच्या बोलण्यात कधी सैलपणा नसे. साधे बोलणेही उत्कट. त्याच्या जोडीला अत्यंत तल्लख विनोदबुद्धी. त्यामुळे त्याच्या पांडित्याचा डोह झाला नाही. ते प्रवाही होते, आल्हाददायक होते.
© भूषण कुलकर्णी