दुसरे नकोत काही उपचार चेहऱ्याचे
गालात हासणे हे शृंगार चेहऱ्याचे
कोणा रडू फुटेना, वा हासणे जमेना
आहेत खूप येथे आजार चेहऱ्याचे
थांबेल का कधी हा रस्त्यातला तमाशा?
जमतात भोवताली लाचार चेहऱ्याचे
तो भेटला असावा भोळ्याच भाविकांना
शोधून हारले ते बेजार चेहऱ्याचे
त्या थोर माणसाची तत्त्वे नकोत आम्हा
पुतळे पुजून करतो सत्कार चेहऱ्याचे
मज चेहरा स्वतःचा दिसणे कठीण आता
हे मुखवटेच झाले आधार चेहऱ्याचे
© भूषण कुलकर्णी