नवी सुरुवात होइल वाटले होते
पुन्हा पहिलेच पाउल टाकले होते
दिलासा चालताना लाभला इतका
कुणी वाटेत मागे थांबले होते
कधी कळली न त्याला मेहनत माझी
मुलाला एवढे लाडावले होते
खुळी स्पर्धा किती चढण्या-उतरण्याची!
जरी गाडीत एका चालले होते
मला होते खुणावत प्रश्न पर्यायी
तरी उत्तर रिकामे सोडले होते
पुन्हा फाटून गेले पान लिहिलेले
कितीदा नाव एकच खोडले होते
जुने सत्यच नव्या शब्दांत सांगितले
तुम्हाला वाटले, मी शोधले होते!
भूषण, खूप छान वाटले तुझ्या कविता वाचून. संवेदनशील लिहिल्या आहेत.
LikeLiked by 1 person