रात्रंदिवस कामामधे गुंतायचे असते
पण सांजवेळेला जरा थांबायचे असते
मेसेज पाठवला तिला मी गोड प्रेमाचा
म्हणते, अरे भेटून हे सांगायचे असते!
व्याख्या कुणी केली अशी ही लोकसेवेची
आहे स्वत:चे ते, म्हणे वाटायचे असते
मंथन करत राहूनही अमृत मिळत नाही
पाणी जरासे शांत राहू द्यायचे असते
एका क्षणापुरती नजर क्षितिजाकडे टाकू
नंतर पुन्हा रस्त्याकडे पाहायचे असते
वेळीच दे भिक्षा मला जी द्यायची आहे
नाही मिळाली तर पुढेही जायचे असते
-भूषण कुलकर्णी