आरसा

आरश्याशी द्वंद्व आता संपले आहे
मी स्वत:ला शेवटी स्वीकारले आहे

पाहिले तर खूप काही आजवर केले
पाहिले तर खूप काही राहिले आहे

आठवण छोट्यात छोटी साठवत जातो
काय माहित कुठकुठे मन गुंतले आहे!

एकदा मी तळ मनाचा गाठला होता
जायचे नंतर तिथे मी टाळले आहे

मी सरळ नाकापुढे पाहून चलणारा
इतर सगळे ईश्वरावर सोडले आहे

परिवार

निरनिराळे विचार लोकांचे
खूप येथे प्रकार लोकांचे

सुचत नव्हते उपाय प्रश्नावर
घेतले मग उधार लोकांचे

कोण चिंता करेल विश्वाची?
सर्व परिवार चार लोकांचे

आपला रंग दाखवत नाही
मन किती आरपार लोकांचे!

ठेवल्यावर गहाण लोकांना
शोभले सावकार लोकांचे

प्रश्न दिसतील आपले सोपे
त्रास काही निवार लोकांचे

जवळ जातील फार सत्याच्या
दु:ख इतके हुशार लोकांचे

फील आला

चाल पहिली हारल्याचा फील आला
डाव पुरता निसटल्याचा फील आला

येउनी गेलीस का तू याठिकाणी?
ही हवा झंकारल्याचा फील आला

ते गुलाबी ओठ जेव्हा पाहिले मी
पान माझे रंगल्याचा फील आला

ओळ तर साधीच होती बोललेली
पण उगाचच शिकवल्याचा फील आला

फेसबुक-इन्स्टा जरा उघडुन बघितले
मीच मागे राहिल्याचा फील आला

लक्ष्मणा, रेषा कुठे दिसलीच नाही!
मात्र ती ओलांडल्याचा फील आला

थांबलो क्षणभर तुझ्या दारात देवा
जन्म सगळा वाहिल्याचा फील आला

शिरजोरी

पकडली जाईल रे नक्की तुझी चोरी
वेगळी शक्कल लढव, तू सोड चाकोरी

सैल सोडत राहिलो माझ्याच बाजूने
समजले नाही तरी तुटली कशी दोरी

आजवर लिहिले किती ते मोजले नाही
माहिती आहे पुढे पाने किती कोरी

खूप काही मोकळे बोलायचे आहे
सांग तू केव्हातरी येशील सामोरी?

भाग्य, योगायोग, नियती, भोग अन् संचित
गोड नावांनी किती करशील शिरजोरी?

धावा

आता मागे घेतो माझा हरेक दावा
तुला मिळाला माझ्याविरुद्ध एक पुरावा

म्हणालात की मी अस्ताला गेलो होतो!
तुमच्या फिरत्या दुनियेचा हा दोष असावा

हरेक धावेला का होते तुझी चलबिचल?
उगाच साथीदार तुझा का बाद ठरावा?

कसे सुटावे माहित होते म्हणून फसलो
मला समजला होता तेव्हा तुमचा कावा

फक्त द्रौपदीचे रक्षण केलेस ईश्वरा
इतरांनी केला नव्हता का तितका धावा?

सुरुवात

नवी सुरुवात होइल वाटले होते
पुन्हा पहिलेच पाउल टाकले होते

दिलासा चालताना लाभला इतका
कुणी वाटेत मागे थांबले होते

कधी कळली न त्याला मेहनत माझी
मुलाला एवढे लाडावले होते

खुळी स्पर्धा किती चढण्या-उतरण्याची!
जरी गाडीत एका चालले होते

मला होते खुणावत प्रश्न पर्यायी
तरी उत्तर रिकामे सोडले होते

पुन्हा फाटून गेले पान लिहिलेले
कितीदा नाव एकच खोडले होते

जुने सत्यच नव्या शब्दांत सांगितले
तुम्हाला वाटले, मी शोधले होते!

ओळ

ती मला दिसलीच नसती तर…
आठवण बनलीच नसती तर…

रोज हुरहुर लावते आहे
ओळ ही सुचलीच नसती तर…

दिवस उत्तम चालला होता
बातमी कळलीच नसती तर…

वेगळा दिसतो अता पाउस
काल ती भिजलीच नसती तर…

जात होतो सरळ वाटेने
वाट ही वळलीच नसती तर…

छटा

कोण रंगारी मनाला रंगवत आहे?
नेमकी कुठली छटा तो दाखवत आहे?

कोणत्या रंगाविनाही छान दिसतो की!
चित्रकारालाच कागद थांबवत आहे

बालपण चित्रात आपण काढले होते
तेच रडवेल्या मनाला खेळवत आहे

बंद नव्हते दार त्याचे, किलकिले होते
आजही चित्रातले घर बोलवत आहे

पर्वताचे चित्र मी काढायला बसलो
पण झरा एकेक नेतो वाहवत आहे

शेवटी एकत्र केले रंग उरलेले
चित्र हे काळ्या छटांनी संपवत आहे

सावल्या

सर्व गावातल्या झोपल्या सावल्या
एक माझ्यातुझ्या जाहल्या सावल्या

पाय पडणार नाही प्रकाशावरी
पावलांना सदा बांधल्या सावल्या

जीवनाचा प्रवासी असा चालला
मिरवले ऊन अन् तुडवल्या सावल्या

ओल मातीत इथल्या सदा राहिली
माणसांच्या इथे झिरपल्या सावल्या

चांदणे सर्व घेऊन गेलीस तू
मात्र मागे तुझ्या राहिल्या सावल्या

नेमके काय घडले विचारू नका
काल भिंतीवरी हालल्या सावल्या

एवढा गर्द अंधार पडला कसा?
सर्व दुनियेतल्या सांडल्या सावल्या

तू अशानेच पडतोस काळा पुन्हा
रोज चरणी तुझ्या वाहिल्या सावल्या

गंमत

रोज फुलांना भ्रमर कोणता भेटत आहे?
बागेमध्ये वसंत कायम नांदत आहे

बऱ्याच वेळा नजरेतच ती रमून गेली
आता ओठांपर्यंत कविता पोचत आहे

जरा वेळ गेल्यावर दिसतिल पाझरसुद्धा
मातीमध्ये सध्या पाणी झिरपत आहे

पाहत बसतो झाडे, पाणी, वारा, पक्षी
मला वाटते कोणी काही सांगत आहे

तुझा गंध येऊन पोचला आहे येथे
तिकडे जाता बाग वेगळी लागत आहे

माझी तर दुनियाच इकडची तिकडे झाली
तुला वाटले दोन दिसांची गंमत आहे

मी सध्याला आतापुरते बोलू शकतो
शब्द उद्याचा उद्याचसाठी ठेवत आहे