पदर

सांगतो आहे उखाणा नाव कोणाचे?
भान थोडे ठेव सत्याचे नि स्वप्नाचे

भेट झाल्यावर कळाले खूप दिवसांनी
दूर गेलेलेच नव्हते लोक प्रेमाचे

येथल्या मातीत आहे वेगळे काही
वेगळे दिसतात येथे रंग पाण्याचे

स्वस्त माझ्याएवढा नाही कुणी येथे
ज्ञानही नाही तुला बाजारभावाचे

पाहिजे किंवा नको इतके मला कळते
आणखी नाहीत कुठले भेद नात्याचे

भावना कळल्यात सध्या हे पुरे आहे
पदर उलगडतील नंतर गूढ अर्थाचे

स्वातंत्र्य

हात हाती घेउनी चालायचे आहे
ध्येयही आपापले गाठायचे आहे

एवढे स्वातंत्र्य द्या प्रत्येक व्यक्तीला
गैरसुद्धा चांगले मानायचे आहे

मीठ, साखर वा कधी पाणी बनत गेलो
वाटले, लोकांमधे मिसळायचे आहे

सांग येऊ का तुला भेटायला आता
की तुला आधी कुणी भेटायचे आहे?

हात झाडाला तुझ्या लावायचा नाही
फूल पडलेले तिथे वेचायचे आहे

वळुन बघणाऱ्या मनाला सांत्वना देतो
याच वाटेने उद्याही जायचे आहे

अस्त होऊ द्या मला वेळेत बाबांनो
परत वेळेवर उद्या उगवायचे आहे

वारा

राहता येणार नाही ठाम शब्दावर
भरवसा नाही अता एकाच अर्थावर

फक्त मोठे ध्येय ठेवुन फायदा नाही
चालताना बदलतो बघ रंग क्षितिजावर

गाठला मुक्काम पण मी थांबलो नाही
एवढा जडला कसा हा जीव रस्त्यावर

क्षणभरापुरते रिकामे वाटते आहे
मग पुन्हा होईल काही स्वार ह्रदयावर

तो तुझ्या इच्छेविनाही गंध पसरवतो
एवढा नाही बरा विश्वास वाऱ्यावर

लाट प्रेमाची कधीची ओसरुन गेली
वाट पाहत राहिले कोणी किनाऱ्यावर

गुपित

कितीही छान वळणावर कधी थांबायचे नाही
मनाला लाख सांगितले कुठे गुंतायचे नाही

तुला विश्वास माझ्यावर किती आहे ठरव आधी
पुढे ठरवू, जगाला भ्यायचे की भ्यायचे नाही

फुलावर काल भ्रमराला कळीने पाहिले होते
तरी कोणी तिला सध्या गुपित सांगायचे नाही

कधी चालायला शिकलो, मला ते आठवत नाही
पुढे म्हणता न आले की मला चालायचे नाही

कधीतर आडवाटेने पुढे लागेल चालावे
म्हणुन का सरळ रस्त्याने कधीही जायचे नाही?

मला आकाशगंगेने कळवले सत्य सूर्याचे
भटकतो तो कुणाभवती, खरे वाटायचे नाही

निरागस किलबिलाटाने मनाचे दार वाजवले
मना तू ऐक पक्ष्यांचे, अता बोलायचे नाही

मूर्ती

छानशा वळणावरी आयुष्य थोडे थांबले
अन् पुढे चालायचे बळ त्या शिदोरीने दिले

ऐकतो सगळे नवे अन् दादही देतोच की
पण जुन्या गाण्यांत मिळते खास काही आपले

तीळ गालावर तुझ्या अन् गूळ ओठांवर तुझ्या
बघ तुझे पंचांग म्हणते, उत्तरायण लागले

अंबराचा स्पर्श झाला एकदा केव्हातरी
त्यापुढे मातीवरी सगळे सुखाने राहिले

युद्ध त्यांनी जिंकले पण द्वेष नव्हता संपला
दुश्मनाचे प्रेतसुद्धा शेवटी लाथाडले

देव मानू की नको, चर्चा सुरू मूर्तीपुढे
मी पुढे जाऊन केवळ फूल त्यावर वाहिले

पर्याय

एक नवा पर्याय गवसला
प्रश्न आणखी अवघड बनला

काया, वाचा वा ह्रदयावर
जीव कशावर आहे जडला?

प्रेमापत पोचलाच नाही
जरी खूप होता आवडला

चित्राची आकृती दिलेली
रंग भराया जन्म आपला

चित्र पूर्ण झाल्यावर कळले
योग्य तिथे तो ठिपका पडला

जुन्या चुका मी विसरुन गेलो
गुन्हा अशातच मोठा घडला

जरा वेळ आकाश पाहिले
पुन्हा आपल्या घरी परतला

कधीतरी जप करून म्हणतो
तुला किती आळवू विठ्ठला!

बाळकृष्ण

सोबती होते तरीही एकटे वाटायचे
दूर असलेलेच कोणी आपले वाटायचे

यार, जाणवलीच नाही बिलगलेली पौर्णिमा
दूर जे चमकायचे ते चांदणे वाटायचे

केवढ्या उशिरा समजले की तिथे होते झरे!
त्या ठिकाणी रोज सगळे कोरडे वाटायचे!

आज अंधारात त्यांची पाहिजे सोबत मला
भरदुपारी जे निकामी काजवे वाटायचे

ऐकुनी विश्वासही बसणार नाही रे तुझा
काय सांगू, कोण तेव्हा सोयरे वाटायचे

बाळकृष्णाची छबी दिसली मला त्याच्यामधे
राग आल्यावर कधी ते कारटे वाटायचे

लाभली दृष्टी नवी जेव्हा तुला मी पाहिले
मात्र पूर्वी प्रेम म्हणजे आंधळे वाटायचे

© भूषण कुलकर्णी

सांजवेळी 

गदिमा म्हणायचे, प्रत्येक कलाकृतीची स्वत:ची कुंडली असते. या गझलेबद्दल मी हे अनुभवलं. वैभव जोशी सरांनी गीतलेखनाची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली होती. पहिल्या दिवसानंतर आमच्या निवडक वृत्तबद्ध कविता पाठवायला सांगितल्या होत्या. तेव्हा मी ही गझल पाठवली, सरांना खूप आवडली, आणि श्रेयस बेडेकर यांनी मला बक्षीस म्हणून लगेच चाल लावली. दुसऱ्या दिवशी ती ऐकण्याचा क्षण अविस्मरणीय होता! एका रात्रीत मी गीतकार झालो होतो!!

वैभव सर म्हणाले होते, “एक गझल अशी आली की पुन्हा एकदा मला असं वाटून गेलं, अरे चुकली आपली बस, अपने को ये लिखना चाहिये था…”

ही दाद कायम प्रेरणा देत राहील मला आणखी चांगलं लिहिण्यासाठी!

श्रेयस सरांचे खूप आभार, मनात कायम राहील अशी चाल लावली आहे. संगीत संयोजक सत्यजित केळकर आणि सर्व वादकांचे खूप आभार. वैभव सरांमुळे हे सगळं शक्य झालं, त्यांना खूप खूप धन्यवाद!

हे गाणं नक्की ऐका:

कला

जितके अपुल्या कलेमधे ते मुरले होते
सादर केल्यानंतर तितके झुकले होते

तुझ्याच आठवणीत पुन्हा हा दिवस चालला
तूही क्षणभर मला कदाचित स्मरले होते

तुला पाहिजे होता सगळा सुगंध तेव्हा
अपुले नाते अजुन कुठे उलगडले होते?

एक छानशी कविता सुचली म्हणून हसलो
तुला वाटले, मला कुणी आवडले होते

अनेक सुंदर प्रवेश होते नाटकामधे
शेवटच्या अंकात स्वप्न ते सरले होते

निघतानाही वळून पाहू वाटत होते
जणू आपले काही मागे सुटले होते

© भूषण कुलकर्णी

शपथ

निसर्ग झंकारून सांगतो
मला हवी ती धून सांगतो

तुला कधी सापडलो नाही
थांब जरा शोधून सांगतो

समोरचा ऐकणार नाही
उगाच समजावून सांगतो

वाढदिवस हा आहे कितवा?
या ज्योती विझवून सांगतो

शेवट वा सुरुवात जमेना
माझा महिना ‘जून’ सांगतो

कायमचा विसरेन तुला मी
तुझी शपथ घेऊन सांगतो

किती रंग माझ्यात आणखी?
अता अस्त होऊन सांगतो

© भूषण कुलकर्णी