तो चालत होता… झपझप पावले टाकत चालत होता. एक पाऊल टाकल्यावर फक्त पुढल्या पावलापुरतेच पाहायचे असते. आजवरच्या अनुभवांतून एवढे तरी तो शिकला होता. त्या पुढचे पाहण्यापुरता प्रकाश नसतो, आणि वेळ तर नसतोच. एक दोन एक दोन… पावले पडत होती. एक आणि दोन – हे दोनच आकडे. पुढच्या आकड्यांची गरज काय? तसं पाहिलं तर, मी थांबलो की शून्य हा आकडाही येईल ना? ठीक आहे मग, शून्य एक दोन हे महत्वाचे, त्याला वाटलं.
तो चालत होता… एक दोन एक दोन… पावले पडत होती. त्याला वाटले, दोन या आकड्याची सुद्धा गरज आहे का? गती दाखवण्यासाठी एक हाच आकडा पुरेसा होईल ना? दोन आलं की द्वंद्व येतं. उजवं आणि डावं पाऊल हे द्वंद्व कशाला हवं? एका वेळेला एक पाऊल हेच महत्वाचं ना? मागच्या आणि पुढच्या पावलाचा विचार कुठे उरलाय आता? बरोबर आहे, एकच पाऊल महत्वाचं. एक एक एक… तो चालू लागला.
तो चालत होता… एक एक एक… एका वेळी एक पाऊल पडत होतं. त्याला वाटलं, हेच तर सत्य आहे, हेच तर कर्म आहे. एक म्हणजे गती. मी चालतोय, म्हणजे एक, मी थांबलो की शून्य. शून्य आणि एक… यात सगळं आलं. हे दोनच आकडे महत्वाचे. पुढचं काय करायचंय? अरे… पण पुन्हा दोन आलाच की! शून्य आणि एक हे दोन आकडे, म्हणजे पुन्हा द्वंद्व आलंच! ठीक आहे, दोन सुद्धा महत्वाचा. शून्य एक दोन… शून्य एक दोन… त्याचे विचार चालू होते, पावले पडत होती.
तो चालत होता… शून्य एक दोन… शून्य एक दोन… पावले पडत होती. आता त्याची गफलत होऊ लागली. त्याचे विचार आणि पावलांची गती यांचा ताळमेळ बसत नव्हता. आधी छान होतं, एक दोन एक दोन, पावले पडत होती. आता शून्य आला ना, कधी एका पायाला एक म्हणलं, मग त्याच पावलाला पुढे दुसरा आकडा. पुन्हापुन्हा गणित चुकत होतं. तसं पाहिलं तर जे चुकतं तेच गणित असतं. जे सुटलं, ते कसलं गणित!
तो चालत होता… शून्य एक दोन… शून्य एक दोन… पावले पडत होती. त्याचं गणित चुकत होतं, गती अडखळत होती. पण विचार चालू होते. त्याला वाटलं, शून्य जास्त महत्वाचं वाटत होतं ना, घे आता. शून्याचं कामच हे असतं. कशातही शून्य मिसळला की त्याचं महत्व कमी होणार. शून्याचा विचार आला, की गती मंदावणार! पण तरी शून्य महत्वाचं आहेच ना. शून्य गेलं की थांबण्याचा विचारही गेला. शून्य हवंय. मग दोन नको का? द्वंद्व तर राहणार, मग दोन कसं काढायचं? मग एक सोडला तर? पण एक सोडला, तर शून्य आणि दोन यांचा संबंध काय राहणार? एक आहे, म्हणून तर दोन आहे. काय करावं? काय महत्त्वाचं, काय सोडायचं? तो चालत होता… पावले पडत होती… शून्य… एक… दोन… शून्य एक दोन… एक दोन, एक दोन… शून्य एक, शून्य एक… शून्य एक दोन एक दोन एक दोन शून्य…
-भूषण कुलकर्णी