कालचक्र

कालचक्र फिरते हवेत, की जमिनीवर?
फिरते तिथेच, की कापत असते अंतर?

अमृृृत निघेलही मंथनातुनी नंतर
पण विष पीणारा नाही येथे शंकर

संपूर्ण लक्ष वाटेवरील काट्यांवर
पाहताच आले नाही कुठले अंबर

राहते सलत एक चूक पुण्यात्म्याला
पडतात कमी पाप्यांना पापे शंभर

जेवढा व्यथांना मी समजावत जातो
त्रास तेवढा देत राहती वरचेवर

इतका कचरा ह्रदयात साठला माझ्या
हे होईल कधी देवा फक्त तुझे घर?

© भूषण कुलकर्णी

रावण

वेगळासा अर्थ घेऊ लागली रामायणे
रावणाच्या सद्गुणांची चालली पारायणे

थोर भक्ती रावणाची, मान्य हे केले जरी
शिवसमर्पण राघवाचे आठवावे अंतरी
सोडल्याविन मीपणा का होतसे भक्ती खरी?
भक्तीतेजाला ग्रहण लागे अहंकारीपणे
रावणाच्या सद्गुणांची चालली पारायणे

राम भरतास्तव स्वतःचे राज्यवैभव त्यागतो
अन् दशानन जाणत्या बंधूसही झिडकारतो
राज्य अन् परिवार युद्धाच्या दिशेने हाकतो
मात्र बहिणीस्तव पहा सीताहरण केले म्हणे!
रावणाच्या सद्गुणांची चालली पारायणे

ही सवय आता जगाचे सत्य झाकू लागली
दुर्जनांच्या दुर्गुणांना देत माफी चालली
सरमिसळ दुष्कर्म अन् दुर्भाग्य यांची वाढली
आपले कर्तव्य आहे सत्य जे ते शोधणे
रावणाच्या सद्गुणांची चालली पारायणे

©️ भूषण कुलकर्णी

कवडसे

ओळखू मज कसे?
गूढ हे आरसे

ठेच पुढच्यास अन्
वाटते हायसे

आठवांनी धरे
वेदना बाळसे

पायवाटा कमी
खूप त्यांवर ठसे

हीच चिंता सदा
कोण आम्हा हसे?

चेहरे भरजरी
आत ना फारसे

फक्त काया इथे
दूरवर मन वसे

जे न देखे रवी
तेच हे कवडसे

© भूषण कुलकर्णी

मागे

जीव माझा फार हल्ली गुंततो मागे
वर्तमानाच्या क्षणांना सोडतो मागे

धावण्याचा वेग माझा हा खरा नाही
धावतानाही नजर मी फिरवतो मागे

फूल-काट्यांचे जिथे भांडण सुरू होते
नेमका मुद्दा ‘कळी’चा राहतो मागे

बोलणे त्याचे मनावर घ्यायचे नाही
जो कुणाची पाठ फिरता बोलतो मागे

रीत प्रगती मोजण्याची ही बरी नाही
कोण कोणाला कितीने टाकतो मागे

वाट चुकण्याची भिती नाही पुढे जाता
जर कुणीतर वाट माझी पाहतो मागे

© भूषण कुलकर्णी

सांजवेळी

क्षण ऊनसावल्यांचे सरतील सांजवेळी
सारेच सारखे मग दिसतील सांजवेळी

तुलना उगाच होते वेगात धावण्याची
सारे थकून खाली बसतील सांजवेळी

मिळतील चालताना कित्येक सोबतीला
जे कोण आपले ते कळतील सांजवेळी

शोधायला निघाले दाणे मनाप्रमाणे
घरट्याकडेच पक्षी वळतील सांजवेळी

ओसाड पार हल्ली हे स्वप्न पाहतो की
एकत्र लोक येथे जमतील सांजवेळी

घडल्यात ज्या चुका अन् जे साधता न आले
बाबी लहानमोठ्या छळतील सांजवेळी

सगळाच वेळ गेला देवाशिवाय ज्यांचा
ते दीप देवपूजा करतील सांजवेळी

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

वेळ नाही

फुले चार वेचायला वेळ नाही
इथे फार थांबायला वेळ नाही

कुणी सांगते वाट, ती चालतो मी
नवी वाट शोधायला वेळ नाही

सुरू राहते जन्मभर ध्येयमाला
तरी ध्येय समजायला वेळ नाही

सुखे प्राप्त करण्यास केली तपस्या
सुखे तीच भोगायला वेळ नाही

जरा बोललो तेच समजून घ्यावे
मला जास्त बोलायला वेळ नाही!

© भूषण कुलकर्णी

पाहिजे

रोज काहीतरी नवे पाहिजे
हे मिळाले, अजून ते पाहिजे

लक्ष मातीकडे कुणी द्यायचे?
सर्व लोकांस चांदणे पाहिजे

लक्ष देऊ नकोस इतरांकडे
अन्यथा वाटते, तसे पाहिजे

हीच या धावत्या जगाची कथा
फक्त अन् फक्त पाहिजे, पाहिजे

भरप्रवाहातही मला वाटते
की जरावेळ थांबले पाहिजे

© भूषण कुलकर्णी

थेट बोलतो मी

काळजातून काळजाला थेट बोलतो मी
एकदा मैफिलीत माझ्या भेट बोलतो मी

मेणबत्तीस आज वाली राहिला न कोणी
होउनी तू मशाल आता पेट बोलतो मी

शोधता शोधता किनारा मी थकून जातो
आणि होडीस याच माझ्या बेट बोलतो मी

जे असे आपले, म्हणावे तेच सत्य सारे
बोलणे हे असेच पुढती रेट बोलतो मी

घर तुला तर मिळेल रसिकांच्या मनात कविते
पण कवाडास किलकिल्या त्या खेट बोलतो मी

© गोपीनाथ आणि भूषण

हुरहुर

कसा खेळ दैवी कुणाला कळेना
कुणाला मिळे ते कुणाला मिळेना

सुवर्णाक्षरांसारखे कार्य केले
तरी नाव साधे इथे आढळेना

खुणा आपल्या दुःख ठेवून जाते
सुखे मात्र गेल्यास काही उरेना

जिथे जन्मली वेदशास्त्रे, पुराणे
तिथे स्त्रीत्व काही कुणा आकळेना

जरी डाव आता न हातात माझ्या
मनातील ही व्यर्थ हुरहुर टळेना

© भूषण कुलकर्णी

डोह

सिद्धी कुणास मिळते यत्नांशिवाय काही?
हातात काय अपुल्या हातांशिवाय काही?

सारेच डोह माझ्या हृदयात साठवावे
येऊ नये किनारी लाटांशिवाय काही

कुठल्याच गाढवाच्या चालू नकोस मागे
मिळणार ना कधीही लाथांशिवाय काही

वेगात चालण्याचे फसतात बेत सारे
मार्गात या मिळेना ठेचांशिवाय काही

© भूषण कुलकर्णी