चेहरा

दुसरे नकोत काही उपचार चेहऱ्याचे
गालात हासणे हे शृंगार चेहऱ्याचे

कोणा रडू फुटेना, वा हासणे जमेना
आहेत खूप येथे आजार चेहऱ्याचे

थांबेल का कधी हा रस्त्यातला तमाशा?
जमतात भोवताली लाचार चेहऱ्याचे

तो भेटला असावा भोळ्याच भाविकांना
शोधून हारले ते बेजार चेहऱ्याचे

त्या थोर माणसाची तत्त्वे नकोत आम्हा
पुतळे पुजून करतो सत्कार चेहऱ्याचे

मज चेहरा स्वतःचा दिसणे कठीण आता
हे मुखवटेच झाले आधार चेहऱ्याचे

© भूषण कुलकर्णी

दुतर्फा

जीवनकथा स्वतःची ते सांगतात मित्रा
ते दोनचार किस्से पण गाळतात मित्रा

झाडे उभी दुतर्फा याचीच साक्ष देती
रस्त्यात जे न येती, ते वाचतात मित्रा

क्षितिजापलीकडेही जाणे अशक्य नाही
क्षितिजापुढील वाटा पण उतरतात मित्रा

सार्‍या जगात आता सुविचार फार झाले
आहेत कोण येथे जे वागतात मित्रा?

नाहीत आळशी ते अर्ध्यात थांबलेले
पण वाट शोधताना घोटाळतात मित्रा

माणूस एकदा का आतून खचत गेला
सारे दुरावलेले मग वाटतात मित्रा

© भूषण कुलकर्णी

पापणी

ही काही रोजची सजावट तर नाही
काही साधायचा तुझा कट तर नाही?

भरती आली, पूर कधी आला नाही
ही पापणी जणू सागरतट तर नाही?

म्हणतेस नेहमी ‘फक्त मित्र’ हे माझे
सर्वांना ते वाक्य सरसकट तर नाही?

केलीस आज मदत मनापासून जरी
होणार उद्या वसुली दुप्पट तर नाही?

नम्रता तुझ्या वागण्यात दिसते आहे
तुजवर आले कुठले संकट तर नाही?

कोठून कसा नवीन सुगंध हा आला?
हा पण कृृृृत्रिम आणि बनावट तर नाही?

केलेत वार पण घाव दिसेना काही
ही लेखणीच माझी बोथट तर नाही?

क्षितिजापलीकडे काहीच दिसत नाही
सीमित करणारी ही चौकट तर नाही?

ठेच वाटेतली प्रश्न घेउनी येते
येथेच प्रवासाचा शेवट तर नाही?

© भूषण कुलकर्णी

भावाचं लगीन

सार्या गावचे डीजे बोलवा रे
आपल्या भावाचं लगीन हाय, वाजवा रे!

तेच ते रडगाणं वाजवू नको
सीरीयस बोरछाप लावू नको
नवंनवं भारीभारी हुडका रे
आपल्या भावाचं लगीन हाय, वाजवा रे!

तेलगू इंग्लीश बी चालतंय की
आन् सैराट असंल तर पळतंय की!
तुमी आवाज बिनधास्त वाढवा रे
आपल्या भावाचं लगीन हाय, वाजवा रे!

आपला भाऊ घोड्यावर बसलेला हाय
लय ऐटीत राजावानी सजलेला हाय
त्यालाबी नाचायला बोलवा रे
आपल्या भावाचं लगीन हाय, वाजवा रे!

© भूषण कुलकर्णी

सहज कुणाला भेटला राम?

सहज कुणाला भेटला राम?

दशरथाने स्वधर्म रक्षिला
पुत्रावीण चिंतित राहिला
शरयूतीरी यज्ञ योजिला
किती थोर दानधर्म केला!
तेव्हा तिथे अवतरला राम
सहज कुणाला भेटला राम?

अहिल्या झाली होती शिळा
जगताची जाण नुरली तिला
श्रीरामाच्या चरणांपाशी
त्या जीवनाचा अर्थ सगळा
म्हणून शेवटी कळला राम
सहज कुणाला भेटला राम?

आश्रमात राहिली शबरी
सेवा गुरूंची केली खरी
श्रीरामाच्या आगमनाच्या
प्रतीक्षेत होती जन्मभरी
म्हणून तिथे विसावला राम
सहज कुणाला भेटला राम?

दशरथासम यज्ञ जमेना
शबरीसम सेवा घडेना
अहिल्येसम श्रीचरणांविना
इतर जगाचा भास चुकेना
तरी कुणी मज भेटवा राम!
तरी कुणी मज भेटवा राम!

© भूषण कुलकर्णी

बहाणे

पुन्हा सोडण्याचे बहाणे नको
नको सोबतीला शहाणे नको

मला शोधण्या मी निघालो अता
जुन्या ओळखीचे उखाणे नको

जया हक्क आरक्षणाचा नसे
असे नामधारी घराणे नको

मला माय माझी मराठी म्हणे
पुन्हा मुंबईहून ठाणे नको

जिथे राजनेता जराही दिसे
अशा राजमार्गास जाणे नको

इथे रोज रणशिंग फुंकायचे
वसंता, तुझे गोड गाणे नको

© भूषण कुलकर्णी

किनारा

कोण जाणे दूर कोठे तो किनारा राहिला?
सोबतीला आज माझ्या फक्त वारा राहिला

वाहिले सर्वस्व माझे, काय झाले शेवटी?
सागरी गेली नदी पण तोच खारा राहिला

मी सजा भोगून आता लोटली वर्षे तरी
येथला माझ्याच नावाचा पुकारा राहिला

व्यक्त होण्याची किती आहेत येथे साधने!
का तरीही भावनांचा कोंडमारा राहिला?

काय खोटे अन् खरे, आता तपासावे कसे?
माहितीचा केवढा येथे पसारा राहिला!

ही नवी भाषा निसर्गाची कळेना मानवा
रोज खालीवर कितीदा होत पारा राहिला!

आठवेना देश ह्या सामान्य लोकांना अता
शक्तिशाली मात्र सीमेवर पहारा राहिला

© भूषण कुलकर्णी

बेत

अंतरी बेत सजवून घे थोडे
भाग्य पाहून जुळवून घे थोडे
 
वाट पाहू नको त्या वसंताची
तू स्वतः आज बहरून घे थोडे
 
पाहवेना अता ते समाजाला
आपले सौख्य लपवून घे थोडे
 
एवढा बोलका मी जरी नाही
सत्य ते तूच वदवून घे थोडे
 
आज मोर्चा निघे देशभक्तांचा
त्यामध्ये पाप दडवून घे थोडे
 
© भूषण कुलकर्णी
 

मार्ग प्रगतीचा

मार्ग प्रगतीचा खुणावत गेला
गंध मातीचा दुरावत गेला

वाट ध्येयाची बरोबर होती
अर्थ ध्येयाचा वहावत गेला

पाहिली साधीसुधी मी स्वप्ने
भार त्यांचाही दुखावत गेला

राहिली दुःखे मनातच माझी
आपली जो तो सुनावत गेला

पालकांनी कार्य केले त्यांचे
‘खो’ दिला अन् पाल्य धावत गेला

लागलेले हे सुतक जीवनभर
श्वास जो आला, दगावत गेला

© भूषण कुलकर्णी

युद्ध

थांबून मी घाव गोंजारले होते
तेव्हाच युद्धामधे हारले होते

टाकून शस्त्रे समर्थन दिले त्यांनी
म्हणती, अहिंसेस स्वीकारले होते!

त्यांची खरी साथ युद्धामधे आहे
जे वीर माझ्यापुढे वारले होते

दाही दिशांनी जरी घातला वेढा
माघार घेण्यास नाकारले होते

आहे जगवले मला याच युद्धाने
कोठे तहांनी मला तारले होते?

नाही कळाली खबर त्यास विजयाची
अद्याप ते राज्य अंधारले होते

© भूषण कुलकर्णी