हिशेब

जरी अता कोसळेन मी
पुन्हा नव्याने रुजेन मी

नवीनवी रोज सांत्वने
तयांसही सावरेन मी

हिशेब का रोज मांडतो
कुणाकुणाला रुचेन मी?

उगाच हासू नका मला
क्षणाक्षणाने रुळेन मी

म्हणे मला कल्पवृक्षही
सुयोग्य वेळी फळेन मी

मनात जे डोह साचले
विठूपुढे पाझरेन मी

© भूषण कुलकर्णी

होलिका

किती छानशी वाटते एक इच्छा!
मनी ठाण ती मांडते एक इच्छा…

तिचा ध्यास घेऊन मी चालतो अन्
मला घेउनी धावते एक इच्छा

उभी शांत देवापुढे भावभक्ती
भिकेला तिला लावते एक इच्छा

भले पाहताना भल्या माणसांचे
उगा अंतरी बोचते एक इच्छा

चिता जाळली या मनाची तरीही
जणू होलिका, राहते एक इच्छा…

स्वयंवर हिचे मांडले कावळ्यांनी
बघू, कोण स्वीकारते एक इच्छा!

© भूषण कुलकर्णी

मेणबत्ती

मस्तीत अंतरीच्या झिंगून चालतो मी
वाटेत सत्य थोडे वेचून चालतो मी

आला वसंत तेव्हा नाही कधी कळाले
ध्येयाकडेच डोळे लावून चालतो मी

ऐकूच येत नाही त्यांचा जिवंत टाहो
आत्म्यास मेणबत्ती घेऊन चालतो मी

शौकीन कर्ज त्यांना फेडायला जमेना
मग वर्गणी जराशी देवून चालतो मी

पाहू कसे निराळे हे रंग माणसांचे?
डोळे पुन्हा स्वतःचे झाकून चालतो मी…

© भूषण कुलकर्णी

निखारे

काय मागे राहिले चालताना
मी न मागे पाहिले चालताना

राहिले नाही कुणी सोबती ते
त्यांस मागे टाकिले चालताना

थांबले तेथेच का पाय दोन्ही?
आपसी जे गुंतिले चालताना!

मी पुढे का तू पुढे हेच चाले
पाय वेडे भांडिले चालताना!

वाटला होता भिकारी जगाला
दान शब्दांचे दिले चालताना

काल ज्यांनी दाविली वाट होती
आड माझ्या ठाकिले चालताना

जाळती वाटेतल्या आडकाठ्या
ते निखारे पेटिले चालताना…

© भूषण कुलकर्णी

चढाई

सांगताना सत्य विद्रोही बनावे लागले
शेवटी धंद्यात खोट्याच्या मुरावे लागले

पार केली ती चढाई त्रास झाला एवढा
तोल सांभाळायला थोडे झुकावे लागले

कार्य हे माझे नव्हे अन् मार्ग हा माझा नव्हे
हे कळाया एवढी वर्षे शिकावे लागले

बालकाच्या ज्या कलेचा बोलबाला जाहला
सोंग ते आजन्म त्याला वागवावे लागले

शांततेने बोललो तेव्हा न त्यांनी ऐकले
शांततेसाठीच हाती शस्त्र घ्यावे लागले

आसवांनी मैफिली शृंगारलेल्या सर्वदा
हासणे साधे बिचारे आवरावे लागले

पामराला भेट व्हावी पांडुरंगाची कशी?
थोर संतांना किती त्या आळवावे लागले…

© भूषण कुलकर्णी

साक्ष

किती सोनेरी ते पळ होते
दिसले सोने जे पितळ होते

गाळ सारा साठला तळाशी
वरवरचे पाणी नितळ होते

म्हणे शब्दांनी गफलत केली
मन तरी कोठे निर्मळ होते?

ही अदब कुठून आली दोस्ता?
पूर्वीचेच हास्य निखळ होते

वाट मला ओळखीची होती
पण ठेचकाळणे अटळ होते!

तुझी माझी चूक नव्हती कधी
पण साक्ष पुरावे सबळ होते!

© भूषण कुलकर्णी

अस्त

सूर्य जाताना लयाला रंग सारे देखणे
त्याचसाठी काय अस्ताचे तुझे हे मागणे?

आज म्हातारा सुखी त्याच्या घरी आली मुले
का कुणी तेथे वकीला धाडले बोलावणे?

चांगली कामे तुझी अन् अंतरीही गोडवा
का तरी वाटे अताशा कोरडे ते बोलणे?

टाळले तू शब्द माझे काळजीचे कैकदा
वेळ गेल्या का कळावे आजचे हे सांगणे?

युद्धजेत्या, अंतरीचा द्वेष आता सोड रे
शोभते का दुश्मनाचे प्रेत ते लाथाडणे?

© भूषण कुलकर्णी

कळाले

भासते की खूप काही खास आम्हाला कळाले
लागणारी ठेच सांगे काय कोणाला कळाले!

काल सा-यांना कळाला दानवीराचा ठिकाणा
राहिला तोही न दानी त्या जमावाला कळाले

आणता डोळ्यांत पाणी लाभ ना होणार काही
अंतरी आहे तुझ्या ते आज वेड्याला कळाले…

उत्तरे शोधून झाली सापडेनाशी पुन्हा ती
मानतो आनंद काही प्रश्न जीवाला कळाले!

सांग गं सारे खरे आता पुरे झाले इशारे
मी मनी खातोय मांडे जे न कानाला कळाले!

काळ तो शेतात आला प्राण नेण्याला तयाचे
सोडले आधीच त्याने प्राण काळाला कळाले

© भूषण कुलकर्णी

लाट

आमुच्या राजाकडे रे वैभवाचा थाट आहे
ते तिथे धुंदीत, लोकांचे रिकामे ताट आहे!

राजवाडा भव्य तो, सारी सुखे राजापुढे रे
सत्य त्याला कोण सांगे, जो दिसे तो भाट आहे

चांगल्या कामातही का पावले मागे पडावी?
पाप सारे आज येथे हिंडते मोकाट आहे

गुंतलो कामात थोडासा उशीरा काय आलो
संशयाचे अन् सवालांचे धुके का दाट आहे?

संग थोडे चालले जे, ते वळाले, दूर गेले
जीवनाची या कशी ही नागमोडी वाट आहे!

श्रावणी पाऊस गेला, ढाळतो पाने अता रे
एकटा मी त्या सरींची पाहतो का वाट आहे?

भेटती कित्येक काही ना कधीही वाटले रे
संगती वाहून नेणारी कशी ही लाट आहे!

© भूषण कुलकर्णी

गोपीसाद

तव मुरलीविन उदास यमुनाकाठ
दह्यादुधाची हंडी पाहती तुझी वाट
आठवते पुन्हा शरदातील रासलीला
एकदा गोकुळा ये गोपाळा!

बालपणी खेळ, खोड्यांत रमलास
लहानच होतास, मथुरेस गेलास
मग राहिल्या आठवणी, येतात वार्ता
तुझे कार्य थोर, कळते भगवंता
परि कशी समजावू वेड्या मनाला
एकदा गोकुळा ये गोपाळा!

तू द्वारकाधीश, सुदर्शनधर
माझ्या मनी बालक खोडकर!
जपण्यास त्या बालमूर्तीला
येत नसशील तू गोकुळा
परि घ्यावे बालरुप, विनविते तुजला
एकदा गोकुळा ये गोपाळा!

© भूषण कुलकर्णी