वहिनी

कधी एकीला फोन, कधी दुसरीबरोबर
कुणाला वहिनी म्हणू, सांग तरी खरोखर!

पर्सनॅलिटी दांडगी तुझी, वळती सर्व बाला
तू ठरतोस हिरो, आम्ही मात्र दादा!

कित्येक बाला येतात, तसाच शांत राहतोस
कधीतरी मग अशी भेटते, तू घायाळ होतोस!

आपलं तसं काही नाही, असं सारखं म्हणतोस
ती दुसर्याला बोलली, की तोंड पाडून बसतोस!

सोडून जाता बाला, चढेपर्यंत घेतोस
पुन्हा चार दिवसांनी प्रेमगीत गातोस!

प्रेमाची, विरहाची तुझी भावना, कल्पना, कविता
कुणाला वहिनी म्हणू, सांगून टाक आता!

© भूषण कुलकर्णी

सूर्यपुत्र

अंधारात चाचपडताना मला मार्ग दाखवलास
कृष्णा, या सूर्यकिरणाला तू प्रकाश दाखवलास!

कवच, कुंडले, आकर्षण सूर्याचे
रहस्य उलगडले आज जन्माचे!

पण जो मार्ग दाखवलास, तो मागे राहिला
सत्य कळावयास फार उशीर जाहला!

यशोदेस सोडलेस तू देवकीनंदना
पण मी कसा विसरू राधामातेला?

दुर्योधनाची मैत्री, सूतांचे प्रेम जगणार
हा सूर्यकिरण एकाच दिशेने जाणार!

अपमानाच्या पर्वतांवरही ठाम उभा राहील
हा सूर्यकिरण सारे कृष्णमेघ छेदून जाईल!

© भूषण कुलकर्णी

दीपकज्योती

IMG_20171017_110547

तेल, वात, हवा, हे स्थान आणि अग्नी
पंचतत्त्व एकत्र येता बनते मी ज्योती…

काचेचा महाल असो वा मातीची पणती
घरातील बैठक असो वा देवाची समई
दीपमाला सोबतीला वा असेन एकाकी
सदा प्रकाशते, तेच तेज, तीच ज्योती!

तेल किती, वात किती, याची चिंता कशासाठी?
पाऊस-वार्याची चाहूल जरी, नसे हुरहुर मानसी!
मालक रक्षण करेल का, ही शंका नको अंतरी
हा क्षण उजळते, तेच तेज, तीच ज्योती!

वारा सुटता तडफडते, पण मुळास धरून राहते
पुन्हा नव्याने उभारी घेते, मी ज्योती तेवत राहते…

© भूषण कुलकर्णी

अंताक्षरी

तीन पिढ्या एकत्र येतो
दूरचे नातेही बळकट करतो
सप्तसुरांत सर्व गुणगुणतो
आज अंताक्षरीचा खेळ रंगतो

आजी गुणगुणते जात्यावरची ओवी
भरदुपारी कोणी गाते उगाच अंगाई
भूपाळी, आरत्यांसह लावणीही गातो
आज अंताक्षरीचा खेळ रंगतो

कोणी गाते भक्ती-भावगीते
कधी धडाक्यात वाजती सिनेगीते
किशोर, रफी यांना श्रद्धांजली देतो
आज अंताक्षरीचा खेळ रंगतो

आठवणींचे कप्पे पुन्हा उजळतो
एखादी धुन ऐकून भारावतो
कवितांचा नव्याने आस्वाद घेतो
आज अंताक्षरीचा खेळ रंगतो

© भूषण कुलकर्णी

एकांत

चंद्राकडे पाहतानाही शांत राहते मन
एकटाच सुखी आहे, नको कोणाची आठवण!

वर्षाधारा, रेशीमधागा, गुलाबपाकळ्या, शुभ्र चांदण्या
आहेत तशा असू देत, नको कोणाची उपमा!

गुलाबी थंडी असो, वा बहर वसंताचा
एकटाच मजा करतो, नको विरह विकतचा!

मन, ह्रदय, कविता, भावना, आहेत आम्हालाही
काय बिघडले जर ते नाही दिले कोणालाही?

दिसेल कोणी सुंदर, बोलणेही मधाळ
पुढील योजना बसून बोलू, उगाच का तळमळ?

मिळेल तेव्हा मिळेल ती, आज रहा निवांत
पुन्हा मिळेल का सांग, असा हा एकांत?

© भूषण कुलकर्णी

जीवनपुष्प

IMG_20170909_175839

फुलासारखे हे जीवन असावे!

बालपणी पानांच्या मायेत वाढावे
शिस्तीच्या देठाला धरून रहावे
पावसात भिजावे, वार्यावर डोलावे
फुलासारखे हे जीवन असावे!

कोणीतरी अलगद घेऊन जावे
वा झाडावरच झुलत रहावे
कुठेही जावे, सुगंध द्यावे
फुलासारखे हे जीवन असावे!

तिच्या केसांत रममाण व्हावे
वा ईश्वरचरणी समर्पण करावे
तिच्याकडून भक्तीरुपे ईश्वराकडे जावे
वा ईश्वराकडून प्रसादरुपे तिच्याकडे यावे
फुलासारखे हे जीवन असावे!

देह सुकताना निर्माल्य व्हावे
माय-मातीच्या कुशीत निजावे
तिथेच जन्माचे सार्थक व्हावे
फुलासारखे हे जीवन असावे!

© भूषण कुलकर्णी

वृक्षमानस

IMG_20170809_082040

मंद पावसात मी, मजेत भिजतोय रे
बंद खिडकीतून तू, का फक्त पाहतोस रे?

गार वार्याची झुळूक चहूबाजूंनी खेळते रे
तरी त्या यंत्राची हवा तुला का भावते रे?

माझ्या पानापानांतूनी, ओघळती या अमृतधारा
ये इकडे, बघ थोडे, माझ्यासवे भिजून जरा!

सुहास्यवदनी, धुंद होऊनी, मनास थोडे फुलू दे
चार भिंती, चारचौघे, ही शिस्त थोडी मोडू दे!

आलास तू, भेटलास तू, पण लगेच का निघालास तू?
त्या दोन फिरत्या काट्यांमध्ये, असे काय पाहिलेस तू?

तुझे हे वागणे, मला तरी कळत नाही
भेटू पुन्हा, वा खिडकीतूनच बोलू काही!

© भूषण कुलकर्णी

आ”पु.ल.”की

pl

पु. ल. देशपांडेंनी ‘आपुलकी’ या पुस्तकात विविध कलाक्षेत्रांतील काही मान्यवर व्यक्तींचे वर्णन केले आहे. त्यातील काही अंश:

१. हसून सोडून देण्यापलीकडे जगाचे काही महत्त्व नाही. गांभीर्य आणि विद्वत्ता यांचे नाते फार चुकीने जुळवले गेले आहे. कित्येकदा गांभीर्य ही स्वतःच्या विद्वत्तेविषयी साशंक असणार्या भयग्रस्त माणसाची ढाल असते. आपण विनोदी का नसावे?

२. पडता प्रपंच सावरणारा वडील भाऊ असावा आणि धाकटा कर्तबगार निघाल्यावर त्याच्या हाती सूत्रे सोपवून त्याचे कौतुक करत आणि त्याच्या हाती होणारी भरभराट पाहून त्याने धन्यता मानत रहावे, असा शुक्लांचा स्वभाव खरोखर हेवा करण्यासारखा आहे.

३. कलेच्या बाबतीत आत्मसंतुष्टता हा मोठा शाप आहे.

४. तू लोकसेवा का केलीस हे तुझं तुलाच कळलं नाही. तुझ्या आनंदासाठी तू केलंस, त्यांनी चांगलं व्हावं म्हणून नव्हे!

५. बाप आपली मुलगी सासरी जाणार हे ठाऊक असूनही तिला वाढवतो, शिकवतो, निरनिराळ्या कला शिकवतो, दागदागिने घालतो, आणि शेवटी दुसर्याच्या स्वाधीन करतोच ना!

६. सत्कार समरंभांचे हार गळ्यात पडले तरी नकळत पायात येऊन गुरफटतात आणि वाटचाल थांबवतात, हे त्यांनी पाहिलेले असल्यामुळेच सत्तेवरच्या उन्मत्तांना न भिणारे गोविंदराव त्या तसल्या हारांना भीत असावेत!

७. एक पाऊल टाकलं की दुसरं टाकायचं. एकूण किती पावलं होणार याचा हिशेब आधीच का मांडायचा? कीर्तनाला उभं राहिलं की उद्याच्या दिवसाची चिंता मिटते.

८. गांधीजींनी जीवनशिक्षणाच्या कल्पनेचा आग्रह धरला. जेपी नाईकांनी आपलं आयुष्य या कार्याला वाहिलं.

९. विद्वत्ता हे स्मरणशक्तीचे प्रयोग नव्हे. विद्वत्ता हे जीवनातले साध्य नसून साधन आहे.

१०. त्याने गरिबी भोगली, पण दैन्याला मनात प्रवेश करू दिला नाही. म्हणून पुण्यातल्या त्या अद्भुत चाळीतल्या एका खोलीतल्या संसारात वसंता खाटेवर असा ऐटीत बसायचा की त्या खाटेचे तख्त होऊन जायचे.

११. एका विलक्षण तळमळीने एखाद्या विषयात शिरणे हा त्याच्या पिंडाचाच धर्म होता. निष्काळजीपणाने काही करणे त्याला जमतच नव्हते.

१२. बालगंधर्वांचे गाणे ऐकत असताना मला एक गोष्ट सतत जाणवत आलेली आहे, ती म्हणजे ते फक्त गायला बसत. यापलीकडे काही सिद्ध करायला बसत नसत.

१३. वर्तमानाकडे संपूर्णपणाने दुर्लक्ष करून भूतकाळातल्या घटनांची नोंद करत राहणे म्हणजेच काही इतिहाससंशोधन नव्हे.

१४. ‘किमया’ हे माधवच्या पुस्तकाचेच नव्हे, तर जीवनाच्या तत्त्वज्ञानाचेच नाव वाटते. त्याचे डोळे भोवतालचा निसर्ग आणि मनुष्यनिर्मित कलासृष्टीकडे सदैव उत्सुकतेने पाहायचे. माधवच्या बोलण्यात कधी सैलपणा नसे. साधे बोलणेही उत्कट. त्याच्या जोडीला अत्यंत तल्लख विनोदबुद्धी. त्यामुळे त्याच्या पांडित्याचा डोह झाला नाही. ते प्रवाही होते, आल्हाददायक होते.

© भूषण कुलकर्णी

जीवनझरा

IMG_20170525_155040

मेघ वर्षले, धरणीवर अवतरले
छोटे जलप्रवाह, एकत्र मिसळले
आता सर्व सोबत वाहणे, हेच जीवनगाणे!

मऊमऊ माती, सोबत येती
काही दगड, उगाच खुपती
तेही होतील मऊ कालांतराने, हेच जीवनगाणे!

कोणी गुणगान गाती, काव्यसुमने उधळती
कोणी पाहत राहती, कोणी वाट अडवती
तरी खळखळून हसत वाहणे, हेच जीवनगाणे!

इवलीशी रोपे, कुशीत फुलती
काही फुले, काही काटे देती
सर्वांना प्रेम देत राहणे, हेच जीवनगाणे!

तो विशाल सागर, माझे ध्येय थोर
पोहोचेन तिथवर, वा सुकेन वाटेवर
तरी पुढे जात राहणे, हेच जीवनगाणे!

© भूषण कुलकर्णी

घोटभर

nana2

चिंतांचे काहूर
विचारांचा पूर
प्रश्न अपार
एकच उत्तर
घ्यावी घोटभर!

काॅलेजचे आवार
बाराचा सुमार
वाढदिवसाचा वार
आता कशाचा उशीर
घ्यावी घोटभर!

जमला मित्रपरिवार
खूप दिवसांनंतर
गप्पा, गीतांचे सुर
जुन्याच कट्ट्यावर
घ्यावी घोटभर!

मन सैरभैर
आठवणी फार
विरह तीव्र
तिच्या फोटोसमोर
घ्यावी घोटभर!

एकटाच गच्चीवर
शांत रात्रप्रहर
पौर्णिमेचा चंद्र
चला जाऊ चंद्रावर
घ्यावी घोटभर!

© भूषण कुलकर्णी

(संकल्पना: गोपीनाथ लंगोटे)