खेळाडू

रोजच काहीतरी नव्याने घडत राहते
नंतर मन एखादी घटना स्मरत राहते

चंद्रासम तो माझ्याभवती फिरत राहतो 
केवळ एकच बाजू त्याची दिसत राहते

भजनामध्ये जेवणखाण विसरतो नवरा 
रोज दुपारी तीही डोंगर चढत राहते 

आकाशाची स्वप्ने पाहत असतानाही 
मनात का थोडीशी माती उरत राहते?

समुद्र, डोंगर, झाडे, प्राणी, झरे पाहिले 
सगळी जनता तेच तेच का बघत राहते!

ठिपक्यांनी भरलेला कागद पुढ्यात असतो 
त्यात उगा मी पूर्ण वर्तुळे करत राहते 

ऑफिसला चालला पहा माजी खेळाडू 
मैदानावर एक नजर भिरभिरत राहते 

-भूषण कुलकर्णी 

रोपटे

वागलो माझ्यापरीने चांगले
पण जगाचे नियम होते वेगळे

चार जागी विखुरली माझी मुळे 
कोणत्या मातीतले मी रोपटे?

वेळ हातातून माझ्या निसटला 
एक नाते त्याबरोबर संपले

कळस म्हणतो, स्थैर्य अन शांती हवी 
पायरी म्हणते, कळस गाठायचे

भेट झाली काल ती होती खरी 
की मला स्वप्नात दिसली माणसे?

आतला आवाज मीही ऐकला 
शब्द त्यानेही कितीदा फिरवले!

-भूषण कुलकर्णी 

भिक्षा

रात्रंदिवस कामामधे गुंतायचे असते
पण सांजवेळेला जरा थांबायचे असते

मेसेज पाठवला तिला मी गोड प्रेमाचा
म्हणते, अरे भेटून हे सांगायचे असते!

व्याख्या कुणी केली अशी ही लोकसेवेची
आहे स्वत:चे ते, म्हणे वाटायचे असते

मंथन करत राहूनही अमृत मिळत नाही
पाणी जरासे शांत राहू द्यायचे असते

एका क्षणापुरती नजर क्षितिजाकडे टाकू
नंतर पुन्हा रस्त्याकडे पाहायचे असते 

वेळीच दे भिक्षा मला जी द्यायची आहे
नाही मिळाली तर पुढेही जायचे असते

-भूषण कुलकर्णी

नियतीच्या अटी

हक्क कोणी चित्रकारांना दिला?
फक्त काळा रंग दैत्यांना दिला

खेळकर आतून आहे तो जरा
सागराने जन्म लाटांना दिला

रानवाऱ्याने झुलवले रात्रभर
केवढा आनंद झाडांना दिला!

कल्पना अन् आठवांची सरमिसळ
छंद हा भलताच ह्रदयांना दिला

फक्त नियतीच्या अटी पाळेन मी
शब्द हा माझ्याच वचनांना दिला

-भूषण कुलकर्णी

स्मृती

समुद्र त्याच्या लाटा थोड्या आवरतो
तोवर मीही शंख शिंपले साठवतो

तेव्हाही कुठलाच प्रश्न सोपा नव्हता
बालपणीचे दिवस कशाला आठवतो!

शिक्षण घेताना घर सुटले ते सुटले
अता घरी पाहुण्याप्रमाणे वावरतो

गाता नाही येत मला तर अंगाई
गोष्टी सांगुन बाळाला मी जोजवतो

कठोर झालो आहे थोडा मी सध्या
तुझ्या स्मृतीने एकच अश्रू ओघळतो

-भूषण कुलकर्णी

समांतर

उंबऱ्याबाहेर पाउल टाकते कोणी
अंगणातच घुटमळत मग राहते कोणी

वेगळेपण सिद्ध करणे वाटते अवघड
आपला साधेपणा मग सांगते कोणी

शेवटी कोठेच नाही मुक्तता, कळते
ओळखीच्या पिंजऱ्यातच गुंतते कोणी

योग्य ती किंमत जगाला जाणवत नाही
आपल्या पेटीत रत्ने ठेवते कोणी

भूतकाळाचे समांतर विश्व एखादे
आठवण माझी तिथेही काढते कोणी

-भूषण कुलकर्णी

रोजनिशी

वापर भाषा लोकांना समजेल अशी
सुटले गोकुळ, सोड बासरी कायमची

अजुन वेगळे असे काय घडणार उद्या?
कार्बन पेपर लावुन लिहितो रोजनिशी

ह्रदय एवढे मोठे नसते राजाचे
एकच असते राणी त्याची आवडती

सदा राहिली चुका दाखवत ती माझ्या
कधी मॅच्युअर झालो नाही तिच्यापरी

किती भावना उधळल्यात मी दुनियेवर!
जरा प्रॅक्टिकल व्हावे म्हणतो अता तरी

येत राहिलो घेउन येथे हळवे मन
या जागेवर अनेक रुजल्या आठवणी

-भूषण कुलकर्णी

सत्य

सांज होताच ती दिसेल मला
एक कविता नवी सुचेल मला

कारभारी, धनी असेही म्हण
लाज लटकेच, आवडेल मला

पीत नाही कधी अशासाठी
आत दडलंय ते कळेल मला

आठवण मागची नको काढू
चूक माझीच आठवेल मला

सत्य असले जरी तुझे म्हणणे
गोड बोलून बघ, पटेल मला

सत्य बोलेल भेट झाल्यावर
‘हाय..‘ इतके तरी म्हणेल मला

-भूषण कुलकर्णी

अक्षर

पाहून झाले जग, अता थांबायचे आहे मला
अपुल्या घरातच शेवटी गुंतायचे आहे मला

आधी झऱ्याचे स्वप्न होते एक सागर व्हायचे
आता म्हणे, मातीमधे मिसळायचे आहे मला

शाळेतले सुविचार बहुधा विसरल्यागत वाटते
एकेक अक्षर त्यातले गिरवायचे आहे मला

ओघात काळाच्या उद्या घडणार ते घडवू अता
आयुष्य वाया आपले घालायचे आहे मला

-भूषण कुलकर्णी

पेन

शोधतो मी हरेक पानावर
ओळ लिहिली असेल पानावर

आज काही नवे सुचत नाही
ठेवले फक्त पेन पानावर

पान रंगेल छान हे नक्की
एकदा ओठ ठेव पानावर

भावनांची मनामधे दंगल
घडवतो मी समेट पानावर

अर्थ शोधेलही पिढी पुढची
ओढ साधीच रेघ पानावर

शेवटी स्वाक्षरी न केली मी
सांडले दोन थेंब पानावर

-भूषण कुलकर्णी