धावा

आता मागे घेतो माझा हरेक दावा
तुला मिळाला माझ्याविरुद्ध एक पुरावा

म्हणालात की मी अस्ताला गेलो होतो!
तुमच्या फिरत्या दुनियेचा हा दोष असावा

हरेक धावेला का होते तुझी चलबिचल?
उगाच साथीदार तुझा का बाद ठरावा?

कसे सुटावे माहित होते म्हणून फसलो
मला समजला होता तेव्हा तुमचा कावा

फक्त द्रौपदीचे रक्षण केलेस ईश्वरा
इतरांनी केला नव्हता का तितका धावा?

सुरुवात

नवी सुरुवात होइल वाटले होते
पुन्हा पहिलेच पाउल टाकले होते

दिलासा चालताना लाभला इतका
कुणी वाटेत मागे थांबले होते

कधी कळली न त्याला मेहनत माझी
मुलाला एवढे लाडावले होते

खुळी स्पर्धा किती चढण्या-उतरण्याची!
जरी गाडीत एका चालले होते

मला होते खुणावत प्रश्न पर्यायी
तरी उत्तर रिकामे सोडले होते

पुन्हा फाटून गेले पान लिहिलेले
कितीदा नाव एकच खोडले होते

जुने सत्यच नव्या शब्दांत सांगितले
तुम्हाला वाटले, मी शोधले होते!

ओळ

ती मला दिसलीच नसती तर…
आठवण बनलीच नसती तर…

रोज हुरहुर लावते आहे
ओळ ही सुचलीच नसती तर…

दिवस उत्तम चालला होता
बातमी कळलीच नसती तर…

वेगळा दिसतो अता पाउस
काल ती भिजलीच नसती तर…

जात होतो सरळ वाटेने
वाट ही वळलीच नसती तर…

छटा

कोण रंगारी मनाला रंगवत आहे?
नेमकी कुठली छटा तो दाखवत आहे?

कोणत्या रंगाविनाही छान दिसतो की!
चित्रकारालाच कागद थांबवत आहे

बालपण चित्रात आपण काढले होते
तेच रडवेल्या मनाला खेळवत आहे

बंद नव्हते दार त्याचे, किलकिले होते
आजही चित्रातले घर बोलवत आहे

पर्वताचे चित्र मी काढायला बसलो
पण झरा एकेक नेतो वाहवत आहे

शेवटी एकत्र केले रंग उरलेले
चित्र हे काळ्या छटांनी संपवत आहे

सावल्या

सर्व गावातल्या झोपल्या सावल्या
एक माझ्यातुझ्या जाहल्या सावल्या

पाय पडणार नाही प्रकाशावरी
पावलांना सदा बांधल्या सावल्या

जीवनाचा प्रवासी असा चालला
मिरवले ऊन अन् तुडवल्या सावल्या

ओल मातीत इथल्या सदा राहिली
माणसांच्या इथे झिरपल्या सावल्या

चांदणे सर्व घेऊन गेलीस तू
मात्र मागे तुझ्या राहिल्या सावल्या

नेमके काय घडले विचारू नका
काल भिंतीवरी हालल्या सावल्या

एवढा गर्द अंधार पडला कसा?
सर्व दुनियेतल्या सांडल्या सावल्या

तू अशानेच पडतोस काळा पुन्हा
रोज चरणी तुझ्या वाहिल्या सावल्या

गंमत

रोज फुलांना भ्रमर कोणता भेटत आहे?
बागेमध्ये वसंत कायम नांदत आहे

बऱ्याच वेळा नजरेतच ती रमून गेली
आता ओठांपर्यंत कविता पोचत आहे

जरा वेळ गेल्यावर दिसतिल पाझरसुद्धा
मातीमध्ये सध्या पाणी झिरपत आहे

पाहत बसतो झाडे, पाणी, वारा, पक्षी
मला वाटते कोणी काही सांगत आहे

तुझा गंध येऊन पोचला आहे येथे
तिकडे जाता बाग वेगळी लागत आहे

माझी तर दुनियाच इकडची तिकडे झाली
तुला वाटले दोन दिसांची गंमत आहे

मी सध्याला आतापुरते बोलू शकतो
शब्द उद्याचा उद्याचसाठी ठेवत आहे

पदर

सांगतो आहे उखाणा नाव कोणाचे?
भान थोडे ठेव सत्याचे नि स्वप्नाचे

भेट झाल्यावर कळाले खूप दिवसांनी
दूर गेलेलेच नव्हते लोक प्रेमाचे

येथल्या मातीत आहे वेगळे काही
वेगळे दिसतात येथे रंग पाण्याचे

स्वस्त माझ्याएवढा नाही कुणी येथे
ज्ञानही नाही तुला बाजारभावाचे

पाहिजे किंवा नको इतके मला कळते
आणखी नाहीत कुठले भेद नात्याचे

भावना कळल्यात सध्या हे पुरे आहे
पदर उलगडतील नंतर गूढ अर्थाचे

स्वातंत्र्य

हात हाती घेउनी चालायचे आहे
ध्येयही आपापले गाठायचे आहे

एवढे स्वातंत्र्य द्या प्रत्येक व्यक्तीला
गैरसुद्धा चांगले मानायचे आहे

मीठ, साखर वा कधी पाणी बनत गेलो
वाटले, लोकांमधे मिसळायचे आहे

सांग येऊ का तुला भेटायला आता
की तुला आधी कुणी भेटायचे आहे?

हात झाडाला तुझ्या लावायचा नाही
फूल पडलेले तिथे वेचायचे आहे

वळुन बघणाऱ्या मनाला सांत्वना देतो
याच वाटेने उद्याही जायचे आहे

अस्त होऊ द्या मला वेळेत बाबांनो
परत वेळेवर उद्या उगवायचे आहे

वारा

राहता येणार नाही ठाम शब्दावर
भरवसा नाही अता एकाच अर्थावर

फक्त मोठे ध्येय ठेवुन फायदा नाही
चालताना बदलतो बघ रंग क्षितिजावर

गाठला मुक्काम पण मी थांबलो नाही
एवढा जडला कसा हा जीव रस्त्यावर

क्षणभरापुरते रिकामे वाटते आहे
मग पुन्हा होईल काही स्वार ह्रदयावर

तो तुझ्या इच्छेविनाही गंध पसरवतो
एवढा नाही बरा विश्वास वाऱ्यावर

लाट प्रेमाची कधीची ओसरुन गेली
वाट पाहत राहिले कोणी किनाऱ्यावर

गुपित

कितीही छान वळणावर कधी थांबायचे नाही
मनाला लाख सांगितले कुठे गुंतायचे नाही

तुला विश्वास माझ्यावर किती आहे ठरव आधी
पुढे ठरवू, जगाला भ्यायचे की भ्यायचे नाही

फुलावर काल भ्रमराला कळीने पाहिले होते
तरी कोणी तिला सध्या गुपित सांगायचे नाही

कधी चालायला शिकलो, मला ते आठवत नाही
पुढे म्हणता न आले की मला चालायचे नाही

कधीतर आडवाटेने पुढे लागेल चालावे
म्हणुन का सरळ रस्त्याने कधीही जायचे नाही?

मला आकाशगंगेने कळवले सत्य सूर्याचे
भटकतो तो कुणाभवती, खरे वाटायचे नाही

निरागस किलबिलाटाने मनाचे दार वाजवले
मना तू ऐक पक्ष्यांचे, अता बोलायचे नाही