चालताना

हेच तर होणार भरभर चालताना
वाढते अपुल्यात अंतर चालताना

एकटे पडलो कधी कळलेच नाही
एक होतो ना अगोदर चालताना*

धावताना राहिले जे काय मागे
आठवत राहील नंतर चालताना

मन अगोदर थकत जाते, पाय नंतर
भावना इतक्या अनावर चालताना

आळशी नाहीत सगळे लोक येथे
थांबले असतील क्षणभर चालताना

एक आशा सर्व ताऱ्यांना असावी
विश्व समजावे कधीतर चालताना

© भूषण कुलकर्णी

नामदेव

विठ्ठला, आता कधी भेटायचे ठरवून घे रे
ठरवताना आमच्याही भावना समजून घे रे

जेवल्यावर देव मग मी खायचे, आई म्हणाली
या भुकेल्या बालकासाठी तरी खाऊन घे रे!

भेटल्यावरही तुला का राहिलो कच्चा घडा मी?
एक आवा माझियासाठी नवा बनवून घे रे

देवळामागेच कीर्तन हरिजनांचे चाललेले
क्षणभरासाठी तरी अपुली दिशा बदलून घे रे

चांगदेवासारखा मी धाडला कोराच कागद
विठ्ठला, समजायचे ते सर्व तू समजून घे रे

पाहवेना ही समाधी कोवळ्याशा ज्ञानियाची
बांध फुटल्या नामदेवाला उरी कवळून घे रे

© भूषण कुलकर्णी

पाऊस

नभाचा जीव मातीवर जडू शकतो
अता पाऊस केव्हाही पडू शकतो

उडू द्यावे धुळीला मोकळे सध्या
तिला पाऊस नंतर आवडू शकतो

उन्हाला तेवढीही मोकळिक नसते
जसा पाऊस हळवासा रडू शकतो

तुला माझ्या उन्हाबद्दल कसे सांगू?
तुलाही पावसाळा नावडू शकतो

हवा थांबायला पाऊस हा आता
पुन्हा पक्षी हवे तिकडे उडू शकतो

© भूषण कुलकर्णी

अटळ

कालचा डोह झाला उथळ वाटते
पाय भिजताच लागेल तळ वाटते

काय असते तळाशी, तळाला कळे
पाहणाऱ्यास पाणी नितळ वाटते

वाफ होण्यास आरंभ होइल अता
ओलसर एक बसणार झळ वाटते

बंधनातच जिणे सागरासारखे
मग करू काय घेऊन बळ वाटते

पाहिले खूपसे अर्थ हसण्यामधे
फक्त असतात अश्रू निखळ वाटते

लाट पहिली जशी, लाट पुढची तशी
तेच ते होत जाणे अटळ वाटते

© भूषण कुलकर्णी

दाह

वेगळे आहोत आपण हे बरे झाले
माणसे आहोत आपण हे बरे झाले

दाह दुसऱ्यांना नको अन् आपल्यालाही
कवडसे आहोत आपण हे बरे झाले

प्राप्त असते जाणिवांना वेदना होणे
कोडगे आहोत आपण हे बरे झाले

आपल्यातच सापडू शकतो अता हीरा
कोळसे आहोत आपण हे बरे झाले

जी हवी ती आपली प्रतिमा बघत राहू
आरसे आहोत आपण हे बरे झाले

गोडवा टिकला खरा नात्यामधे अपुल्या
दूरचे आहोत आपण हे बरे झाले

© भूषण कुलकर्णी

पाने

वाहत्या वाऱ्यात फडफडतात पाने
त्याच आठवणीत मग झुलतात पाने

सांगतो वारा भराऱ्या पाखरांच्या
जागच्या जागीच सळसळतात पाने

थेंब हलकेसे मनावर शिंपडावे
खूप दिवसांनी अशी भिजतात पाने

फूल एखादे कुठेतर जन्म घेते
शेकडो साधीसुधी हसतात पाने

सावलीमधल्या फुलाला प्रश्न पडला
एवढी गंभीर का दिसतात पाने?

जन्म घेणे, सोसणे, मातीत पडणे
यापुढे स्वप्ने बघत नसतात पाने

सोबती एकेक जेव्हा दूर जातो
सर्व आशा सोडुनी गळतात पाने

© भूषण कुलकर्णी

कसे कळावे?

मनात कुठले वादळ लपले कसे कळावे?
वरवरचे की खुशीत हसले कसे कळावे?

सुरुवातीला आपण सगळे सोबत होतो
नंतर कोठे अंतर पडले कसे कळावे?

आठवते की एक झरा प्रेमाचा होता
कुठून होते पाझर फुटले कसे कळावे?

किमान थोडे तरी बोलणे व्हावे आता
विसरलात की मनात स्मरले कसे कळावे?

प्रश्नपत्रिका कोण काढतो आयुष्याची?
किती कोणते उत्तर चुकले कसे कळावे?

वाटाघाटी चालू झाल्या नात्यामध्ये
काय मिळवले काय हरवले कसे कळावे?

धूळ विचारत आहे थोडे विसावताना
वादळ सरले अथवा उरले कसे कळावे?

© भूषण कुलकर्णी

मजकूर

क्षितिजापर्यंत त्यांच्या पाणी भरून ठेवा
मग बोलतील सारे, वंदन समुद्रदेवा!

कंटाळलो जरासा ह्या रोजच्या सुखांना
म्हटले करून पाहू थोडी समाजसेवा 

आदर्श मानले पण आदर कमीच होता
त्यांचा मला कुठेतर वाटत असेल हेवा

थोडाच वेळ घेतो आस्वाद मी कलेचा
थोडाच अर्थ कळतो अन बोलतो, अरे वा!

मजकूर खूप सारे मिनिटांत स्क्रोल केले
एखाद-दोन केवळ वाचून वाटले, वा!

© भूषण कुलकर्णी

ठिपके

कोपर्‍यातिल चार ठिपके फक्त पाहत राहिलो
ते कशाचे चित्र होते, हेच विसरत राहिलो

वाटले होते, पुढे होईल काही चांगले
मी स्वतःचा वेळ हारुन द्यूत खेळत राहिलो

कोंडलेला एक नायक, चार भिंती नायिका
त्याच घुमणार्‍या ध्वनीची गोष्ट सांगत राहिलो

वेळ गेल्यावर पुन्हा माझे मला आले हसू
काय होतो मी, स्वतःला काय समजत राहिलो

कल्पवृृृक्षाला सहज मी सोडले नाही कधी
कल्पनाशक्तीच त्याला जास्त मागत राहिलो

© भूषण कुलकर्णी

वाटचाल

थकलेल्या पावलांस आता हीच सांत्वना आहे
चालत असताना रस्ता अर्ध्यात संपला आहे

पुढे पडत असणार्‍या पायाला कोणी सांगावे
दुसरा मागे दुनियेला रोखून थांबला आहे

वाट चालतेवेळी केवळ हीच माहिती आहे
दोन्ही पायांपैकी सध्या पुढे कोणता आहे

आधी उजवा की डावा, एवढाच निर्णय माझा
पुढे पावलांचा क्रम तर त्यानेच ठरवला आहे

त्याच्या जिम मधले एखादे यंत्र असावी दुनिया
इथे धावणारा एका जागीच राहिला आहे

© भूषण कुलकर्णी