श्वास

मार्ग प्रगतीचा खुणावत गेला
गंध मातीचा दुरावत गेला

वाट ध्येयाची बरोबर होती
अर्थ ध्येयाचा वहावत गेला

पाहिली साधीसुधी मी स्वप्ने
भार त्यांचाही दुखावत गेला

राहिली दुःखे मनातच माझी
आपली जो तो सुनावत गेला

पालकांनी कार्य केले त्यांचे
‘खो’ दिला अन् पाल्य धावत गेला

लागलेले हे सुतक जीवनभर
श्वास जो आला, दगावत गेला

© भूषण कुलकर्णी

युद्ध

थांबून मी घाव गोंजारले होते
तेव्हाच युद्धामधे हारले होते

टाकून शस्त्रे समर्थन दिले त्यांनी
म्हणती, अहिंसेस स्वीकारले होते!

त्यांची खरी साथ युद्धामधे आहे
जे वीर माझ्यापुढे वारले होते

दाही दिशांनी जरी घातला वेढा
माघार घेण्यास नाकारले होते

आहे जगवले मला याच युद्धाने
कोठे तहांनी मला तारले होते?

नाही कळाली खबर त्यास विजयाची
अद्याप ते राज्य अंधारले होते

© भूषण कुलकर्णी

एक इच्छा

किती छानशी वाटते एक इच्छा!
मनी ठाण ती मांडते एक इच्छा…

तिचा ध्यास घेऊन मी चालतो अन्
मला घेउनी धावते एक इच्छा

उभी शांत देवापुढे भावभक्ती
भिकेला तिला लावते एक इच्छा

भले पाहताना भल्या माणसांचे
उगा अंतरी बोचते एक इच्छा

चिता जाळली या मनाची तरीही
जणू होलिका, राहते एक इच्छा…

स्वयंवर हिचे मांडले कावळ्यांनी
बघू, कोण स्वीकारते एक इच्छा!

© भूषण कुलकर्णी

तोल

सांगताना सत्य विद्रोही बनावे लागले
शेवटी धंद्यात खोट्याच्या मुरावे लागले

पार केली ती चढाई त्रास झाला एवढा
तोल सांभाळायला थोडे झुकावे लागले

कार्य हे माझे नव्हे अन् मार्ग हा माझा नव्हे
हे कळाया एवढी वर्षे शिकावे लागले

बालकाच्या ज्या कलेचा बोलबाला जाहला
सोंग ते आजन्म त्याला वागवावे लागले

शांततेने बोललो तेव्हा न त्यांनी ऐकले
शांततेसाठीच हाती शस्त्र घ्यावे लागले

आसवांनी मैफिली शृंगारलेल्या सर्वदा
हासणे साधे बिचारे आवरावे लागले

पामराला भेट व्हावी पांडुरंगाची कशी?
थोर संतांना किती त्या आळवावे लागले…

© भूषण कुलकर्णी