जीवनझरा

IMG_20170525_155040

मेघ वर्षले, धरणीवर अवतरले
छोटे जलप्रवाह, एकत्र मिसळले
आता सर्व सोबत वाहणे, हेच जीवनगाणे!

मऊमऊ माती, सोबत येती
काही दगड, उगाच खुपती
तेही होतील मऊ कालांतराने, हेच जीवनगाणे!

कोणी गुणगान गाती, काव्यसुमने उधळती
कोणी पाहत राहती, कोणी वाट अडवती
तरी खळखळून हसत वाहणे, हेच जीवनगाणे!

इवलीशी रोपे, कुशीत फुलती
काही फुले, काही काटे देती
सर्वांना प्रेम देत राहणे, हेच जीवनगाणे!

तो विशाल सागर, माझे ध्येय थोर
पोहोचेन तिथवर, वा सुकेन वाटेवर
तरी पुढे जात राहणे, हेच जीवनगाणे!

© भूषण कुलकर्णी

Leave a comment