
मंद पावसात मी, मजेत भिजतोय रे
बंद खिडकीतून तू, का फक्त पाहतोस रे?
गार वार्याची झुळूक चहूबाजूंनी खेळते रे
तरी त्या यंत्राची हवा तुला का भावते रे?
माझ्या पानापानांतूनी, ओघळती या अमृतधारा
ये इकडे, बघ थोडे, माझ्यासवे भिजून जरा!
सुहास्यवदनी, धुंद होऊनी, मनास थोडे फुलू दे
चार भिंती, चारचौघे, ही शिस्त थोडी मोडू दे!
आलास तू, भेटलास तू, पण लगेच का निघालास तू?
त्या दोन फिरत्या काट्यांमध्ये, असे काय पाहिलेस तू?
तुझे हे वागणे, मला तरी कळत नाही
भेटू पुन्हा, वा खिडकीतूनच बोलू काही!
© भूषण कुलकर्णी