चंद्राकडे पाहतानाही शांत राहते मन
एकटाच सुखी आहे, नको कोणाची आठवण!
वर्षाधारा, रेशीमधागा, गुलाबपाकळ्या, शुभ्र चांदण्या
आहेत तशा असू देत, नको कोणाची उपमा!
गुलाबी थंडी असो, वा बहर वसंताचा
एकटाच मजा करतो, नको विरह विकतचा!
मन, ह्रदय, कविता, भावना, आहेत आम्हालाही
काय बिघडले जर ते नाही दिले कोणालाही?
दिसेल कोणी सुंदर, बोलणेही मधाळ
पुढील योजना बसून बोलू, उगाच का तळमळ?
मिळेल तेव्हा मिळेल ती, आज रहा निवांत
पुन्हा मिळेल का सांग, असा हा एकांत?
© भूषण कुलकर्णी