बहिर्जी

अंगावरुनी पाणी सुंदर वाहत होते
खडकालाही वाहुन जावे वाटत होते

हरेक वळणावर वेळेची सीमा होती
निरुपायाने पुढेच जावे लागत होते

आईबाबांच्या राज्यातच निवांत होतो
कोठे काही चुकल्यावरही चालत होते

सडा फुलांचा पडला होता मार्गावरती
ह्रदय तरीही नवीन काही शोधत होते

त्या गल्लीतुन पुन्हा पुन्हा जावेसे वाटे
तिथे छान कुठलेसे गाणे वाजत होते

राज्याभिषेक शिवराजांचा वैभवशाली
फकिराच्या वेषात बहिर्जी पाहत होते

-भूषण कुलकर्णी

सांज

रोजची वेडी सवय लागू नये
सांज ढळताना अशी पाहू नये

जी नको ती आठवण येईल बघ..
डायरी अपुली जुनी चाळू नये

माणसे येतात अन् जातातही
पत्र पत्त्यावर जुन्या धाडू नये

भोवती दिसतील केवळ आरसे
पुस्तके इतकी खरी वाचू नये

हीच असते शेवटी माणूसकी
मत कुणावर आपले लादू नये

दोन मिनिटे फक्त पाळू शांतता
मग पुन्हा वाईटही वाटू नये

-भूषण कुलकर्णी

हितचिंतक

मन कुणाचे एवढे व्यापक इथे नाही
शोधले पण एक हितचिंतक इथे नाही

दु:ख होते या पुरातन मंदिरांनाही
पूजकांमध्ये कुणी शोधक इथे नाही

आजचे चाणक्य उरले कुटिलतेपुरते
आणि जनतेचा खरा सेवक इथे नाही

निर्मिली असली जरी त्याने प्रतिसृष्टी
कल्पनेसाठी तसे रूपक इथे नाही

-भूषण कुलकर्णी

घड्याळ

कधी वाटते, प्रसन्न इतकी सकाळ आहे
कधी वाटते, सगळे नीरस, रटाळ आहे

उगाच कोणी खलनायक झालेला नसतो
हरेक पात्राला त्याचा भूतकाळ आहे

किती वाजले होते नक्की तू जाताना?
त्या वेळेवर अजुन थांबले घड्याळ आहे

कुणी चोरले, कुठे हरवले माहित नाही
कधीपासुनी ह्रदय आपले गहाळ आहे

संत व्हायचे, हा काही व्यवसाय नसावा
संत कधी कुंभार, कधी मेंढपाळ आहे

-भूषण कुलकर्णी

मैफिली

मनापासुनी दु:ख आपले सांगत होत्या
पूर्वी जखमा माझ्यासोबत बोलत होत्या

खूप वेळ मी शॅावरखाली उभा राहिलो
डोक्यामधुनी विचारधारा वाहत होत्या

ज्यांना साधी ओळख नव्हती तुझी कधीही
आठवणी त्या तुझी आठवण काढत होत्या

सुट्या-सुट्या होऊन भावना उसवत गेल्या
आपसांत ज्या सहजपणाने गुंतत होत्या

फासे टाकुन सापशिडी तो खेळत होता
आणि सोंगट्या अर्थ स्वत:चा शोधत होत्या

सुखात की दु:खात राहिलो माहित नाही
अनेक ओळी तर सुचल्यागत वाटत होत्या

कोणी वेडा त्या रात्रीला फिरत राहिला
म्हणून इतक्या छान मैफिली रंगत होत्या

उंबरा

पायऱ्या मळल्या तुझ्या अन् उंबरे झिजले तुझे
पण खरे दर्शन अजुन नाही मला घडले तुझे

प्रेरणा मिळते तिची ओळीत एकेका मला
आणि ती म्हणते, अजुन अंतर कुठे कळले तुझे!

ही नशा सुंदर तरी नुकसान करणारी पुढे
आठवांसोबत तिच्या मन एकटे पडले तुझे

विसरण्याचे एकदा मी ठरवले की ठरवले
वाटते ओळख तरी काही न आठवले तुझे

उंबऱ्याबाहेर पडणे परवडत नाही तुला
त्यामुळे मन या घरातच शेवटी रमले तुझे

चित्रगुप्त

नेमस्त कुंडल्यांचे नेमस्त बारकावे
नियतीस वाटते की काही नवे लिहावे

विज्ञान मानणारा स्वर्गात पोचला तर
प्रत्यक्ष देव त्याला देईल का पुरावे?

बाहेर चौकटीच्या पडणे कठीण नाही
व्याख्येत चौकटीच्या थोडे बदल करावे

त्या थोर मानवांचा अपमान हाच आहे
येथील माणसांचे आदर्श ते म्हणावे

आता तुझाच आहे आधार चित्रगुप्ता
साऱ्या जुन्या स्मृतींना तू घालवून द्यावे

एक्स

एक्स म्हणजे एक्स असते
एक्स ला दुसरं नाव नसतं
बऱ्याच गणितांमधे एक्स दिसते
हमखास…

काही गणितं सुटतात
एक्स ची किंमत कळते
एक्स कधी असते रियल, कधी इमॅजिनरी
कधी कॅाम्प्लेक्स – थोडं रियल, थोडं इमॅजिनरी
कधी रॅशनल, कधी इर्रेशनल
कधी पूर्ण, तर कधी फ्रॅक्शनल
कधी धन, कधी ऋण
कधी वाटते किंमत शून्य…

काही गणितं सुटणारी नसतात
कधीही…
आणि काही गणितं सुटली तरी
एक्स च्या अनेक किमती कळू शकतात
एक्स ची जेवढी पॅावर असेल, तेवढ्या…
टेक्निकली !?!

-भूषण कुलकर्णी

स्वप्न

भास होतात हल्ली निराळे मला
तूच यावे अता, सावरावे मला

रोज जागेपणी स्वप्न पडते तुझे
तूच स्वप्नात करतेस जागे मला

एक पाऊस घेऊन आलीस तू
आवडू लागले पावसाळे मला

ऐकल्यावर उखाणा तुझा वाटले
नाव इतके कसे गोड आहे मला!

मी कपाटामधे शोधले खूपदा*
पत्र स्वप्नात होते मिळाले मला

-भूषण कुलकर्णी
*: ही ओळ सुचवली आहे दत्तप्रसाद जोग सरांनी

खपली

ओळ तरलतम इतकी होती
सुचता सुचता सुटली होती

चिंता ‘नावा‘लाही नव्हती
दगडू होता, दमडी होती

तुला यायला उशीर झाला
खपली सुद्धा पडली होती

पास-फेल ते नंतर ठरवू
तुझी इयत्ता कितवी होती?

पंखा गरगर फिरत राहिला
तुझी आठवण बिजली होती

-भूषण कुलकर्णी