पाहिजे

रोज काहीतरी नवे पाहिजे
हे मिळाले, अजून ते पाहिजे

लक्ष मातीकडे कुणी द्यायचे?
सर्व लोकांस चांदणे पाहिजे

लक्ष देऊ नकोस इतरांकडे
अन्यथा वाटते, तसे पाहिजे

हीच या धावत्या जगाची कथा
फक्त अन् फक्त पाहिजे, पाहिजे

भरप्रवाहातही मला वाटते
की जरावेळ थांबले पाहिजे

© भूषण कुलकर्णी

थेट बोलतो मी

काळजातून काळजाला थेट बोलतो मी
एकदा मैफिलीत माझ्या भेट बोलतो मी

मेणबत्तीस आज वाली राहिला न कोणी
होउनी तू मशाल आता पेट बोलतो मी

शोधता शोधता किनारा मी थकून जातो
आणि होडीस याच माझ्या बेट बोलतो मी

जे असे आपले, म्हणावे तेच सत्य सारे
बोलणे हे असेच पुढती रेट बोलतो मी

घर तुला तर मिळेल रसिकांच्या मनात कविते
पण कवाडास किलकिल्या त्या खेट बोलतो मी

© गोपीनाथ आणि भूषण

हुरहुर

कसा खेळ दैवी कुणाला कळेना
कुणाला मिळे ते कुणाला मिळेना

सुवर्णाक्षरांसारखे कार्य केले
तरी नाव साधे इथे आढळेना

खुणा आपल्या दुःख ठेवून जाते
सुखे मात्र गेल्यास काही उरेना

जिथे जन्मली वेदशास्त्रे, पुराणे
तिथे स्त्रीत्व काही कुणा आकळेना

जरी डाव आता न हातात माझ्या
मनातील ही व्यर्थ हुरहुर टळेना

© भूषण कुलकर्णी

डोह

सिद्धी कुणास मिळते यत्नांशिवाय काही?
हातात काय अपुल्या हातांशिवाय काही?

सारेच डोह माझ्या हृदयात साठवावे
येऊ नये किनारी लाटांशिवाय काही

कुठल्याच गाढवाच्या चालू नकोस मागे
मिळणार ना कधीही लाथांशिवाय काही

वेगात चालण्याचे फसतात बेत सारे
मार्गात या मिळेना ठेचांशिवाय काही

© भूषण कुलकर्णी

चेहरा

दुसरे नकोत काही उपचार चेहऱ्याचे
गालात हासणे हे शृंगार चेहऱ्याचे

कोणा रडू फुटेना, वा हासणे जमेना
आहेत खूप येथे आजार चेहऱ्याचे

थांबेल का कधी हा रस्त्यातला तमाशा?
जमतात भोवताली लाचार चेहऱ्याचे

तो भेटला असावा भोळ्याच भाविकांना
शोधून हारले ते बेजार चेहऱ्याचे

त्या थोर माणसाची तत्त्वे नकोत आम्हा
पुतळे पुजून करतो सत्कार चेहऱ्याचे

मज चेहरा स्वतःचा दिसणे कठीण आता
हे मुखवटेच झाले आधार चेहऱ्याचे

© भूषण कुलकर्णी

दुतर्फा

जीवनकथा स्वतःची ते सांगतात मित्रा
ते दोनचार किस्से पण गाळतात मित्रा

झाडे उभी दुतर्फा याचीच साक्ष देती
रस्त्यात जे न येती, ते वाचतात मित्रा

क्षितिजापलीकडेही जाणे अशक्य नाही
क्षितिजापुढील वाटा पण उतरतात मित्रा

सार्‍या जगात आता सुविचार फार झाले
आहेत कोण येथे जे वागतात मित्रा?

नाहीत आळशी ते अर्ध्यात थांबलेले
पण वाट शोधताना घोटाळतात मित्रा

माणूस एकदा का आतून खचत गेला
सारे दुरावलेले मग वाटतात मित्रा

© भूषण कुलकर्णी

पापणी

ही काही रोजची सजावट तर नाही
काही साधायचा तुझा कट तर नाही?

भरती आली, पूर कधी आला नाही
ही पापणी जणू सागरतट तर नाही?

म्हणतेस नेहमी ‘फक्त मित्र’ हे माझे
सर्वांना ते वाक्य सरसकट तर नाही?

केलीस आज मदत मनापासून जरी
होणार उद्या वसुली दुप्पट तर नाही?

नम्रता तुझ्या वागण्यात दिसते आहे
तुजवर आले कुठले संकट तर नाही?

कोठून कसा नवीन सुगंध हा आला?
हा पण कृृृृत्रिम आणि बनावट तर नाही?

केलेत वार पण घाव दिसेना काही
ही लेखणीच माझी बोथट तर नाही?

क्षितिजापलीकडे काहीच दिसत नाही
सीमित करणारी ही चौकट तर नाही?

ठेच वाटेतली प्रश्न घेउनी येते
येथेच प्रवासाचा शेवट तर नाही?

© भूषण कुलकर्णी

बहाणे

पुन्हा सोडण्याचे बहाणे नको
नको सोबतीला शहाणे नको

मला शोधण्या मी निघालो अता
जुन्या ओळखीचे उखाणे नको

जया हक्क आरक्षणाचा नसे
असे नामधारी घराणे नको

मला माय माझी मराठी म्हणे
पुन्हा मुंबईहून ठाणे नको

जिथे राजनेता जराही दिसे
अशा राजमार्गास जाणे नको

इथे रोज रणशिंग फुंकायचे
वसंता, तुझे गोड गाणे नको

© भूषण कुलकर्णी

पहारा

कोण जाणे दूर कोठे तो किनारा राहिला?
सोबतीला आज माझ्या फक्त वारा राहिला

वाहिले सर्वस्व माझे, काय झाले शेवटी?
सागरी गेली नदी पण तोच खारा राहिला

मी सजा भोगून आता लोटली वर्षे तरी
येथला माझ्याच नावाचा पुकारा राहिला

व्यक्त होण्याची किती आहेत येथे साधने!
का तरीही भावनांचा कोंडमारा राहिला?

काय खोटे अन् खरे, आता तपासावे कसे?
माहितीचा केवढा येथे पसारा राहिला!

ही नवी भाषा निसर्गाची कळेना मानवा
रोज खालीवर कितीदा होत पारा राहिला!

आठवेना देश ह्या सामान्य लोकांना अता
शक्तिशाली मात्र सीमेवर पहारा राहिला

© भूषण कुलकर्णी

बेत

अंतरी बेत सजवून घे थोडे
भाग्य पाहून जुळवून घे थोडे
 
वाट पाहू नको त्या वसंताची
तू स्वतः आज बहरून घे थोडे
 
पाहवेना अता ते समाजाला
आपले सौख्य लपवून घे थोडे
 
एवढा बोलका मी जरी नाही
सत्य ते तूच वदवून घे थोडे
 
आज मोर्चा निघे देशभक्तांचा
त्यामध्ये पाप दडवून घे थोडे
 
© भूषण कुलकर्णी