संदेश

नाते तुझे नि माझे सांगू नको कुणाला
वैरी परस्परांचे वाटो भले जगाला*

जास्तीत जास्त अपुल्या होतील चार भेटी
मग एवढी तयारी प्रत्येकदा कशाला?

अर्धा भरून किंवा अर्धा म्हणा रिकामा
आधी पहा, कदाचित गळका असेल प्याला

पत्ता मनातला जो खोडायला निघालो
संदेश एक नावापुरता तिथून आला

धावायचा सदा तो, पण थांबलाय आता
रस्त्यास अंत नाही, वाटत असेल त्याला

आता जराजराशी ही ज्योत मंद व्हावी
होईल शांत तेव्हा समजू नये कुणाला

© भूषण कुलकर्णी
(* मतला सुचवला आहे गोपीनाथ लंगोटे यांनी)

चालताना

हेच तर होणार भरभर चालताना
वाढते अपुल्यात अंतर चालताना

एकटे पडलो कधी कळलेच नाही
एक होतो ना अगोदर चालताना*

धावताना राहिले जे काय मागे
आठवत राहील नंतर चालताना

मन अगोदर थकत जाते, पाय नंतर
भावना इतक्या अनावर चालताना

आळशी नाहीत सगळे लोक येथे
थांबले असतील क्षणभर चालताना

एक आशा सर्व ताऱ्यांना असावी
विश्व समजावे कधीतर चालताना

© भूषण कुलकर्णी

दिशाहीन

कुणी भरोसा कसला द्यावा?
दिशाहीन वाहतात नावा

दिशा मिळो वा मिळू नये पण
तुझा हात हातात असावा*

दिशाभूल धरतीने केली
ताऱ्यांनी रस्ता सुचवावा

एक नाव क्षितिजावर दिसते
त्याच दिशेने सगळे जावा

ज्या मार्गाने नाव चालली
किती वेळ राहील पुरावा?

मिसळुन जावे सागरात मी
प्रवास कुठला शेष नसावा

चिमणी बसली नावेवरती
अता किनारा जवळ असावा

© भूषण कुलकर्णी

नामदेव

विठ्ठला, आता कधी भेटायचे ठरवून घे रे
ठरवताना आमच्याही भावना समजून घे रे

जेवल्यावर देव मग मी खायचे, आई म्हणाली
या भुकेल्या बालकासाठी तरी खाऊन घे रे!

भेटल्यावरही तुला का राहिलो कच्चा घडा मी?
एक आवा माझियासाठी नवा बनवून घे रे

देवळामागेच कीर्तन हरिजनांचे चाललेले
क्षणभरासाठी तरी अपुली दिशा बदलून घे रे

चांगदेवासारखा मी धाडला कोराच कागद
विठ्ठला, समजायचे ते सर्व तू समजून घे रे

पाहवेना ही समाधी कोवळ्याशा ज्ञानियाची
बांध फुटल्या नामदेवाला उरी कवळून घे रे

© भूषण कुलकर्णी

पाऊस

नभाचा जीव मातीवर जडू शकतो
अता पाऊस केव्हाही पडू शकतो

उडू द्यावे धुळीला मोकळे सध्या
तिला पाऊस नंतर आवडू शकतो

उन्हाला तेवढीही मोकळिक नसते
जसा पाऊस हळवासा रडू शकतो

तुला माझ्या उन्हाबद्दल कसे सांगू?
तुलाही पावसाळा नावडू शकतो

हवा थांबायला पाऊस हा आता
पुन्हा पक्षी हवे तिकडे उडू शकतो

© भूषण कुलकर्णी

अटळ

कालचा डोह झाला उथळ वाटते
पाय भिजताच लागेल तळ वाटते

काय असते तळाशी, तळाला कळे
पाहणाऱ्यास पाणी नितळ वाटते

वाफ होण्यास आरंभ होइल अता
ओलसर एक बसणार झळ वाटते

बंधनातच जिणे सागरासारखे
मग करू काय घेऊन बळ वाटते

पाहिले खूपसे अर्थ हसण्यामधे
फक्त असतात अश्रू निखळ वाटते

लाट पहिली जशी, लाट पुढची तशी
तेच ते होत जाणे अटळ वाटते

© भूषण कुलकर्णी

आवड

पेपर गेला बराच अवघड
म्हणे व्यवस्था ही नाही धड

म्हणे कुणाला करू नये जज
ज्याची त्याची असते आवड

एक आणली फांदी तोडुन
त्यास मानले पूजेचा वड

विचार नव्हता खोल एवढा
मात्र बोलणे होते परखड

कविता कंटाळून परतली
सतत मनाची सुरूच बडबड

दुःख कसे मी सांगू त्यांना?
तिथे सुरू आधीच रडारड

वेळच नसतो डागडुजीला
फार मनाची होते पडझड

© भूषण कुलकर्णी

दाह

वेगळे आहोत आपण हे बरे झाले
माणसे आहोत आपण हे बरे झाले

दाह दुसऱ्यांना नको अन् आपल्यालाही
कवडसे आहोत आपण हे बरे झाले

प्राप्त असते जाणिवांना वेदना होणे
कोडगे आहोत आपण हे बरे झाले

आपल्यातच सापडू शकतो अता हीरा
कोळसे आहोत आपण हे बरे झाले

जी हवी ती आपली प्रतिमा बघत राहू
आरसे आहोत आपण हे बरे झाले

गोडवा टिकला खरा नात्यामधे अपुल्या
दूरचे आहोत आपण हे बरे झाले

© भूषण कुलकर्णी

पाने

वाहत्या वाऱ्यात फडफडतात पाने
त्याच आठवणीत मग झुलतात पाने

सांगतो वारा भराऱ्या पाखरांच्या
जागच्या जागीच सळसळतात पाने

थेंब हलकेसे मनावर शिंपडावे
खूप दिवसांनी अशी भिजतात पाने

फूल एखादे कुठेतर जन्म घेते
शेकडो साधीसुधी हसतात पाने

सावलीमधल्या फुलाला प्रश्न पडला
एवढी गंभीर का दिसतात पाने?

जन्म घेणे, सोसणे, मातीत पडणे
यापुढे स्वप्ने बघत नसतात पाने

सोबती एकेक जेव्हा दूर जातो
सर्व आशा सोडुनी गळतात पाने

© भूषण कुलकर्णी

लक्ष नव्हते

तू मला बोलावताना लक्ष नव्हते
दुःखही मग ऐकताना लक्ष नव्हते

लक्ष मुक्कामाकडे ठेवून होतो
वाट साधी चालताना लक्ष नव्हते

खटकल्या होत्या तुझ्या दोनेक गोष्टी
चांगले तू वागताना लक्ष नव्हते

जिंकल्यावर वेदना इतकीच आहे
घाव इतके लागताना लक्ष नव्हते

आज वारा बोलला कानात माझ्या
आजवर मी बोलताना लक्ष नव्हते?

© भूषण कुलकर्णी