भ्रमर

खूप दिवसांनी अता ओळी नव्या सुचतील का?
पानगळ झाली, पुन्हा पाने नवी फुटतील का?

रोज भ्रमरांना बघितले चुंबितेवेळी फुले
मग अता ह्रदये कळ्यांची कोवळी उरतील का?

वेगळ्या वाटेस गेलो, वेगळे झालो तरी
वेदना आपापल्या या आपल्या असतील का?

वाटण्याआधी कुतूहल मारले जाते इथे
शिक्षणाआधीच म्हणती, नोकर्‍या मिळतील का?

शुद्ध माझ्या भावना असल्या तरी भय वाटते
बोलताना शब्द काही वावगे ठरतील का?

© भूषण कुलकर्णी

प्रकाश

चालताना तोल माझा ढळत गेला
हात धरलेला तुझाही सुटत गेला

माणसाचा जन्म म्हणजे मद्यशाळा
जो कुणी आला, इथुन धडपडत गेला

माणसे वेगात मागे पडत गेली
अन् मला माझाच रस्ता दिसत गेला

मी प्रकाशाला सरळ समजून बसलो
मात्र तो आकर्षणाने वळत गेला

तो मनाला वाटले ते घेत गेला
हाच संगम संस्कृृृतींचा म्हणत गेला

वाचला सुविचार, त्याची ही कहाणी
कळत गेला, वळत गेला, टळत गेला

© भूषण कुलकर्णी

मी एकटा

मैफिलीचे स्वप्न पाहत रंगतो मी एकटा
मात्र मैफिल रंगल्यावर राहतो मी एकटा

कर कुणाच्याही हवाली तू ह्रदय आता तुझे
स्पंदने पण सर्व त्याची जाणतो मी एकटा

दिसत होते झाड मोठे, पण तरी मी टाळले
म्हणत होते की, फळे ही पिकवतो मी एकटा

वेदना सार्‍या जगाच्या घेतल्या ऐकून मी
शेवटी सारांश उरला, सोसतो मी एकटा

ते असे गेले पुढे, काही न झाल्यासारखे
मागच्या गोष्टींत वेडा गुंततो मी एकटा

पाहिले स्टेटस तुझे मी, टॅग अन् हॅश्टॅगही
पण तुझा प्रत्येक फोटो सांगतो, “मी एकटा”

मी इथे आलो कशाला? जात आहे मी कुठे?
उत्तरे याची नव्याने शोधतो मी एकटा

नाव काहीही असू दे, वासना वा भावना
आतल्या युद्धात केवळ जिंकतो ‘मी’ एकटा

© भूषण कुलकर्णी

झाशी

सलामत रहावी अयोध्या नि काशी
कराया हवी सज्ज प्रत्येक झाशी

जणू ग्रंथ डोक्याजवळ ठेवलेला
असू दे तुझा हात माझ्या उशाशी

इथे पंगती सारख्या मांडलेल्या
कसे ओळखावे अधाशी, उपाशी?

नको थांबणे अन् नको धावणेही
जगाने असा मोजला वेग ताशी

पडू द्या जरा बातमी थंड सध्या
नको द्यायला त्यास आताच फाशी

पहा, कल्पवृक्षास आला शहारा
कवी एक बसलाय त्याच्या तळाशी

© भूषण कुलकर्णी

सापळे

सुंदर अक्षर पानावर लिहिलेले दिसते
तेथे खाडाखोड जराशी खटकत असते

मी, माझे या जाळ्यापासुन सुटका व्हावी
वाटणार नाही मग, कोणी माझे नसते

थांग प्रवाहाच्या खोलीचा लागत नाही
पण वरवरची खळखळ केवळ मनात ठसते

पुढे खुले आकाश, पंख फुटलेत तरीही
आजकाल घरट्यात पाखरू उदास बसते

आज सापळे असेही रचत जातो आपण
उद्या नेमके आपलेच मन तेथे फसते

© भूषण कुलकर्णी

दवबिंदू

दिवाळीत ह्या खुलून यावे रंग आपले नवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

पुनवेला वा अमावसेला
चंद्र वास्तविक गोल सर्वदा
क्षमता आणिक संधीमधले जुळून यावे दुवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

किती दिली सूर्याने किरणे
हिशेब नाही कधी ठेवले
उजळू परिसर आपणसुद्धा जरी असू काजवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

ब्रह्मांडाच्या कालपटावर
पृृृृथ्वी क्षणभर, तारे क्षणभर
क्षणभंगुर पण असेल सुंदर, ते जीवन मज हवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

प्रेम असे निष्काम असावे

(भरत जेव्हा श्रीरामांना परत नेण्यासाठी हट्ट करतो, पण श्रीराम वचनपालनापासून ढळत नाहीत, तेव्हा सर्व लोक जनक महाराजांना निवाडा करण्याची विनंती करतात. त्यावेळी जनक महाराज म्हणतात…)

श्रींच्या चरणी अनन्य व्हावे
प्रेम असे निष्काम असावे

रामप्रभू हे धर्मध्वजाधर
भरता, तू प्रेमाचा सागर
इतका सुंदर बघता संगर
न्यायनिवाडे सर्व हरावे
प्रेम असे निष्काम असावे

हक्क तुझा रामावर भरता
हट्ट तुझा हा योग्य सर्वथा
निर्मळ प्रेमळ अंतर असता
धर्माहुन ते श्रेष्ठ ठरावे
प्रेम असे निष्काम असावे

एक नियम पण प्रेम पाळते
अपेक्षा न ते कुठली करते
विजय जगावर जरी मिळवते
विजयाचेही भान नसावे
प्रेम असे निष्काम असावे

भरता, तू जर राजा बनशिल
अपकीर्तीचा भागी होशिल
सोड भिती ही, राम पाहतिल
भक्ताने ना कशास भ्यावे
प्रेम असे निष्काम असावे

परिस्थिती ही राम जाणतो
तुझी स्पंदने राम ऐकतो
तो सार्‍यातुन तारुन नेतो
पूर्ण समर्पण तिथे करावे
प्रेम असे निष्काम असावे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

पालखी

भूतकाळाची कबर उकरून झाली
राहिलेली हाडके चघळून झाली

होत आहे वेळ कसला निर्णयाला?
साक्ष सगळ्यांची अता वदवून झाली

वाटले, येशील मथुरेहून गावी
पण तुझी तर द्वारका वसवून झाली

जन्म सरल्यावर म्हणे, जगलोच नाही
कारणे आपापली ठरवून झाली

एक इच्छा शेवटी उरणार आहे
आज इच्छा कालची पुरवून झाली

न्यायची आहे कुठे, माहीत नाही
जीवनाची पालखी सजवून झाली

© भूषण कुलकर्णी

चांदणी

कसे कळावे, काय व्हायचे मरणानंतर?
कळेल हा पिंजरा, त्यातुनी सुटल्यानंतर

होती इतकी दूर चांदणी माझ्यापासुन
प्रकाश पोहोचला इथे, ती विझल्यानंतर

एखादा सांगतो स्वतःच्या इच्छा त्याला
एखादा हळहळतो, तारा तुटल्यानंतर

ही दुनिया जर स्वप्नच आहे कुणाचेतरी
विसरणार तर नाही ना तो उठल्यानंतर?

© भूषण कुलकर्णी

आवाज

व्यक्त व्हायचे ठरल्यावर गोंगाट वाढला माझा
घटत राहिला त्यानंतर आवाज आतला माझा

अजून माझ्या जगण्याचा मी अर्थ शोधतो आहे
तिथे जगाने जन्माचा सारांश काढला माझा

इथे पसारा सुखांचा जसा वाढत वाढत गेला
तसा त्यामधे कुठेतरी आनंद हरवला माझा

चालत गेलो एकटाच अन् ठसे स्वतःचे पुसले
म्हणू नका, त्या मूर्खांनी आदर्श ठेवला माझा

खरा चेहरा सापडणे जर इतके अवघड आहे
नसेल त्याने कुठलाही चेहरा बनवला माझा

आधाराच्या धाग्याची जाणीव शेवटी झाली
पतंग जेव्हा जवळजवळ वार्‍यावर पडला माझा

© भूषण कुलकर्णी