ऋतू

चालण्याची सवय जडली, थांबणे विसरून गेले
पोचता शिखरावरी काहीतरी हरवून गेले

वाद होता तो, तिथे संवाद नावालाच होता
काय जे बोलायचे, आधीच ते ठरवून गेले

आत जे आधीच होते, तेवढे संस्कार झाले
माहितीपुरतेच उरले, जे नवे शिकवून गेले

आठवण मधल्या ऋतूंची राहिली नाही जराही
तेच आठवतात जे फुलवून वा सुकवून गेले

© भूषण कुलकर्णी

बहीण

छोट्याछोट्या गोष्टींवरुनी रुसते, रडते, फुगते
बहीण माझी तेव्हा छोटी मुलगी वाटत असते

विविध विषयांवरती चर्चा मोकळेपणे करते
मैत्रीण जिवाभावाची मज बहिणीमध्ये मिळते

कधीकधी वेगळ्या विचारांची बाजू दाखवते
बहीण छोटी तेव्हा नकळत मोठी होउन जाते

परगावी मी असताना सारखी चौकशी करते
माझ्या बहिणीमध्ये तेव्हा वत्सल आई येते

आईबाबांची, मोठ्यांची समजुत घालत असते
बहीण तेव्हा भक्कमसा आधार घराचा बनते

इतके सारे करताना ती मधेच “भैया” म्हणते
धाकटीच ती बहीण आहे, पुन्हा मला आठवते!

© भूषण कुलकर्णी

मनात यावी राधा

सर्व जगाला श्रीकृष्णाची कोण दिसावी राधा?
केवळ देहच बघणार्‍यांना कशी कळावी राधा?

गोकुळापरी विश्व रहावे, नको द्वारका, मथुरा
कृष्ण नेहमी असेल येथे, तरी असावी राधा

गीतेचा उपदेश समजणे अवघड होई तेव्हा
कृष्णाची बासरी ऐकण्या मनात यावी राधा

सभोवताली किती रुपांनी मुरली वाजत असते!
कधीतरी या ह्रदयामधली जागी व्हावी राधा

पूर्णत्वाच्या मागे मागे विश्व धावते आहे
स्वयंपूर्ण तो मुरलीधरही म्हणे, मिळावी राधा

© भूषण कुलकर्णी

बासरी

ती बासरी मनाला
शोधून हाक देते
लाखात एकटीच्या
ह्रदयात साद जाते

त्या कृृृष्णबासरीने
माझी न मीच उरते
खांद्यावरून त्याच्या
हे सप्तसूर बघते

पडतात बासरीचे
मधुमंद सूर कानी
उरले कुठे कुणाला
बोलावयास काही?

मैत्रीण, प्रेयसी वा
मज काय नाव द्यावे?
मी कृृृष्णरूप झाले
त्यालाच सर्व ठावे!

© भूषण कुलकर्णी

लिहितो

ह्रदयावरचे ओझे हलके करण्यापुरते लिहितो
कठीण वेळी मी थोडेसे हसण्यापुरते लिहितो

हसतेवेळी कधी खोलवर विचार पोचत नाही
म्हणून आपण बर्‍याचवेळा रडण्यापुरते लिहितो

प्रश्नपत्रिका आयुष्याची अवघड दिसते आहे
फारफारतर ढकलपास मी ठरण्यापुरते लिहितो

कविता ती, जी ह्रदयामध्ये दबून राहत नाही
खरा कवी त्यावेळी केवळ जगण्यापुरते लिहितो

विद्यार्थ्याचे साहित्याशी देणेघेणे नसते
आजकाल तो परीक्षेत गुण मिळण्यापुरते लिहितो

ती गेल्यावर जीवनातले गीत संपले होते
जे उरले ते तिला कधीतर कळण्यापुरते लिहितो

पात्रांनाही कधी कथानक त्याचे ठाउक नसते
असे नाट्य तो नशिबामध्ये बघण्यापुरते लिहितो

© भूषण कुलकर्णी

टेकडी

आतमध्ये मी स्वतःच्या पाहिले वाकूनही
नेमके काहीच नाही गवसले शोधूनही

आतली निंदास्तुती चालूच होती नेहमी
मी जरी बाहेरच्यांना पाहिले टाळूनही

समजले नाही कधी मी राहिलो शिखरावरी
समजते, आलोय आता टेकडी उतरूनही

मंद उतरणही असू शकते सरळ रस्त्यामधे
पातळी घसरेल खाली एवढे चालूनही

देव अन् नियतीसही घ्यावे समीकरणामधे
अन्यथा उत्तर मिळत नाही गणित मांडूनही

© भूषण कुलकर्णी

भावना दुखावते

एक पान नेहमी हवेत हालते
एक ज्योत चारही दिशांत वाकते
त्यांस एक मंद झुळुकही सतावते
आमची तशीच भावना दुखावते

धर्म, जात, पंथ, वंश, आडनावही
देश, राज्य, प्रांत, गाव, वर्ण, खेळही
अस्मिता दिसेल, वा दडून राहते
आमची लगेच भावना दुखावते

गीत, लेख, गद्य, पद्य, चित्र, शब्दही
पोस्ट, त्यावरी रिएक्ट अन् कमेंटही
कोठुनी तरी मनात खुट्ट वाजते
आमची लगेच भावना दुखावते

पर्वतापरी बनव स्वतःस भावने
परतवून लाव सर्व वाद-वादळे
जी दुखावता प्रलय महान येतसे
भावना अशी जगास पूज्य होतसे

© भूषण कुलकर्णी

मग आपण मोठे झालो…

किती छान होते ते दिवस…
आई देवापुढे दिवा लावायची,
आपण हात जोडून बसायचो
बाबा कामाहून घरी यायचे,
आपण शिस्तीतही खुश व्हायचो
शाळेत शिक्षक शिकवायचे,
आपण मन लावून ऐकायचो
सरांनी, आईबाबांनी रागावलं,
तरी त्यांचा आदर रहायचा
खेळताना मित्रांशी भांडायचो,
नंतर पुन्हा सोबत खेळायचो
सचिन सेहवाग आऊट झाला,
तर वाईट वाटायचं, राग यायचा
पण पुढच्या मॅचला नक्की चालेल,
असा विश्वासही वाटायचा
‘शक्तिमान’ फक्त रविवारी दिसायचा,
आपण किती कौतुकानं पहायचो!
कधीकधी घरात गोडधोड व्हायचं,
त्याचं किती अप्रूप वाटायचं!

मग आपण मोठे झालो…
जीवनाचा अर्थ वगैरे शोधू लागलो
आई देवापुढे दिवा लावते,
आपण तिकडे बघत नाही
बाबा कामाहून घरी येतात,
आपण आपल्याच नादात असतो
काही नवीन शिकायचं म्हटलं,
की करिअरचा स्कोप विचारतो
स्टेटस बघून मित्र बनवू लागलो,
जरा बिनसलं की तोडू लागलो
चांगला सिनेमा बघत असताना,
मधेच मोबाइल चेक करू लागलो
कुणी लवकर आऊट झाला,
की “त्याला काढून टाका” म्हणू लागलो
वाटेल तेव्हा वाटेल ते खायला मिळतं,
पण आवडीचा पदार्थही
आता तेवढा आवडत नाही

करिअर, पैसा, यश, करमणूक,
या चार भिंतींत
अडकलोय का आपण?
मागं जाता येणार नाही,
खरंच इतकं पुढं
आलोय का आपण?
पण वाटतं कधीकधी,
पुढं जायचं ते कशासाठी?
कुणासाठी, आणि कुठपर्यंत?
जीवनाची दिशा सापडत नाही,
अर्थ तर मुळीच कळत नाही

अशा वेळी जगत राहूया…
घरून एक फोन येतो,
बरं वाटतं तेव्हा
जुन्या मित्राचा मेसेज येतो,
बरं वाटतं तेव्हा
कंपनीत कुणी हसून बोलतं,
बरं वाटतं तेव्हा
असं बरंच काही होतं,
बरं वाटतं तेव्हा!

जीवनाचा खरा अर्थ जेव्हा कळेल,
‘जगणं’ हाच तर तो अर्थ नसेल?

© भूषण कुलकर्णी

गैरसमज

काय बोलू तुझ्या प्रवाहावर?
राहिलो नेहमी किनार्‍यावर

गैरसमजास का दिला थारा?
सोबती मोजकेच असल्यावर

पाहते मन पुन्हापुन्हा मागे
वाट अंधुक समोर दिसल्यावर

दार उघडेच ठेवले आहे
एक संधी निघून गेल्यावर

याद इथली इथेच मेली तर
भार नाही पुढील जन्मावर

© भूषण कुलकर्णी

आनंदयात्री

आनंदयात्री व्हायचे आहे कसे समजायला
कोणासही लागू नये आयुष्यभर थांबायला

त्यांनी दिली सोडून जेव्हा बोलताना पायरी
माझ्याकडे काहीच नाही राहिले बोलायला

सोडू नका इतक्यात कोण्या काजव्याची संगती
अद्यापही अवकाश आहे सूर्य तो उगवायला

बाहेर येती भूतकाळी गाडलेले कोळसे
भेटू नये मज वेळ इतका अंतरी शोधायला

वाचायला सोप्याच गाथा संतहो रचल्या तुम्ही
पण जन्म जातो माणसाचा अंतरी बाणायला

© भूषण कुलकर्णी