पाऊस

नभाचा जीव मातीवर जडू शकतो
अता पाऊस केव्हाही पडू शकतो

उडू द्यावे धुळीला मोकळे सध्या
तिला पाऊस नंतर आवडू शकतो

उन्हाला तेवढीही मोकळिक नसते
जसा पाऊस हळवासा रडू शकतो

तुला माझ्या उन्हाबद्दल कसे सांगू?
तुलाही पावसाळा नावडू शकतो

हवा थांबायला पाऊस हा आता
पुन्हा पक्षी हवे तिकडे उडू शकतो

© भूषण कुलकर्णी

अटळ

कालचा डोह झाला उथळ वाटते
पाय भिजताच लागेल तळ वाटते

काय असते तळाशी, तळाला कळे
पाहणाऱ्यास पाणी नितळ वाटते

वाफ होण्यास आरंभ होइल अता
ओलसर एक बसणार झळ वाटते

बंधनातच जिणे सागरासारखे
मग करू काय घेऊन बळ वाटते

पाहिले खूपसे अर्थ हसण्यामधे
फक्त असतात अश्रू निखळ वाटते

लाट पहिली जशी, लाट पुढची तशी
तेच ते होत जाणे अटळ वाटते

© भूषण कुलकर्णी

निजली आहे एक परी

सुंदर स्वप्ने तिच्या उरी
निजली आहे एक परी

जोजवती तिज गाता गाता
शीत मंद झुळुकांच्या लाटा
तारे लुकलुकती अंबरी
निजली आहे एक परी

तिच्या सभोती फूलपाखरे
कितीकिती नाजूक पहारे!
हळू थांबती ओठांवरी
निजली आहे एक परी

तिला चांदणे टिपते अलगद
तिला स्पर्शतो वारा सावध
कला शिकव ही मला तरी
निजली आहे एक परी

तिच्या बटांना जरा छेडु का?
या ओठांवर ओठ ठेउ का?
नको नको, थांब क्षणभरी
निजली आहे एक परी

© भूषण कुलकर्णी

आवड

पेपर गेला बराच अवघड
म्हणे व्यवस्था ही नाही धड

म्हणे कुणाला करू नये जज
ज्याची त्याची असते आवड

एक आणली फांदी तोडुन
त्यास मानले पूजेचा वड

विचार नव्हता खोल एवढा
मात्र बोलणे होते परखड

कविता कंटाळून परतली
सतत मनाची सुरूच बडबड

दुःख कसे मी सांगू त्यांना?
तिथे सुरू आधीच रडारड

वेळच नसतो डागडुजीला
फार मनाची होते पडझड

© भूषण कुलकर्णी

दाह

वेगळे आहोत आपण हे बरे झाले
माणसे आहोत आपण हे बरे झाले

दाह दुसऱ्यांना नको अन् आपल्यालाही
कवडसे आहोत आपण हे बरे झाले

प्राप्त असते जाणिवांना वेदना होणे
कोडगे आहोत आपण हे बरे झाले

आपल्यातच सापडू शकतो अता हीरा
कोळसे आहोत आपण हे बरे झाले

जी हवी ती आपली प्रतिमा बघत राहू
आरसे आहोत आपण हे बरे झाले

गोडवा टिकला खरा नात्यामधे अपुल्या
दूरचे आहोत आपण हे बरे झाले

© भूषण कुलकर्णी

पाने

वाहत्या वाऱ्यात फडफडतात पाने
त्याच आठवणीत मग झुलतात पाने

सांगतो वारा भराऱ्या पाखरांच्या
जागच्या जागीच सळसळतात पाने

थेंब हलकेसे मनावर शिंपडावे
खूप दिवसांनी अशी भिजतात पाने

फूल एखादे कुठेतर जन्म घेते
शेकडो साधीसुधी हसतात पाने

सावलीमधल्या फुलाला प्रश्न पडला
एवढी गंभीर का दिसतात पाने?

जन्म घेणे, सोसणे, मातीत पडणे
यापुढे स्वप्ने बघत नसतात पाने

सोबती एकेक जेव्हा दूर जातो
सर्व आशा सोडुनी गळतात पाने

© भूषण कुलकर्णी

लक्ष नव्हते

तू मला बोलावताना लक्ष नव्हते
दुःखही मग ऐकताना लक्ष नव्हते

लक्ष मुक्कामाकडे ठेवून होतो
वाट साधी चालताना लक्ष नव्हते

खटकल्या होत्या तुझ्या दोनेक गोष्टी
चांगले तू वागताना लक्ष नव्हते

जिंकल्यावर वेदना इतकीच आहे
घाव इतके लागताना लक्ष नव्हते

आज वारा बोलला कानात माझ्या
आजवर मी बोलताना लक्ष नव्हते?

© भूषण कुलकर्णी

वादळ

मनात कुठले वादळ लपले कसे कळावे?
वरवरचे की खुशीत हसले कसे कळावे?

सुरुवातीला आपण सगळे सोबत होतो
नंतर कोठे अंतर पडले कसे कळावे?

आठवते की एक झरा प्रेमाचा होता
कुठून होते पाझर फुटले कसे कळावे?

किमान थोडे तरी बोलणे व्हावे आता
विसरलात की मनात स्मरले कसे कळावे?

प्रश्नपत्रिका कोण काढतो आयुष्याची?
किती कोणते उत्तर चुकले कसे कळावे?

वाटाघाटी चालू झाल्या नात्यामध्ये
काय मिळवले काय हरवले कसे कळावे?

धूळ विचारत आहे थोडे विसावताना
वादळ सरले अथवा उरले कसे कळावे?

© भूषण कुलकर्णी

मजकूर

क्षितिजापर्यंत त्यांच्या पाणी भरून ठेवा
मग बोलतील सारे, वंदन समुद्रदेवा!

कंटाळलो जरासा ह्या रोजच्या सुखांना
म्हटले करून पाहू थोडी समाजसेवा 

आदर्श मानले पण आदर कमीच होता
त्यांचा मला कुठेतर वाटत असेल हेवा

थोडाच वेळ घेतो आस्वाद मी कलेचा
थोडाच अर्थ कळतो अन बोलतो, अरे वा!

मजकूर खूप सारे मिनिटांत स्क्रोल केले
एखाद-दोन केवळ वाचून वाटले, वा!

© भूषण कुलकर्णी

सत्य

सत्य असते कठोर
सत्य म्हणजे कट्यार
फुलासारख्या मनाच्या
घुसू पाहे आरपार

सत्य म्हणजे तांडव
कल्पनांच्या माथ्यावर
त्यातूनच उगवेल
नव्या ज्ञानाचा अंकुर

सत्य हेच हलाहल
कसे सहन होणार?
फक्त शेवटी शेवटी
हाती अमृृत येणार

सत्य पचवण्यासाठी
व्हावे लागेल शंकर
मग होईल प्रवास
सत्य, शिव अन् सुंदर!

© भूषण कुलकर्णी