उशीर

किती सांग देवा तुला आळवावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?

प्रभाती तिच्या गर्द अंधार झाला
शिळा होउनी राहिली मग अहिल्या
कुणी काय आयुष्य शापित जगावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?

उभा जन्म शबरी करी फक्त सेवा
अपेक्षा तिची की, इथे राम यावा
अशा योग्यतेचे कधी मी बनावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?

अजुन सोसते घोर अन्याय मीरा
गरीबीच वाट्यास येते कबीरा
तुझी योजना काय, कोणास ठावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?

जणू घेत आहेस अमुची परीक्षा
कधी वाटते, देत आहेस शिक्षा
मनातील वादळ कसे शांत व्हावे?
तुझे सत्य उशिराच का रे कळावे?

© भूषण कुलकर्णी

ठिपके

कोपर्‍यातिल चार ठिपके फक्त पाहत राहिलो
ते कशाचे चित्र होते, हेच विसरत राहिलो

वाटले होते, पुढे होईल काही चांगले
मी स्वतःचा वेळ हारुन द्यूत खेळत राहिलो

कोंडलेला एक नायक, चार भिंती नायिका
त्याच घुमणार्‍या ध्वनीची गोष्ट सांगत राहिलो

वेळ गेल्यावर पुन्हा माझे मला आले हसू
काय होतो मी, स्वतःला काय समजत राहिलो

कल्पवृृृक्षाला सहज मी सोडले नाही कधी
कल्पनाशक्तीच त्याला जास्त मागत राहिलो

© भूषण कुलकर्णी

देहाचे बंधन

तो गोकुळ सोडुन गेला
वाटते लौकिकार्थाने
येथेच बासरी त्याची
येथेच राहिले गाणे

विरहाची भक्ती सोपी
सारखी आठवण येते
वेदना जेवढी उत्कट
आनंद तेवढा देते

मी स्वतःस विसरुन जाते
तेव्हा तो येथे येतो
मी भानावर आले की
तो पुन्हा नाहिसा होतो

तो येथे आणत नाही
कुठल्या युद्धाची धूळ
ती तशीच वाजत असते
मुरलीची मंजुळ धून

एकरूप झाली ह्रदये
मग कसली ताटातूट?
तो आहे अथवा नाही
हे देहापुरते द्वैत

लोकांना लाखो शंका
पण राधेला हे कळते
देवाच्या अवताराला
देहाचे बंधन असते

© भूषण कुलकर्णी

खारीचा वाटा

आपण केवळ देऊ शकतो खारीचा वाटा
आहे, नाही, कोण पाहतो खारीचा वाटा

माहित नाही कुठे चालला आहे हा सेतू
आम्ही केवळ त्यात टाकतो खारीचा वाटा

हात तसे तर लाखो होते त्या कार्यामागे
एखादा लक्षात राहतो खारीचा वाटा

हत्तीला जर त्याची क्षमता जाणवली नाही
कसाबसा तो उचलत असतो खारीचा वाटा

जीवनभर जो मेहनतीने साठवला जातो
वादळ येता क्षणात उडतो खारीचा वाटा

कामामध्ये जेव्हा काही राम दिसत नाही
कशास द्यावा आम्ही म्हणतो खारीचा वाटा?

© भूषण कुलकर्णी

अवतार

हे प्रभो, शिवशंकरा, तू एकदा अवतार घ्यावा
प्रेम अन् वैराग्य यांना सत्य सुंदर अर्थ द्यावा

ज्ञान आहे बाह्य माझे, दीप चेतव आतला
निर्गुणाचीही जरा जाणीव होऊ दे मला
ब्रह्म माया ऐकलेले, अर्थ त्यांचा पोचवावा
हे प्रभो, शिवशंकरा, तू एकदा अवतार घ्यावा

वाटले जे संत होते, सत्व त्यांचे भंगले
आपल्या निवृत्तिचे बाजार त्यांनी मांडले
सत्य धर्मावर पुन्हा विश्वास अमुचा जागवावा
हे प्रभो, शिवशंकरा, तू एकदा अवतार घ्यावा

उंच पर्वत, वृृृृक्षवल्ली प्रिय तुझे आहेत जे
तू समाधीतून उठल्यावर कमी दिसतील ते
तू रहावे शांत तेव्हा, मार्ग पुढचा दाखवावा
हे प्रभो, शिवशंकरा, तू एकदा अवतार घ्यावा

राम आले, कृृृष्ण आले, तू कधी येशील रे?
सांग ह्या सामान्य लोकांना कधी दिसशील रे?
एक इथला जन्म म्हणजे क्षणभराचा वेळ द्यावा
हे प्रभो, शिवशंकरा, तू एकदा अवतार घ्यावा

© भूषण कुलकर्णी

वाटचाल

थकलेल्या पावलांस आता हीच सांत्वना आहे
चालत असताना रस्ता अर्ध्यात संपला आहे

पुढे पडत असणार्‍या पायाला कोणी सांगावे
दुसरा मागे दुनियेला रोखून थांबला आहे

वाट चालतेवेळी केवळ हीच माहिती आहे
दोन्ही पायांपैकी सध्या पुढे कोणता आहे

आधी उजवा की डावा, एवढाच निर्णय माझा
पुढे पावलांचा क्रम तर त्यानेच ठरवला आहे

त्याच्या जिम मधले एखादे यंत्र असावी दुनिया
इथे धावणारा एका जागीच राहिला आहे

© भूषण कुलकर्णी

मोर

जखमा सवयीच्या झाल्याने काही वाटत नाही
भरलेल्या मडक्यात आणखी पाणी मावत नाही

मेघ बरसले अवकाळी, नाचुन झाले मोरांचे
आजकाल श्रावणात कोणी तितका नाचत नाही

जरा मोकळी जागा दिसली, की ती काळी करतो
इतर कोणता रंग द्यायचा बाकी राहत नाही

पुढे जायचे आहे किंवा खोल जायचे आहे
एकदाच दोन्ही करणे अपुल्याला झेपत नाही

केवळ दुःखाच्या वेळेला अहं नकोसा होतो
बाकी तो वाईट कधी माझ्याशी वागत नाही

लोक भोवती होते तेव्हा स्वतःत गुंतत गेलो
आता बघतो तर कोणीही माझ्यासोबत नाही

© भूषण कुलकर्णी

इतकीच आता प्रार्थना

हे ईश्वरा, परमेश्वरा, इतकीच आता प्रार्थना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

स्मरतात दाहक यातना
करतो निरर्थक कल्पना
सोडव मनाला यातुनी, दे शांतता, सद्भावना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

जाणीव आहे अंतरी
मी बुडबुडा पाण्यावरी
थेंबात माझ्या जाणवू दे सागरी संवेदना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

असतो कधी पेचात मी
रस्ते किती, अवधी कमी
क्षमतेस माझ्या वाव दे, सार्थक ठरव या जीवना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

सुंदर अशा क्षितिजाकडे
चालत रहावे यापुढे
आले मधे काटे तरी वाढत रहावी प्रेरणा
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

प्रेरणा राहिली नाही

ती मनात जेव्हा येते
सामर्थ्य केवढे देते!
पण जास्त थांबली नाही
प्रेरणा राहिली नाही

ऐकले गीत राजांचे
वाजले शंख क्रांतीचे
मग निवांत बसलो आम्ही
प्रेरणा राहिली नाही

पाहिले दीन अन् दुर्बळ
वाटली जराशी कळकळ
पण आत पोचली नाही
प्रेरणा राहिली नाही

वाचले थोर शास्त्रज्ञ
कळले, ज्ञान हेच सत्य
पण ध्यास लागला नाही
प्रेरणा राहिली नाही

ठरवले ध्येय वर्षाचे
अन् पुढे उभ्या जन्माचे
चाललो न अजुनी काही
प्रेरणा राहिली नाही

© भूषण कुलकर्णी

कशासाठी?

थोर स्त्रीपुरुष सारे झुंजले कशासाठी?
मार्ग रोज मळणारे झाडले कशासाठी?

दुःख वाटले जेव्हा प्रश्न पाहिले सोपे
ज्ञान एवढे सारे मिळवले कशासाठी?

शक्यतो दिसत नाही ध्येय चालतेवेळी
वाटते पुन्हा, इतके चालले कशासाठी?

मूळच्या स्वभावाने लोक वागती सारे
आपल्या मनाला मी जाळले कशासाठी?

वेगळ्याच अर्थाने पाहिले तिला आम्ही
कल्पना म्हणाली, मी जन्मले कशासाठी?

चेहरेच पुतळ्यांचे आठवायचे होते
रक्त मग इथे त्यांनी सांडले कशासाठी?

सागरास मिळण्याचे स्वप्न तेवढे माझे
व्हायचे न मोती तर शिंपले कशासाठी?

मोहपाश सुटले पण प्रश्न शेवटी उरले
भाळले कशासाठी? टाळले कशासाठी?

© भूषण कुलकर्णी