सांजवेळी 

गदिमा म्हणायचे, प्रत्येक कलाकृतीची स्वत:ची कुंडली असते. या गझलेबद्दल मी हे अनुभवलं. वैभव जोशी सरांनी गीतलेखनाची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली होती. पहिल्या दिवसानंतर आमच्या निवडक वृत्तबद्ध कविता पाठवायला सांगितल्या होत्या. तेव्हा मी ही गझल पाठवली, सरांना खूप आवडली, आणि श्रेयस बेडेकर यांनी मला बक्षीस म्हणून लगेच चाल लावली. दुसऱ्या दिवशी ती ऐकण्याचा क्षण अविस्मरणीय होता! एका रात्रीत मी गीतकार झालो होतो!!

वैभव सर म्हणाले होते, “एक गझल अशी आली की पुन्हा एकदा मला असं वाटून गेलं, अरे चुकली आपली बस, अपने को ये लिखना चाहिये था…”

ही दाद कायम प्रेरणा देत राहील मला आणखी चांगलं लिहिण्यासाठी!

श्रेयस सरांचे खूप आभार, मनात कायम राहील अशी चाल लावली आहे. संगीत संयोजक सत्यजित केळकर आणि सर्व वादकांचे खूप आभार. वैभव सरांमुळे हे सगळं शक्य झालं, त्यांना खूप खूप धन्यवाद!

हे गाणं नक्की ऐका:

भेट

दिवे लागल्यावर तुझी भेट व्हावी
तृषा चेतल्यावर तुझी भेट व्हावी

अता शाल घेईल ती चांदण्यांची
नदी झोपल्यावर तुझी भेट व्हावी

कसा शांत होणार बेभान वारा?
म्हणे, थांबल्यावर तुझी भेट व्हावी

दवाचा प्रथम स्पर्श अलवार झाला
फुले लाजल्यावर तुझी भेट व्हावी

तुझ्या आठवांनी दिशा व्यापलेल्या
धुके दाटल्यावर तुझी भेट व्हावी

सरींनी नव्या तृप्त होईल माती
नि गंधाळल्यावर तुझी भेट व्हावी

पहा चंद्रताऱ्यांसही झोप आली
किती जागल्यावर तुझी भेट व्हावी?

निघालो सखे सत्य शोधायला मी
तिथे पोचल्यावर तुझी भेट व्हावी

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

इतकीच आता प्रार्थना

हे ईश्वरा, परमेश्वरा, इतकीच आता प्रार्थना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

स्मरतात दाहक यातना
करतो निरर्थक कल्पना
सोडव मनाला यातुनी, दे शांतता, सद्भावना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

जाणीव आहे अंतरी
मी बुडबुडा पाण्यावरी
थेंबात माझ्या जाणवू दे सागरी संवेदना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

असतो कधी पेचात मी
रस्ते किती, अवधी कमी
क्षमतेस माझ्या वाव दे, सार्थक ठरव या जीवना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

सुंदर अशा क्षितिजाकडे
चालत रहावे यापुढे
आले मधे काटे तरी वाढत रहावी प्रेरणा
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

दवबिंदू

दिवाळीत ह्या खुलून यावे रंग आपले नवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

पुनवेला वा अमावसेला
चंद्र वास्तविक गोल सर्वदा
क्षमता आणिक संधीमधले जुळून यावे दुवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

किती दिली सूर्याने किरणे
हिशेब नाही कधी ठेवले
उजळू परिसर आपणसुद्धा जरी असू काजवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

ब्रह्मांडाच्या कालपटावर
पृृृृथ्वी क्षणभर, तारे क्षणभर
क्षणभंगुर पण असेल सुंदर, ते जीवन मज हवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

प्रेम असे निष्काम असावे

(भरत जेव्हा श्रीरामांना परत नेण्यासाठी हट्ट करतो, पण श्रीराम वचनपालनापासून ढळत नाहीत, तेव्हा सर्व लोक जनक महाराजांना निवाडा करण्याची विनंती करतात. त्यावेळी जनक महाराज म्हणतात…)

श्रींच्या चरणी अनन्य व्हावे
प्रेम असे निष्काम असावे

रामप्रभू हे धर्मध्वजाधर
भरता, तू प्रेमाचा सागर
इतका सुंदर बघता संगर
न्यायनिवाडे सर्व हरावे
प्रेम असे निष्काम असावे

हक्क तुझा रामावर भरता
हट्ट तुझा हा योग्य सर्वथा
निर्मळ प्रेमळ अंतर असता
धर्माहुन ते श्रेष्ठ ठरावे
प्रेम असे निष्काम असावे

एक नियम पण प्रेम पाळते
अपेक्षा न ते कुठली करते
विजय जगावर जरी मिळवते
विजयाचेही भान नसावे
प्रेम असे निष्काम असावे

भरता, तू जर राजा बनशिल
अपकीर्तीचा भागी होशिल
सोड भिती ही, राम पाहतिल
भक्ताने ना कशास भ्यावे
प्रेम असे निष्काम असावे

परिस्थिती ही राम जाणतो
तुझी स्पंदने राम ऐकतो
तो सार्‍यातुन तारुन नेतो
पूर्ण समर्पण तिथे करावे
प्रेम असे निष्काम असावे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

सांजवेळी

क्षण ऊनसावल्यांचे सरतील सांजवेळी
सारेच सारखे मग दिसतील सांजवेळी

तुलना उगाच होते वेगात धावण्याची
सारे थकून खाली बसतील सांजवेळी

मिळतील चालताना कित्येक सोबतीला
जे कोण आपले ते कळतील सांजवेळी

शोधायला निघाले दाणे मनाप्रमाणे
घरट्याकडेच पक्षी वळतील सांजवेळी

ओसाड पार हल्ली हे स्वप्न पाहतो की
एकत्र लोक येथे जमतील सांजवेळी

घडल्यात ज्या चुका अन् जे साधता न आले
बाबी लहानमोठ्या छळतील सांजवेळी

सगळाच वेळ गेला देवाशिवाय ज्यांचा
ते दीप देवपूजा करतील सांजवेळी

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका: