वाटचाल

थकलेल्या पावलांस आता हीच सांत्वना आहे
चालत असताना रस्ता अर्ध्यात संपला आहे

पुढे पडत असणार्‍या पायाला कोणी सांगावे
दुसरा मागे दुनियेला रोखून थांबला आहे

वाट चालतेवेळी केवळ हीच माहिती आहे
दोन्ही पायांपैकी सध्या पुढे कोणता आहे

आधी उजवा की डावा, एवढाच निर्णय माझा
पुढे पावलांचा क्रम तर त्यानेच ठरवला आहे

त्याच्या जिम मधले एखादे यंत्र असावी दुनिया
इथे धावणारा एका जागीच राहिला आहे

© भूषण कुलकर्णी

मोर

जखमा सवयीच्या झाल्याने काही वाटत नाही
भरलेल्या मडक्यात आणखी पाणी मावत नाही

मेघ बरसले अवकाळी, नाचुन झाले मोरांचे
आजकाल श्रावणात कोणी तितका नाचत नाही

जरा मोकळी जागा दिसली, की ती काळी करतो
इतर कोणता रंग द्यायचा बाकी राहत नाही

पुढे जायचे आहे किंवा खोल जायचे आहे
एकदाच दोन्ही करणे अपुल्याला झेपत नाही

केवळ दुःखाच्या वेळेला अहं नकोसा होतो
बाकी तो वाईट कधी माझ्याशी वागत नाही

लोक भोवती होते तेव्हा स्वतःत गुंतत गेलो
आता बघतो तर कोणीही माझ्यासोबत नाही

© भूषण कुलकर्णी

इतकीच आता प्रार्थना

हे ईश्वरा, परमेश्वरा, इतकीच आता प्रार्थना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

स्मरतात दाहक यातना
करतो निरर्थक कल्पना
सोडव मनाला यातुनी, दे शांतता, सद्भावना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

जाणीव आहे अंतरी
मी बुडबुडा पाण्यावरी
थेंबात माझ्या जाणवू दे सागरी संवेदना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

असतो कधी पेचात मी
रस्ते किती, अवधी कमी
क्षमतेस माझ्या वाव दे, सार्थक ठरव या जीवना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

सुंदर अशा क्षितिजाकडे
चालत रहावे यापुढे
आले मधे काटे तरी वाढत रहावी प्रेरणा
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

कशासाठी?

थोर स्त्रीपुरुष सारे झुंजले कशासाठी?
मार्ग रोज मळणारे झाडले कशासाठी?

दुःख वाटले जेव्हा प्रश्न पाहिले सोपे
ज्ञान एवढे सारे मिळवले कशासाठी?

शक्यतो दिसत नाही ध्येय चालतेवेळी
वाटते पुन्हा, इतके चालले कशासाठी?

मूळच्या स्वभावाने लोक वागती सारे
आपल्या मनाला मी जाळले कशासाठी?

वेगळ्याच अर्थाने पाहिले तिला आम्ही
कल्पना म्हणाली, मी जन्मले कशासाठी?

चेहरेच पुतळ्यांचे आठवायचे होते
रक्त मग इथे त्यांनी सांडले कशासाठी?

सागरास मिळण्याचे स्वप्न तेवढे माझे
व्हायचे न मोती तर शिंपले कशासाठी?

मोहपाश सुटले पण प्रश्न शेवटी उरले
भाळले कशासाठी? टाळले कशासाठी?

© भूषण कुलकर्णी

भ्रमर

खूप दिवसांनी अता ओळी नव्या सुचतील का?
पानगळ झाली, पुन्हा पाने नवी फुटतील का?

रोज भ्रमरांना बघितले चुंबितेवेळी फुले
मग अता ह्रदये कळ्यांची कोवळी उरतील का?

वेगळ्या वाटेस गेलो, वेगळे झालो तरी
वेदना आपापल्या या आपल्या असतील का?

वाटण्याआधी कुतूहल मारले जाते इथे
शिक्षणाआधीच म्हणती, नोकर्‍या मिळतील का?

शुद्ध माझ्या भावना असल्या तरी भय वाटते
बोलताना शब्द काही वावगे ठरतील का?

© भूषण कुलकर्णी

प्रकाश

चालताना तोल माझा ढळत गेला
हात धरलेला तुझाही सुटत गेला

माणसाचा जन्म म्हणजे मद्यशाळा
जो कुणी आला, इथुन धडपडत गेला

माणसे वेगात मागे पडत गेली
अन् मला माझाच रस्ता दिसत गेला

मी प्रकाशाला सरळ समजून बसलो
मात्र तो आकर्षणाने वळत गेला

तो मनाला वाटले ते घेत गेला
हाच संगम संस्कृृृतींचा म्हणत गेला

वाचला सुविचार, त्याची ही कहाणी
कळत गेला, वळत गेला, टळत गेला

© भूषण कुलकर्णी

मी एकटा

मैफिलीचे स्वप्न पाहत रंगतो मी एकटा
मात्र मैफिल रंगल्यावर राहतो मी एकटा

कर कुणाच्याही हवाली तू ह्रदय आता तुझे
स्पंदने पण सर्व त्याची जाणतो मी एकटा

दिसत होते झाड मोठे, पण तरी मी टाळले
म्हणत होते की, फळे ही पिकवतो मी एकटा

वेदना सार्‍या जगाच्या घेतल्या ऐकून मी
शेवटी सारांश उरला, सोसतो मी एकटा

ते असे गेले पुढे, काही न झाल्यासारखे
मागच्या गोष्टींत वेडा गुंततो मी एकटा

पाहिले स्टेटस तुझे मी, टॅग अन् हॅश्टॅगही
पण तुझा प्रत्येक फोटो सांगतो, “मी एकटा”

मी इथे आलो कशाला? जात आहे मी कुठे?
उत्तरे याची नव्याने शोधतो मी एकटा

नाव काहीही असू दे, वासना वा भावना
आतल्या युद्धात केवळ जिंकतो ‘मी’ एकटा

© भूषण कुलकर्णी

झाशी

सलामत रहावी अयोध्या नि काशी
कराया हवी सज्ज प्रत्येक झाशी

जणू ग्रंथ डोक्याजवळ ठेवलेला
असू दे तुझा हात माझ्या उशाशी

इथे पंगती सारख्या मांडलेल्या
कसे ओळखावे अधाशी, उपाशी?

नको थांबणे अन् नको धावणेही
जगाने असा मोजला वेग ताशी

पडू द्या जरा बातमी थंड सध्या
नको द्यायला त्यास आताच फाशी

पहा, कल्पवृक्षास आला शहारा
कवी एक बसलाय त्याच्या तळाशी

© भूषण कुलकर्णी

सापळे

सुंदर अक्षर पानावर लिहिलेले दिसते
तेथे खाडाखोड जराशी खटकत असते

मी, माझे या जाळ्यापासुन सुटका व्हावी
वाटणार नाही मग, कोणी माझे नसते

थांग प्रवाहाच्या खोलीचा लागत नाही
पण वरवरची खळखळ केवळ मनात ठसते

पुढे खुले आकाश, पंख फुटलेत तरीही
आजकाल घरट्यात पाखरू उदास बसते

आज सापळे असेही रचत जातो आपण
उद्या नेमके आपलेच मन तेथे फसते

© भूषण कुलकर्णी

दवबिंदू

दिवाळीत ह्या खुलून यावे रंग आपले नवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

पुनवेला वा अमावसेला
चंद्र वास्तविक गोल सर्वदा
क्षमता आणिक संधीमधले जुळून यावे दुवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

किती दिली सूर्याने किरणे
हिशेब नाही कधी ठेवले
उजळू परिसर आपणसुद्धा जरी असू काजवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

ब्रह्मांडाच्या कालपटावर
पृृृृथ्वी क्षणभर, तारे क्षणभर
क्षणभंगुर पण असेल सुंदर, ते जीवन मज हवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका: