भेट

दिवे लागल्यावर तुझी भेट व्हावी
तृषा चेतल्यावर तुझी भेट व्हावी

अता शाल घेईल ती चांदण्यांची
नदी झोपल्यावर तुझी भेट व्हावी

कसा शांत होणार बेभान वारा?
म्हणे, थांबल्यावर तुझी भेट व्हावी

दवाचा प्रथम स्पर्श अलवार झाला
फुले लाजल्यावर तुझी भेट व्हावी

तुझ्या आठवांनी दिशा व्यापलेल्या
धुके दाटल्यावर तुझी भेट व्हावी

सरींनी नव्या तृप्त होईल माती
नि गंधाळल्यावर तुझी भेट व्हावी

पहा चंद्रताऱ्यांसही झोप आली
किती जागल्यावर तुझी भेट व्हावी?

निघालो सखे सत्य शोधायला मी
तिथे पोचल्यावर तुझी भेट व्हावी

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

झोळी

थोडे असू दे भान वेड्या आठवांना
हाका किती देशील गेलेल्या क्षणांना?

तारे तुझे हाती कधी येणार नव्हते
जपणार आहे तू दिलेल्या पौर्णिमांना

समजून घेण्याचे उगाचच यत्न केले
कोरीच पाने लावलेली पुस्तकांना

संगीत सुद्धा पाठ करणे शक्य असते
नसतात इतक्या भावना सगळ्या सुरांना

आपापले वैशिष्ट्य सांगा थोडक्यातच
हे मी विचारत थांबलो सगळ्या दिशांना

झोळी किती माझी, मला माहीत नाही
आधीच नाकारू कशाला शक्यतांना?

तो देह बाजारात मी केला खरेदी
आता कसा मी दोष द्यावा खाटकांना?

शब्दांत शेवटच्या तरी सांत्वन मिळाले
दुखवायचे नव्हते म्हणाली भावनांना

© भूषण कुलकर्णी

पृथ्वी

चंद्रताऱ्यांनो जरा स्वप्नात या माझ्या
रोजचे सलते ग्रहण डोळ्यात या माझ्या

ईश्वराचा नेमका पत्ता मला कळला
सांगतो, आधी तुम्ही धर्मात या माझ्या!

मार्ग कुठला योग्य, ओळखणे किती सोपे!
टाकले काटे तुम्ही मार्गात या माझ्या

बंद झाला बघ पुन्हा पुढचा नवा रस्ता
पाहणे मागे पुन्हा नशिबात या माझ्या

उंच गेल्यावर अशी रुखरुख मला होती
अर्धवट पृथ्वी दिसे क्षितिजात या माझ्या

सांगते पृथ्वी, पुन्हा येशील तू येथे
वाट कुठलीही निवड गोलात या माझ्या

© भूषण कुलकर्णी

कळणार नाही

ओळखीचा वाटतो पण चेहरा कळणार नाही
कोणता माणूस येथे आपला, कळणार नाही

डाव अर्ध्यावर पुन्हा सोडून सगळेजण निघाले
कोण असता जिॅकला वा हारला, कळणार नाही

वेग कोणाचा कमी हे रोजच्या स्पर्धेत कळते
जागच्या जागीच कोणी थांबला, कळणार नाही

बंधने नाहीत हल्ली वेळकाळाची गुन्ह्यांना
सूर्य अथवा चंद्र होता साक्षिला, कळणार नाही

मोह होते, बंध होते, प्रेम होते, काय होते?
ते तुला कळणार नाही अन मला कळणार नाही

बासरी सोडून सगळे पुस्तके शोधीत बसले
उद्धवा, इतक्यात त्यांना राधिका कळणार नाही

© भूषण कुलकर्णी

पक्षी

वाटतो हा करार पक्ष्यांना
अंबराचाच भार पक्ष्यांना

या जगी स्थान केवढे माझे?
हे अगोदर विचार पक्ष्यांना

बंदुका राहणार उंचावर
पिंजरा भावणार पक्ष्यांना

आपला पिंजरा बरा आहे
हे पढवले हुशार पक्ष्यांना

अडकले, मात्र होइना एकी
कर कितीही तयार पक्ष्यांना

मोजके सोबती सुटू शकले
हे कळाले फरार पक्ष्यांना

© भूषण कुलकर्णी

चौकोनी अंबर

वाढत जाऊ सरळ उभे हे नंतर ठरले होते
आधी अंतर मुळांतले रुजल्यावर ठरले होते

छोट्यामोठ्या गोष्टींचा आघात निमित्तापुरता
अगोदरच ह्रदयाचे सगळे पाझर ठरले होते

एक रोजची खुर्ची अन् आवडती खिडकी होती
त्यातुन दिसणारे चौकोनी अंबर ठरले होते

निर्णय होता योग्य तरीही शंका वाटत होती
कधी नव्हे ते सगळे काही भरभर ठरले होते

अशाचसाठी विचारल्या नाहीत कुणाला शंका
सगळ्यांपाशी अपुले अपुले उत्तर ठरले होते

खडकावरती रुजलो याचे अता वाटते कौतुक
निघून जावे, असेही कधी क्षणभर ठरले होते

© भूषण कुलकर्णी

कैफ

वागणे होते तुझे पाऊस पडल्यासारखे
वाटले होते उन्हाला चिंब भिजल्यासारखे

ओळखीपुरतेच इतरांशी अता बोलायचे
त्यापुढे वागायचे कोणीच नसल्यासारखे

या जगाच्या मद्यशाळा काय कामाच्या मला?
वाटले नाही कधीही कैफ चढल्यासारखे

खूप गोष्टींचा अम्हाला अर्थ नाही लागला
ते घडत होते म्हणे आधीच ठरल्यासारखे

पाहिजे शोधायला काहीतरी आता नवे
त्याविना वाटेल का हा काळ सरल्यासारखे?

© भूषण कुलकर्णी

शिखर

पुढच्या धुक्यात बघणे टाळायला हवे
पाऊल एक आता टाकायला हवे

पाउलखुणा नसाव्या वाटेत एवढ्या
नकळत कधीतरी मी हरवायला हवे

हरकत नसेल माझी चालायला पुढे
पण जायचे कुठे ते समजायला हवे

संन्यास घेतल्यावर होईल त्रास हा
म्हणतील लोक, याला सजवायला हवे

शिखरावरील झेंडे आहेत मोजके
खाली किती गळाले, शोधायला हवे

शिखरापर्यंत आलो, पण काय यापुढे?
आता फिरून खाली उतरायला हवे

© भूषण कुलकर्णी

झाड

उदास बसलेल्या झाडाला बरे वाटले आहे
बऱ्याच दिवसांनंतर कोणी इथे थांबले आहे

पाने हिरवीगार पाहतो सावलीत बसणारा
कसे कळावे, कुणी केवढे ऊन सोसले आहे

सावलीतही सदा उन्हाची भीती वाटत असते
येथे नाही कल्पवृक्ष हे किती चांगले आहे!

एक कवडसा पडला आहे गर्द सावलीमध्ये
बहुधा एखादे सोनेरी पान हरवले आहे

झाडाखाली आता थोडे पाणी निथळत आहे
शक्य तेवढे तर त्याने आधीच झेलले आहे

© भूषण कुलकर्णी

संदेश

नाते तुझे नि माझे सांगू नको कुणाला
वैरी परस्परांचे वाटो भले जगाला*

जास्तीत जास्त अपुल्या होतील चार भेटी
मग एवढी तयारी प्रत्येकदा कशाला?

अर्धा भरून किंवा अर्धा म्हणा रिकामा
आधी पहा, कदाचित गळका असेल प्याला

पत्ता मनातला जो खोडायला निघालो
संदेश एक नावापुरता तिथून आला

धावायचा सदा तो, पण थांबलाय आता
रस्त्यास अंत नाही, वाटत असेल त्याला

आता जराजराशी ही ज्योत मंद व्हावी
होईल शांत तेव्हा समजू नये कुणाला

© भूषण कुलकर्णी
(* मतला सुचवला आहे गोपीनाथ लंगोटे यांनी)