मैफिली

मनापासुनी दु:ख आपले सांगत होत्या
पूर्वी जखमा माझ्यासोबत बोलत होत्या

खूप वेळ मी शॅावरखाली उभा राहिलो
डोक्यामधुनी विचारधारा वाहत होत्या

ज्यांना साधी ओळख नव्हती तुझी कधीही
आठवणी त्या तुझी आठवण काढत होत्या

सुट्या-सुट्या होऊन भावना उसवत गेल्या
आपसांत ज्या सहजपणाने गुंतत होत्या

फासे टाकुन सापशिडी तो खेळत होता
आणि सोंगट्या अर्थ स्वत:चा शोधत होत्या

सुखात की दु:खात राहिलो माहित नाही
अनेक ओळी तर सुचल्यागत वाटत होत्या

कोणी वेडा त्या रात्रीला फिरत राहिला
म्हणून इतक्या छान मैफिली रंगत होत्या

उंबरा

पायऱ्या मळल्या तुझ्या अन् उंबरे झिजले तुझे
पण खरे दर्शन अजुन नाही मला घडले तुझे

प्रेरणा मिळते तिची ओळीत एकेका मला
आणि ती म्हणते, अजुन अंतर कुठे कळले तुझे!

ही नशा सुंदर तरी नुकसान करणारी पुढे
आठवांसोबत तिच्या मन एकटे पडले तुझे

विसरण्याचे एकदा मी ठरवले की ठरवले
वाटते ओळख तरी काही न आठवले तुझे

उंबऱ्याबाहेर पडणे परवडत नाही तुला
त्यामुळे मन या घरातच शेवटी रमले तुझे

चित्रगुप्त

नेमस्त कुंडल्यांचे नेमस्त बारकावे
नियतीस वाटते की काही नवे लिहावे

विज्ञान मानणारा स्वर्गात पोचला तर
प्रत्यक्ष देव त्याला देईल का पुरावे?

बाहेर चौकटीच्या पडणे कठीण नाही
व्याख्येत चौकटीच्या थोडे बदल करावे

त्या थोर मानवांचा अपमान हाच आहे
येथील माणसांचे आदर्श ते म्हणावे

आता तुझाच आहे आधार चित्रगुप्ता
साऱ्या जुन्या स्मृतींना तू घालवून द्यावे

एक्स

एक्स म्हणजे एक्स असते
एक्स ला दुसरं नाव नसतं
बऱ्याच गणितांमधे एक्स दिसते
हमखास…

काही गणितं सुटतात
एक्स ची किंमत कळते
एक्स कधी असते रियल, कधी इमॅजिनरी
कधी कॅाम्प्लेक्स – थोडं रियल, थोडं इमॅजिनरी
कधी रॅशनल, कधी इर्रेशनल
कधी पूर्ण, तर कधी फ्रॅक्शनल
कधी धन, कधी ऋण
कधी वाटते किंमत शून्य…

काही गणितं सुटणारी नसतात
कधीही…
आणि काही गणितं सुटली तरी
एक्स च्या अनेक किमती कळू शकतात
एक्स ची जेवढी पॅावर असेल, तेवढ्या…
टेक्निकली !?!

-भूषण कुलकर्णी

स्वप्न

भास होतात हल्ली निराळे मला
तूच यावे अता, सावरावे मला

रोज जागेपणी स्वप्न पडते तुझे
तूच स्वप्नात करतेस जागे मला

एक पाऊस घेऊन आलीस तू
आवडू लागले पावसाळे मला

ऐकल्यावर उखाणा तुझा वाटले
नाव इतके कसे गोड आहे मला!

मी कपाटामधे शोधले खूपदा*
पत्र स्वप्नात होते मिळाले मला

-भूषण कुलकर्णी
*: ही ओळ सुचवली आहे दत्तप्रसाद जोग सरांनी

खपली

ओळ तरलतम इतकी होती
सुचता सुचता सुटली होती

चिंता ‘नावा‘लाही नव्हती
दगडू होता, दमडी होती

तुला यायला उशीर झाला
खपली सुद्धा पडली होती

पास-फेल ते नंतर ठरवू
तुझी इयत्ता कितवी होती?

पंखा गरगर फिरत राहिला
तुझी आठवण बिजली होती

-भूषण कुलकर्णी

आरसा

आरश्याशी द्वंद्व आता संपले आहे
मी स्वत:ला शेवटी स्वीकारले आहे

पाहिले तर खूप काही आजवर केले
पाहिले तर खूप काही राहिले आहे

आठवण छोट्यात छोटी साठवत जातो
काय माहित कुठकुठे मन गुंतले आहे!

एकदा मी तळ मनाचा गाठला होता
जायचे नंतर तिथे मी टाळले आहे

मी सरळ नाकापुढे पाहून चलणारा
इतर सगळे ईश्वरावर सोडले आहे

फील आला

चाल पहिली हारल्याचा फील आला
डाव पुरता निसटल्याचा फील आला

येउनी गेलीस का तू याठिकाणी?
ही हवा झंकारल्याचा फील आला

ते गुलाबी ओठ जेव्हा पाहिले मी
पान माझे रंगल्याचा फील आला

ओळ तर साधीच होती बोललेली
पण उगाचच शिकवल्याचा फील आला

फेसबुक-इन्स्टा जरा उघडुन बघितले
मीच मागे राहिल्याचा फील आला

लक्ष्मणा, रेषा कुठे दिसलीच नाही!
मात्र ती ओलांडल्याचा फील आला

थांबलो क्षणभर तुझ्या दारात देवा
जन्म सगळा वाहिल्याचा फील आला

शिरजोरी

पकडली जाईल रे नक्की तुझी चोरी
वेगळी शक्कल लढव, तू सोड चाकोरी

सैल सोडत राहिलो माझ्याच बाजूने
समजले नाही तरी तुटली कशी दोरी

आजवर लिहिले किती ते मोजले नाही
माहिती आहे पुढे पाने किती कोरी

खूप काही मोकळे बोलायचे आहे
सांग तू केव्हातरी येशील सामोरी?

भाग्य, योगायोग, नियती, भोग अन् संचित
गोड नावांनी किती करशील शिरजोरी?

एक क्षण

तुझ्या दिव्यतेचा | लाभो एक क्षण |
आयुष्य तारण | त्याचसाठी ||

चरणधुळीचा | एक लाव टिळा |
जीवनाची शिळा | धन्य व्हावी ||

झाडेन आश्रम | वेचेन मी बोरं |
कार्य हेही थोर | तुझ्यामुळे ||

युद्ध किंवा शांती | तुझ्या इच्छेवरी |
आधी ये रे घरी | विदुराच्या ||

पाहिले रे युद्ध | पुरे झाले आता |
सांग देवा गीता | उद्धवासी ||

© भूषण कुलकर्णी