निजली आहे एक परी

सुंदर स्वप्ने तिच्या उरी
निजली आहे एक परी

जोजवती तिज गाता गाता
शीत मंद झुळुकांच्या लाटा
तारे लुकलुकती अंबरी
निजली आहे एक परी

तिच्या सभोती फूलपाखरे
कितीकिती नाजूक पहारे!
हळू थांबती ओठांवरी
निजली आहे एक परी

तिला चांदणे टिपते अलगद
तिला स्पर्शतो वारा सावध
कला शिकव ही मला तरी
निजली आहे एक परी

तिच्या बटांना जरा छेडु का?
या ओठांवर ओठ ठेउ का?
नको नको, थांब क्षणभरी
निजली आहे एक परी

© भूषण कुलकर्णी

देहाचे बंधन

तो गोकुळ सोडुन गेला
वाटते लौकिकार्थाने
येथेच बासरी त्याची
येथेच राहिले गाणे

विरहाची भक्ती सोपी
सारखी आठवण येते
वेदना जेवढी उत्कट
आनंद तेवढा देते

मी स्वतःस विसरुन जाते
तेव्हा तो येथे येतो
मी भानावर आले की
तो पुन्हा नाहिसा होतो

तो येथे आणत नाही
कुठल्या युद्धाची धूळ
ती तशीच वाजत असते
मुरलीची मंजुळ धून

एकरूप झाली ह्रदये
मग कसली ताटातूट?
तो आहे अथवा नाही
हे देहापुरते द्वैत

लोकांना लाखो शंका
पण राधेला हे कळते
देवाच्या अवताराला
देहाचे बंधन असते

© भूषण कुलकर्णी

इतकीच आता प्रार्थना

हे ईश्वरा, परमेश्वरा, इतकीच आता प्रार्थना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

स्मरतात दाहक यातना
करतो निरर्थक कल्पना
सोडव मनाला यातुनी, दे शांतता, सद्भावना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

जाणीव आहे अंतरी
मी बुडबुडा पाण्यावरी
थेंबात माझ्या जाणवू दे सागरी संवेदना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

असतो कधी पेचात मी
रस्ते किती, अवधी कमी
क्षमतेस माझ्या वाव दे, सार्थक ठरव या जीवना
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

सुंदर अशा क्षितिजाकडे
चालत रहावे यापुढे
आले मधे काटे तरी वाढत रहावी प्रेरणा
सद्भाव दे, सन्मार्ग दे, सामर्थ्य दे माझ्या मना

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

दवबिंदू

दिवाळीत ह्या खुलून यावे रंग आपले नवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

पुनवेला वा अमावसेला
चंद्र वास्तविक गोल सर्वदा
क्षमता आणिक संधीमधले जुळून यावे दुवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

किती दिली सूर्याने किरणे
हिशेब नाही कधी ठेवले
उजळू परिसर आपणसुद्धा जरी असू काजवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

ब्रह्मांडाच्या कालपटावर
पृृृृथ्वी क्षणभर, तारे क्षणभर
क्षणभंगुर पण असेल सुंदर, ते जीवन मज हवे
सूर्य उगवता जसे चमकती दवबिंदूंतुन दिवे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

प्रेम असे निष्काम असावे

(भरत जेव्हा श्रीरामांना परत नेण्यासाठी हट्ट करतो, पण श्रीराम वचनपालनापासून ढळत नाहीत, तेव्हा सर्व लोक जनक महाराजांना निवाडा करण्याची विनंती करतात. त्यावेळी जनक महाराज म्हणतात…)

श्रींच्या चरणी अनन्य व्हावे
प्रेम असे निष्काम असावे

रामप्रभू हे धर्मध्वजाधर
भरता, तू प्रेमाचा सागर
इतका सुंदर बघता संगर
न्यायनिवाडे सर्व हरावे
प्रेम असे निष्काम असावे

हक्क तुझा रामावर भरता
हट्ट तुझा हा योग्य सर्वथा
निर्मळ प्रेमळ अंतर असता
धर्माहुन ते श्रेष्ठ ठरावे
प्रेम असे निष्काम असावे

एक नियम पण प्रेम पाळते
अपेक्षा न ते कुठली करते
विजय जगावर जरी मिळवते
विजयाचेही भान नसावे
प्रेम असे निष्काम असावे

भरता, तू जर राजा बनशिल
अपकीर्तीचा भागी होशिल
सोड भिती ही, राम पाहतिल
भक्ताने ना कशास भ्यावे
प्रेम असे निष्काम असावे

परिस्थिती ही राम जाणतो
तुझी स्पंदने राम ऐकतो
तो सार्‍यातुन तारुन नेतो
पूर्ण समर्पण तिथे करावे
प्रेम असे निष्काम असावे

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

बासरी

ती बासरी मनाला
शोधून हाक देते
लाखात एकटीच्या
ह्रदयात साद जाते

त्या कृृृष्णबासरीने
माझी न मीच उरते
खांद्यावरून त्याच्या
हे सप्तसूर बघते

पडतात बासरीचे
मधुमंद सूर कानी
उरले कुठे कुणाला
बोलावयास काही?

मैत्रीण, प्रेयसी वा
मज काय नाव द्यावे?
मी कृृृष्णरूप झाले
त्यालाच सर्व ठावे!

© भूषण कुलकर्णी

भावना दुखावते

एक पान नेहमी हवेत हालते
एक ज्योत चारही दिशांत वाकते
त्यांस एक मंद झुळुकही सतावते
आमची तशीच भावना दुखावते

धर्म, जात, पंथ, वंश, आडनावही
देश, राज्य, प्रांत, गाव, वर्ण, खेळही
अस्मिता दिसेल, वा दडून राहते
आमची लगेच भावना दुखावते

गीत, लेख, गद्य, पद्य, चित्र, शब्दही
पोस्ट, त्यावरी रिएक्ट अन् कमेंटही
कोठुनी तरी मनात खुट्ट वाजते
आमची लगेच भावना दुखावते

पर्वतापरी बनव स्वतःस भावने
परतवून लाव सर्व वाद-वादळे
जी दुखावता प्रलय महान येतसे
भावना अशी जगास पूज्य होतसे

© भूषण कुलकर्णी