अथांग

IMG-20161224-WA0004

हे सागरा! किती शांत गंभीर दिसशी
खोल त्या डोहामध्ये काय बरे लपवशी?
सर्व आघात सोसूनही मर्यादा पाळिसी
साक्षात् भीष्म पितामह शोभसी!

अथांग तू, अपार तू, अनंत जलराशी
ध्यानस्थ योगी जणू, तेजस्वी दिसशी
कधी सुमधुर हास्य तर कधी तांडव करिसी
नटराज रूद्र महादेव दिसशी!

दिवसभर तापून जलचक्र चालविसी
मोती शिंपले रत्ने भरभरून देसी
परि मधुर जलवाणीत मीठ मिसळसी
कधी तू सक्षम पिताच भासशी!

कित्येक जीवांना उदरात धारिसी
त्यांचे निष्ठेने रक्षण करिसी
जलरूप मायेचा पदर ओढिसी
तू वात्सल्यपूर्ण आईच दिसशी!

तुज पाहता फिटे डोळ्यांचे पारणे
उजळून येई मनातील चांदणे
हळुवार लाटांशी हितगुज करणे
तुझे मित्ररुप सर्वथा आवडे!

© भूषण कुलकर्णी

2 Comments

Leave a comment