रामायणे

वेगळासा अर्थ घेऊ लागली रामायणे 
रावणाच्या सद्गुणांची चालली पारायणे 

रूद्र लंकेचेच व्हावे, दैत्य हट्टाने म्हणाला
मागणे नाकारता कैलास उचलाया निघाला
हात दबल्यावर सुरू केली स्तुतीची गायने
रावणाच्या सद्गुणांची चालली पारायणे 

अप्सरा, देवी, ऋषीपत्नी, स्त्रिया नात्यातल्याही
भ्रष्ट केल्या, कैद केल्या, वासनेला बांध नाही 
शाप होता, स्त्रीच होइल त्यास मृत्यूकारणे
रावणाच्या सद्गुणांची चालली पारायणे 

राज्य भरताला दिले, ही राघवांची बंधुप्रीती
रामरत झाला बिभीषण, रावणाची व्यर्थ शक्ती
वीर नसतो जो फसवतो स्त्रीस मायावीपणे 
रावणाच्या सद्गुणांची चालली पारायणे 

-भूषण कुलकर्णी 

Leave a Reply