झाशी

सलामत रहावी अयोध्या नि काशी
कराया हवी सज्ज प्रत्येक झाशी

जणू ग्रंथ डोक्याजवळ ठेवलेला
असू दे तुझा हात माझ्या उशाशी

इथे पंगती सारख्या मांडलेल्या
कसे ओळखावे अधाशी, उपाशी?

नको थांबणे अन् नको धावणेही
जगाने असा मोजला वेग ताशी

पडू द्या जरा बातमी थंड सध्या
नको द्यायला त्यास आताच फाशी

पहा, कल्पवृक्षास आला शहारा
कवी एक बसलाय त्याच्या तळाशी

© भूषण कुलकर्णी

सापळे

सुंदर अक्षर पानावर लिहिलेले दिसते
तेथे खाडाखोड जराशी खटकत असते

मी, माझे या जाळ्यापासुन सुटका व्हावी
वाटणार नाही मग, कोणी माझे नसते

थांग प्रवाहाच्या खोलीचा लागत नाही
पण वरवरची खळखळ केवळ मनात ठसते

पुढे खुले आकाश, पंख फुटलेत तरीही
आजकाल घरट्यात पाखरू उदास बसते

आज सापळे असेही रचत जातो आपण
उद्या नेमके आपलेच मन तेथे फसते

© भूषण कुलकर्णी

पालखी

भूतकाळाची कबर उकरून झाली
राहिलेली हाडके चघळून झाली

होत आहे वेळ कसला निर्णयाला?
साक्ष सगळ्यांची अता वदवून झाली

वाटले, येशील मथुरेहून गावी
पण तुझी तर द्वारका वसवून झाली

जन्म सरल्यावर म्हणे, जगलोच नाही
कारणे आपापली ठरवून झाली

एक इच्छा शेवटी उरणार आहे
आज इच्छा कालची पुरवून झाली

न्यायची आहे कुठे, माहीत नाही
जीवनाची पालखी सजवून झाली

© भूषण कुलकर्णी

चांदणी

कसे कळावे, काय व्हायचे मरणानंतर?
कळेल हा पिंजरा, त्यातुनी सुटल्यानंतर

होती इतकी दूर चांदणी माझ्यापासुन
प्रकाश पोहोचला इथे, ती विझल्यानंतर

एखादा सांगतो स्वतःच्या इच्छा त्याला
एखादा हळहळतो, तारा तुटल्यानंतर

ही दुनिया जर स्वप्नच आहे कुणाचेतरी
विसरणार तर नाही ना तो उठल्यानंतर?

© भूषण कुलकर्णी

आवाज

व्यक्त व्हायचे ठरल्यावर गोंगाट वाढला माझा
घटत राहिला त्यानंतर आवाज आतला माझा

अजून माझ्या जगण्याचा मी अर्थ शोधतो आहे
तिथे जगाने जन्माचा सारांश काढला माझा

इथे पसारा सुखांचा जसा वाढत वाढत गेला
तसा त्यामधे कुठेतरी आनंद हरवला माझा

चालत गेलो एकटाच अन् ठसे स्वतःचे पुसले
म्हणू नका, त्या मूर्खांनी आदर्श ठेवला माझा

खरा चेहरा सापडणे जर इतके अवघड आहे
नसेल त्याने कुठलाही चेहरा बनवला माझा

आधाराच्या धाग्याची जाणीव शेवटी झाली
पतंग जेव्हा जवळजवळ वार्‍यावर पडला माझा

© भूषण कुलकर्णी

ऋतू

चालण्याची सवय जडली, थांबणे विसरून गेले
पोचता शिखरावरी काहीतरी हरवून गेले

वाद होता तो, तिथे संवाद नावालाच होता
काय जे बोलायचे, आधीच ते ठरवून गेले

आत जे आधीच होते, तेवढे संस्कार झाले
माहितीपुरतेच उरले, जे नवे शिकवून गेले

आठवण मधल्या ऋतूंची राहिली नाही जराही
तेच आठवतात जे फुलवून वा सुकवून गेले

© भूषण कुलकर्णी

राधा

सर्व जगाला श्रीकृष्णाची कोण दिसावी राधा?
केवळ देहच बघणार्‍यांना कशी कळावी राधा?

गोकुळापरी विश्व रहावे, नको द्वारका, मथुरा
कृष्ण नेहमी असेल येथे, तरी असावी राधा

गीतेचा उपदेश समजणे अवघड होई तेव्हा
कृष्णाची बासरी ऐकण्या मनात यावी राधा

सभोवताली किती रुपांनी मुरली वाजत असते!
कधीतरी या ह्रदयामधली जागी व्हावी राधा

पूर्णत्वाच्या मागे मागे विश्व धावते आहे
स्वयंपूर्ण तो मुरलीधरही म्हणे, मिळावी राधा

© भूषण कुलकर्णी

लिहितो

ह्रदयावरचे ओझे हलके करण्यापुरते लिहितो
कठीण वेळी मी थोडेसे हसण्यापुरते लिहितो

हसतेवेळी कधी खोलवर विचार पोचत नाही
म्हणून आपण बर्‍याचवेळा रडण्यापुरते लिहितो

प्रश्नपत्रिका आयुष्याची अवघड दिसते आहे
फारफारतर ढकलपास मी ठरण्यापुरते लिहितो

कविता ती, जी ह्रदयामध्ये दबून राहत नाही
खरा कवी त्यावेळी केवळ जगण्यापुरते लिहितो

विद्यार्थ्याचे साहित्याशी देणेघेणे नसते
आजकाल तो परीक्षेत गुण मिळण्यापुरते लिहितो

ती गेल्यावर जीवनातले गीत संपले होते
जे उरले ते तिला कधीतर कळण्यापुरते लिहितो

पात्रांनाही कधी कथानक त्याचे ठाउक नसते
असे नाट्य तो नशिबामध्ये बघण्यापुरते लिहितो

© भूषण कुलकर्णी

टेकडी

आतमध्ये मी स्वतःच्या पाहिले वाकूनही
नेमके काहीच नाही गवसले शोधूनही

आतली निंदास्तुती चालूच होती नेहमी
मी जरी बाहेरच्यांना पाहिले टाळूनही

समजले नाही कधी मी राहिलो शिखरावरी
समजते, आलोय आता टेकडी उतरूनही

मंद उतरणही असू शकते सरळ रस्त्यामधे
पातळी घसरेल खाली एवढे चालूनही

देव अन् नियतीसही घ्यावे समीकरणामधे
अन्यथा उत्तर मिळत नाही गणित मांडूनही

© भूषण कुलकर्णी

दार

काय बोलू तुझ्या प्रवाहावर?
राहिलो नेहमी किनार्‍यावर

गैरसमजास का दिला थारा?
सोबती मोजकेच असल्यावर

पाहते मन पुन्हापुन्हा मागे
वाट अंधुक समोर दिसल्यावर

दार उघडेच ठेवले आहे
एक संधी निघून गेल्यावर

याद इथली इथेच मेली तर
भार नाही पुढील जन्मावर

© भूषण कुलकर्णी