पक्षी

वाटतो हा करार पक्ष्यांना
अंबराचाच भार पक्ष्यांना

या जगी स्थान केवढे माझे?
हे अगोदर विचार पक्ष्यांना

बंदुका राहणार उंचावर
पिंजरा भावणार पक्ष्यांना

आपला पिंजरा बरा आहे
हे पढवले हुशार पक्ष्यांना

अडकले, मात्र होइना एकी
कर कितीही तयार पक्ष्यांना

मोजके सोबती सुटू शकले
हे कळाले फरार पक्ष्यांना

© भूषण कुलकर्णी

राधेची मुरली

वाजवते मुरली राधा
जी कृष्ण ठेवुनी गेला
पूर्वीहुन मंजुळ इतकी
का वाटे चराचराला?

कृष्णाची मुरली पूर्वी
राधेला हाका देई
ह्रदयात जेवढी प्रीती
अंतरी खोल ती जाई

राधेची मुरली आहे
कृष्णाला बोलवणारी
त्यानेच व्यापल्या साऱ्या
सृष्टीला डोलवणारी

राधेची मुरली ऐकुन
सावळी आठवण येते
गोपींचे अश्रू झरती
गायींचे मन व्याकुळते

आभाळ निळे गहिवरते
यमुनेचे पाणी हलते
गोवर्धन शिखर पुन्हा त्या
मानाने खुलते, फुलते

शरदाच्या चांदणराती
ती मुरली वाजवताना
या दृश्य पूर्ततेसाठी
येणार लाडका कान्हा!

© भूषण कुलकर्णी

चौकोनी अंबर

वाढत जाऊ सरळ उभे हे नंतर ठरले होते
आधी अंतर मुळांतले रुजल्यावर ठरले होते

छोट्यामोठ्या गोष्टींचा आघात निमित्तापुरता
अगोदरच ह्रदयाचे सगळे पाझर ठरले होते

एक रोजची खुर्ची अन् आवडती खिडकी होती
त्यातुन दिसणारे चौकोनी अंबर ठरले होते

निर्णय होता योग्य तरीही शंका वाटत होती
कधी नव्हे ते सगळे काही भरभर ठरले होते

अशाचसाठी विचारल्या नाहीत कुणाला शंका
सगळ्यांपाशी अपुले अपुले उत्तर ठरले होते

खडकावरती रुजलो याचे अता वाटते कौतुक
निघून जावे, असेही कधी क्षणभर ठरले होते

© भूषण कुलकर्णी

कैफ

वागणे होते तुझे पाऊस पडल्यासारखे
वाटले होते उन्हाला चिंब भिजल्यासारखे

ओळखीपुरतेच इतरांशी अता बोलायचे
त्यापुढे वागायचे कोणीच नसल्यासारखे

या जगाच्या मद्यशाळा काय कामाच्या मला?
वाटले नाही कधीही कैफ चढल्यासारखे

खूप गोष्टींचा अम्हाला अर्थ नाही लागला
ते घडत होते म्हणे आधीच ठरल्यासारखे

पाहिजे शोधायला काहीतरी आता नवे
त्याविना वाटेल का हा काळ सरल्यासारखे?

© भूषण कुलकर्णी

शिखर

पुढच्या धुक्यात बघणे टाळायला हवे
पाऊल एक आता टाकायला हवे

पाउलखुणा नसाव्या वाटेत एवढ्या
नकळत कधीतरी मी हरवायला हवे

हरकत नसेल माझी चालायला पुढे
पण जायचे कुठे ते समजायला हवे

संन्यास घेतल्यावर होईल त्रास हा
म्हणतील लोक, याला सजवायला हवे

शिखरावरील झेंडे आहेत मोजके
खाली किती गळाले, शोधायला हवे

शिखरापर्यंत आलो, पण काय यापुढे?
आता फिरून खाली उतरायला हवे

© भूषण कुलकर्णी

झाड

उदास बसलेल्या झाडाला बरे वाटले आहे
बऱ्याच दिवसांनंतर कोणी इथे थांबले आहे

पाने हिरवीगार पाहतो सावलीत बसणारा
कसे कळावे, कुणी केवढे ऊन सोसले आहे

सावलीतही सदा उन्हाची भीती वाटत असते
येथे नाही कल्पवृक्ष हे किती चांगले आहे!

एक कवडसा पडला आहे गर्द सावलीमध्ये
बहुधा एखादे सोनेरी पान हरवले आहे

झाडाखाली आता थोडे पाणी निथळत आहे
शक्य तेवढे तर त्याने आधीच झेलले आहे

© भूषण कुलकर्णी

संदेश

नाते तुझे नि माझे सांगू नको कुणाला
वैरी परस्परांचे वाटो भले जगाला*

जास्तीत जास्त अपुल्या होतील चार भेटी
मग एवढी तयारी प्रत्येकदा कशाला?

अर्धा भरून किंवा अर्धा म्हणा रिकामा
आधी पहा, कदाचित गळका असेल प्याला

पत्ता मनातला जो खोडायला निघालो
संदेश एक नावापुरता तिथून आला

धावायचा सदा तो, पण थांबलाय आता
रस्त्यास अंत नाही, वाटत असेल त्याला

आता जराजराशी ही ज्योत मंद व्हावी
होईल शांत तेव्हा समजू नये कुणाला

© भूषण कुलकर्णी
(* मतला सुचवला आहे गोपीनाथ लंगोटे यांनी)

चालताना

हेच तर होणार भरभर चालताना
वाढते अपुल्यात अंतर चालताना

एकटे पडलो कधी कळलेच नाही
एक होतो ना अगोदर चालताना*

धावताना राहिले जे काय मागे
आठवत राहील नंतर चालताना

मन अगोदर थकत जाते, पाय नंतर
भावना इतक्या अनावर चालताना

आळशी नाहीत सगळे लोक येथे
थांबले असतील क्षणभर चालताना

एक आशा सर्व ताऱ्यांना असावी
विश्व समजावे कधीतर चालताना

© भूषण कुलकर्णी

दिशाहीन

कुणी भरोसा कसला द्यावा?
दिशाहीन वाहतात नावा

दिशा मिळो वा मिळू नये पण
तुझा हात हातात असावा*

दिशाभूल धरतीने केली
ताऱ्यांनी रस्ता सुचवावा

एक नाव क्षितिजावर दिसते
त्याच दिशेने सगळे जावा

ज्या मार्गाने नाव चालली
किती वेळ राहील पुरावा?

मिसळुन जावे सागरात मी
प्रवास कुठला शेष नसावा

चिमणी बसली नावेवरती
अता किनारा जवळ असावा

© भूषण कुलकर्णी

नामदेव

विठ्ठला, आता कधी भेटायचे ठरवून घे रे
ठरवताना आमच्याही भावना समजून घे रे

जेवल्यावर देव मग मी खायचे, आई म्हणाली
या भुकेल्या बालकासाठी तरी खाऊन घे रे!

भेटल्यावरही तुला का राहिलो कच्चा घडा मी?
एक आवा माझियासाठी नवा बनवून घे रे

देवळामागेच कीर्तन हरिजनांचे चाललेले
क्षणभरासाठी तरी अपुली दिशा बदलून घे रे

चांगदेवासारखा मी धाडला कोराच कागद
विठ्ठला, समजायचे ते सर्व तू समजून घे रे

पाहवेना ही समाधी कोवळ्याशा ज्ञानियाची
बांध फुटल्या नामदेवाला उरी कवळून घे रे

© भूषण कुलकर्णी