शेवटी संपले युद्ध
की मागे उरले पाप?
होईल तुझा कुलनाश
गांधारी देते शाप
द्वारका उभी द्वीपावर
रणभूमी पासुन दूर
मदिरेची धुंदी चढते
ललनांचे मादक सूर
सोन्याची उडते धूळ
बलशाली यादव वीर
काळाला सांगे छाती
धर तीन तपांचा धीर
मग कृष्णपुत्र सांबाने
अपमान ऋषींचा केला
ये, प्रलय होउदे आता
काळाला कृष्ण म्हणाला
शरदाच्या चांदणराती
मदमस्त जाहले लोक
अन दूर तिथे मुरलीवर
भैरवी वाजते, ऐक
कृतवर्मा, सात्यकि लढले
अन सोबत यादव सगळे
हतबुद्ध उभा बलराम
मृतदेह कुळाचे पडले
उद्धवा, सोड हे बंधन
श्रीकृष्ण सांगतो गीता
वाल्याचा लागुन बाण
योगीही निघे दिगंता
जा, धनंजया घेउन ये
यादवकुलस्त्रिया मुलांना
अन आठव तूही गीता
द्वारकापुरी बुडताना
-भूषण कुलकर्णी