शंख

एक वेडा चंद्र पाहत राहिला
अन् जमाना त्यास हासत राहिला

आज रात्री फोन करते, बोलली
रात्रभर मग फोन जागत राहिला

अर्जुनागत कोरडा पडला घसा
आणि तिकडे शंख वाजत राहिला

मूळ मुद्द्यावर नको का एकमत?
हा खुळा पुढचेच बोलत राहिला

मार्क प्रश्नाचे किती, नव्हते कळत
प्रश्न तो सोपाच वाटत राहिला

संपली नव्हती परीक्षा अजुनही
तो पुन्हा उत्तर तपासत राहिला

© भूषण कुलकर्णी

रंग

प्रश्न सुटले वाटते, पण नेहमी उरतात काही
उत्तरामध्ये नको त्या शक्यता लपतात काही

उंच शिखराचेच वर्णन मांडले आहे जगाने
की जणू कुठल्या यशाला पायऱ्या नसतात काही!

रमवले होते मनाला, विसरलो होतो स्वतःला
पण पुन्हा माझ्यापुढे हे आरसे दिसतात काही

एवढे खंबीर केले सर्व लोकांनी मनाला
एकही अश्रू न दिसता पापण्या भिजतात काही

एक आणिक दिवस सरला एवढे आता समजते
रोज दिसते, आज दिसले, पाखरे उडतात काही

अस्त झाला, मात्र त्याची राहिली इच्छा असावी
त्याच आवडत्या दिशेला रंग घुटमळतात काही

© भूषण कुलकर्णी

भाळू नकोस मित्रा

हसण्यावरी कुणाच्या भाळू नकोस मित्रा
इतक्यात स्वप्न कुठले पाहू नकोस मित्रा

शब्दांत येउ दे अन् सुस्पष्ट येउ दे रे
डोळ्यांत प्रेमगीते वाचू नकोस मित्रा

देतील साथ अथवा ते राहतील मागे
मागे स्वतः कुणाच्या लागू नकोस मित्रा

असतो कुणाकुणाच्या अश्रूंत गोडवाही
डोळ्यांतल्या पुराने वाहू नकोस मित्रा

पैसा कमाव पुष्कळ, फिटनेस ठेव उत्तम
कुठलेच छंद दुसरे लावू नकोस मित्रा

उत्स्फूर्त येत होती, ती दाद येत नाही
त्यांच्यासमोर आता गाऊ नकोस मित्रा

जुळतो स्वभाव सुद्धा, होईल प्रेम सुद्धा
हे एकदाच होते, मानू नकोस मित्रा

© भूषण कुलकर्णी

मंथन

सुंदर आहे विश्व, आणखी सुंदर झाले असते
सगळ्यांना जर मनापासुनी हसता आले असते

आत उतरलो तेव्हा खोली जाणवली डोहाची
फक्त त्यामधे खडे टाकुनी काय कळाले असते?

तुझ्या सुगंधी फुलण्याला मी दुरून पाहत होतो
हात लावता फूलपाखरू दूर उडाले असते

टोकाचे नसतेच एवढे मंथन आयुष्याचे
उगा वाटते विषात वा अमृतात न्हाले असते

भेट व्हायची पुन्हा कधी हे आता माहित नाही
म्हणून तारे थांबलेत, अन्यथा निघाले असते

© भूषण कुलकर्णी

भेट

दिवे लागल्यावर तुझी भेट व्हावी
तृषा चेतल्यावर तुझी भेट व्हावी

अता शाल घेईल ती चांदण्यांची
नदी झोपल्यावर तुझी भेट व्हावी

कसा शांत होणार बेभान वारा?
म्हणे, थांबल्यावर तुझी भेट व्हावी

दवाचा प्रथम स्पर्श अलवार झाला
फुले लाजल्यावर तुझी भेट व्हावी

तुझ्या आठवांनी दिशा व्यापलेल्या
धुके दाटल्यावर तुझी भेट व्हावी

सरींनी नव्या तृप्त होईल माती
नि गंधाळल्यावर तुझी भेट व्हावी

पहा चंद्रताऱ्यांसही झोप आली
किती जागल्यावर तुझी भेट व्हावी?

निघालो सखे सत्य शोधायला मी
तिथे पोचल्यावर तुझी भेट व्हावी

© भूषण कुलकर्णी

हे गाणं नक्की ऐका:

संसार

संसारात पुन्हा | लागले वळण |
देवाचे चरण | दूर गेले ||

जप ध्यान पूजा | नामाचे स्मरण |
देउनी कारण | थांबविले ||

जाती उलटोनि | सण वार तिथी |
आठवेना चित्ती | नाम तुझे ||

कुणाची न जाणे | करतोय सेवा |
वाट पहा देवा | विटेवरी ||

असू दे रे तरी | लक्ष मजवरी |
बोलाव सत्वरी | पंढरीसी ||

© भूषण कुलकर्णी

झोळी

थोडे असू दे भान वेड्या आठवांना
हाका किती देशील गेलेल्या क्षणांना?

तारे तुझे हाती कधी येणार नव्हते
जपणार आहे तू दिलेल्या पौर्णिमांना

समजून घेण्याचे उगाचच यत्न केले
कोरीच पाने लावलेली पुस्तकांना

संगीत सुद्धा पाठ करणे शक्य असते
नसतात इतक्या भावना सगळ्या सुरांना

आपापले वैशिष्ट्य सांगा थोडक्यातच
हे मी विचारत थांबलो सगळ्या दिशांना

झोळी किती माझी, मला माहीत नाही
आधीच नाकारू कशाला शक्यतांना?

तो देह बाजारात मी केला खरेदी
आता कसा मी दोष द्यावा खाटकांना?

शब्दांत शेवटच्या तरी सांत्वन मिळाले
दुखवायचे नव्हते म्हणाली भावनांना

© भूषण कुलकर्णी

एक क्षण

तुझ्या दिव्यतेचा | लाभो एक क्षण |
आयुष्य तारण | त्याचसाठी ||

चरणधुळीचा | एक लाव टिळा |
जीवनाची शिळा | धन्य व्हावी ||

झाडेन आश्रम | वेचेन मी बोरं |
कार्य हेही थोर | तुझ्यामुळे ||

युद्ध किंवा शांती | तुझ्या इच्छेवरी |
आधी ये रे घरी | विदुराच्या ||

पाहिले रे युद्ध | पुरे झाले आता |
सांग देवा गीता | उद्धवासी ||

© भूषण कुलकर्णी

पृथ्वी

चंद्रताऱ्यांनो जरा स्वप्नात या माझ्या
रोजचे सलते ग्रहण डोळ्यात या माझ्या

ईश्वराचा नेमका पत्ता मला कळला
सांगतो, आधी तुम्ही धर्मात या माझ्या!

मार्ग कुठला योग्य, ओळखणे किती सोपे!
टाकले काटे तुम्ही मार्गात या माझ्या

बंद झाला बघ पुन्हा पुढचा नवा रस्ता
पाहणे मागे पुन्हा नशिबात या माझ्या

उंच गेल्यावर अशी रुखरुख मला होती
अर्धवट पृथ्वी दिसे क्षितिजात या माझ्या

सांगते पृथ्वी, पुन्हा येशील तू येथे
वाट कुठलीही निवड गोलात या माझ्या

© भूषण कुलकर्णी

राधिका

ओळखीचा वाटतो पण चेहरा कळणार नाही
कोणता माणूस येथे आपला, कळणार नाही

डाव अर्ध्यावर पुन्हा सोडून सगळेजण निघाले
कोण असता जिॅकला वा हारला, कळणार नाही

वेग कोणाचा कमी हे रोजच्या स्पर्धेत कळते
जागच्या जागीच कोणी थांबला, कळणार नाही

बंधने नाहीत हल्ली वेळकाळाची गुन्ह्यांना
सूर्य अथवा चंद्र होता साक्षिला, कळणार नाही

मोह होते, बंध होते, प्रेम होते, काय होते?
ते तुला कळणार नाही अन मला कळणार नाही

बासरी सोडून सगळे पुस्तके शोधीत बसले
उद्धवा, इतक्यात त्यांना राधिका कळणार नाही

© भूषण कुलकर्णी